साखळी: ए.सी.जी.एल.कामगारांच्या (ACGL workers) समस्या गेली चार वर्षे कंपनी व्यवस्थापन व सरकारने तीव्र दुर्लक्ष करुन झुलत ठेवलेल्या आहेत. जेणेकरुन कामगारांना आंदोलन करणे भाग पडले आहे. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आता कामगार आणखी दोन दिवसांची मुदत देत असून या समस्या न सोडविल्यास येत्या सोमवार पासून कामगार आंदोलन अधिक तीव्र करुन आपल्या संपुर्ण कुटुंबियांना या आंदोलनात सहभागी करुन रस्त्यावर उतरणार असा इशारा ए.सी.जी.एल. कंपनीच्या कामगारांनी साखळी येथील सभेत दिला.
ए.सी.जी.एल.कंपनी पगारवाढ देत नसल्याने कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात कंपनीच्या कामगारांनी संप सुरु केला असून बुधवारी वाळपई येथील कामगारांच्या मोर्चा नंतर गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या साखळी शहरात भव्य मोर्चा काढून एल्गार केला. मोर्चाची सुरुवात गृहनिर्माण वसाहती येथून करण्यात आली.हा मोर्चा "शिवचौका" जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून साखळी सरकारी महाविद्यालय नजीक रवींद्र भवन जवळ मोकळ्या जागेमध्ये या मोर्चाचे जाहीर सभेमध्ये रुपांतर झाले.
या मोर्चामध्ये साखळी गट कॉग्रेस समिती व साखळी नगरपालिका सत्ताधारी सगलानी गटाच्या सदस्यांनी आपला सक्रिय सहभाग घेऊन कामगारांच्या आंदोलनाला संपुर्ण पाठिंबा दिला.या मोर्चामध्ये कॉग्रेसचे आमदार आलेक्स रेजिननाल्ड, प्रदेश सरचिटणीस खेमलो सावंत, साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक धर्मेश सगलानी तसेच साखळी गट कॉग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक आदींची सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण व उपाध्यक्ष राजेश उजैडकर यांचीही खास उपस्थिती होती.
यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत दोन दिवसांत कामगारांच्या समस्या सोडवू शकतात पण मुख्यमंत्र्याना व या भाजप सरकारला कामगारांचे काहीही पडलेले नाही.कॉग्रेस सरकारच्या काळात कामगारांचे हित जपले जात होते.आपण स्वता सदैव कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत होतो.भाजप सरकारामध्ये कामगारांना आपले प्रश्न घेऊन रस्त्यावर यावे लागत आहे ही दुर्देवाची बाब असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.कॉग्रेस पक्षाचा पुर्ण पाठिंबा या कामगारांना राहणार याची ग्वाही आमदार रेजिनाल्ड यांनी दिली. कामगारांच्या जे विरोधात गेले ते संपले
कामगारांचा अंत पाहू नका
जे जे कामगारांच्या विरोधात गेले ते संपले. हा देशातील इतिहास आहे. कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका.कंपनीच्या नफ्यात कामगारांचा वाटा आहे तो मिळालाच पाहिजे. सरकारला नम्र विनंती येत्या दोन दिवसात कामगांच्या समस्या सोडवा अन्यथा हे सरकार उलथवण्यासही कामगारांना वेळ लागणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना नेते मनोज चव्हाण यांनी दिला.
कंपनी नुकसानीत तर व्यवस्थापनाचे चोचले का पुरविले जातात?
यावेळी बोलताना साखळीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी म्हणाले. कामगारांचा पगारवाढ करण्यासाठी कंपनीचे नुकसान दाखविले जाते तर व्यवस्थापन मंडळाचे चोचले कसे पुरविले जातात ? त्यांचा पगार, भत्ता कसा वाढवला जातो ? कामगार हा कंपनीचा महत्वाचा घटक आहे.तो कष्ट करतो त्यांच्या हक्काची पगारवाढ झालीच पाहिजे. गेली चार वर्षे भाजप सरकार व मुख्यमंत्र्यांना या कामगारांचा प्रश्न सोडवता आलेला नाही. हे सरकारच कामगारांचे दुश्मन आहे. कंपनीला आपण स्वता आव्हान देतो.कंपनीच्या सी.ए. व आपण कामगारांतर्फे सी.ए.आणतो. समोरासमोर बसून प्रश्न सोडवूया असे आव्हान सगलानी यांनी केले. यावेळी साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, सुप्रसिद्ध वकील अँड.राजेश उजैडकर यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत खानोलकर यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.