

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे नेते अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या कार्यालयातील कर्मचारी करिश्मा नाईक यांच्याविरोधात कथित मॉर्फ केलेल्या अर्धनग्न छायाचित्रांच्या प्रसारणाबाबत अनुसूचित जमाती (एसटी) आयोगासह विविध संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केल्याने पक्षांतर्गत राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.
या प्रकरणामुळे अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात आधीपासून असलेले मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
खोलकर यांनी आपल्या तक्रारीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर अर्धनग्न मॉर्फ केलेली छायाचित्रे प्रसारित, प्रकाशित व प्रसार केल्याचा आरोप केला आहे. या कृतीमुळे आपली बदनामी, मानसिक छळ, धमकी आणि अनुसूचित जमाती समाजातील व्यक्ती म्हणून जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीत माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी एसटी आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे समजते.
अंतर्गत मतभेद पुन्हा समोर
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरून अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत. अजय खोलकर आणि वीरेश बोरकर यांच्यातील राजकीय भूमिका, पक्ष संघटन आणि काही धोरणात्मक प्रश्नांवरून निर्माण झालेला दुरावा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
आता या तक्रारीमुळे दोन्ही नेत्यांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हे प्रकरण केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित न राहता पक्षातील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक बनू शकते.
आगामी काळात या प्रकरणावर संबंधित यंत्रणांकडून काय कारवाई होते आणि पक्ष नेतृत्व याकडे कशा पद्धतीने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.