

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत दोन गटातील वाद आरोप-प्रत्यारोपांपर्यंत सुरू होता. परंतु आता हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. आरजीपीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांपैकी एका खात्यासह पक्षाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा ताबा घेतल्याचा आरोप करीत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
विश्वेश नाईक, अजय खोलकर आणि इतर सदस्यांसह पक्षाच्या ‘कोअर एक्झिक्युटिव्ह कमिटी’ च्या सदस्यांनी आमदार बोरकर यांच्याविरोधात ही अधिकृत तक्रार नोंदवली. पत्रकारांना माहिती देताना खोलकर म्हणाले, ‘आरजीपी‘वर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, आमदार बोरकर यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांपैकी सर्व खात्यासह पक्षाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा ताबा घेतला आहे.
त्यामुळेच आम्हाला याप्रकरणी बोरकर यांच्या विरोधात सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी लागली. आरजीपीचा इमेल आयडी हॅक केला आहे, सर्व सरकारी खात्यांकडे आणि निवडणूक आयोगाकडे हा इमेलआयडी आहे. काही महत्त्वाचा पक्षीय पत्रव्यवहार या खात्यावरून झालेले आहेत, त्यामुळे या आयडीचा गैरवापर होऊ शकतो.
दहा सदस्यांकडून कायदेशीर नोटीस
आरजीपीतून हकालपट्टी केलेल्या १० सदस्यांनी पक्षाला कायदेशीर नोटीस बजावली असून, कथित बदनामीबद्दल १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. आमच्या विरोधात खोटे आरोप आणि अफवा पसरवून आमची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.