म्हापसा: ध्वनिप्रदूषण रोखा, अशी मागणी करत हणजूण-वागातोरवासीयांनी इतर गावांतील समविचारी लोकांसह गुरुवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी सायंकाळी उशिरा आणि आज सलग दुसऱ्या दिवशी १००पेक्षा अधिक स्थानिकांनी एकत्रित हणजूण पोलिस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी त्यांनी कर्णकर्कश संगीतावर कारवाई करण्याची मागणी केली.
साऊंड मॉनिटरिंग सिस्टीम बसेपर्यंत गावातील सर्व आस्थापने (युनिट्स) ज्यांना नोटीस बजावल्या आहेत, ती बंद करण्यात यावीत, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी लावून धरली. यापुढे रात्री १० वा.नंतरही संगीत वाजले तर स्थानिक त्यांच्या मुलाबाळांसह पोलिस ठाण्यात येऊन पुन्हा मोर्चा काढतील, असा इशाराही स्थानिकांनी दिला.
या मोर्चात दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. तसेच हणजूणमधील ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी वागातोरवासीयांसह आसगाव, शिवोली व इतर भागातील लोक एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला.
स्थानिक लोक पोलिस ठाण्याच्या दिशेने कूच करताना, त्यांना पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी थांबवले व त्यांना सांगितले की, सध्या मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात नाही. मात्र, एका स्थानिक रहिवाशाने निदर्शनास आणून दिले की, एक रेस्टॉरंट क्लब संगीत वाजवत आहे व लोकांना पाहून त्यांनी क्लबमधील दिवे बंद केले.
यावेळी कॅ. विरियातो व पाटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पोलिस निरीक्षकांना या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तपासणी करण्यास सांगितले. मात्र, निरीक्षकांना आतमध्ये घेण्यास क्लबकडून वेळकाढू धोरण अवलंबिल्याने आंदोलनकर्त्यांनी गदारोळ व संताप व्यक्त केला.
त्यानंतर, स्थानिकांना पोलिस ठाण्यावर आपला मोर्चा वळवला व निरीक्षक परेश नाईक तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कर्णकर्कश आवाजात वाजणाऱ्या संगीताबद्दल जाब विचारला.
आज सलग दुसऱ्या दिवशी १००पेक्षा अधिक स्थानिकांनी एकत्रित हणजूण पोलिस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा काढला. लोकांच्या हातात फलक होते, ज्यावर ध्वनिप्रदूषणावर बंदी आणा, असे ठळक शब्दांत लिहिले होते.
यावेळी पोलिस स्थानकात निरीक्षक किंवा इतर अधिकारी गैरहजर असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करीत, तिथेच ठिय्या मांडला. लोकांच्या कैफियती ऐकण्यास प्रशासनाला रस नाही, असा आरोप स्थानिकांनी केला.
बुधवारी आमदार दिलायला लोबो या सकाळी लोकांसोबत पेलिस स्थानकात आल्या होत्या. मात्र, आज जेव्हा खरी गरज होती, तेव्हा लोकांसोबत त्या आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या हेतूवर लोकांनी संशय व्यक्त केला.
शिवोलीच्या आमदार दिलायला लोबोंनी म्हटले होते की, ध्वनिप्रदूषण बंद होत नसल्यास न्यायालयाच्या दारात जाऊन बसू; परंतु त्या मोर्चातही सहभागी होत नाहीत. अशावेळी त्यांच्याकडून मोठी अपेक्षा कशी बाळगायची?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक साईश किनळेकर यांनी कळंगुटचा रहिवासी असलेल्या सिलरॉय मास्केल (२७) याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने वागातोर, वझरान येथील आपल्या रेस्टॉरंटमध्ये रात्री दहानंतर संगीत वाजवले व ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले होते.
या रेस्टॉरंटमध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्री ११.२० वा.च्या सुमारास कर्णकर्कश आवाजात संगीत वाजल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी डीजे मिक्सरसह डिस्प्ले बोर्ड व स्पीकर जप्त केले. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयिताविरुद्ध ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन व पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.
स्थानिकांनी आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, कानठळ्या बसविणाऱ्या संगीतामुळे आम्हा सर्वांना मागील दोन वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे काही वृद्ध लोक मरण पावले आहेत, तरीही प्रशासनाकडून काहीही केले जात नाही. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. गावात ध्वनिनिरीक्षण प्रणालीशिवाय कार्यरत असलेली सर्व युनिट्स बंद करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
स्थानिक रस्त्यावर उतरून आपल्या मूलभूत अधिकारांसाठी आवाज उठवत आहेत. तरीही सरकारला काहीच ऐकू जात नाही. आम्ही पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच हे गैरप्रकार चालू आहेत.
अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
स्थानिक लोकांच्या लढ्यात सामील होण्यासाठी मी येथे आलो आहे. कारण आमदार दिलायला लोबो यांनी यापूर्वी पक्ष बदलून शिवोलीवासीयांचा विश्वासाघात केला आहे. त्यामुळे पुन्हा त्या विश्वासघात करणार नाहीत याची काय गॅरंटी?
कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.