Study Reveals Goa's Tigers Originate from Mhadei Sanctuary
साखळी: जैविक संपदेत श्रीमंत असलेल्या गोव्याच्या म्हादई अभयारण्यात पुन्हा एकदा पट्टेरी वाघांचा मुक्त संचार व वावर वाढल्याने वाघांचे अस्तित्व हे या जंगलात कायमच असल्याचे सिद्ध झाले आहे. आज कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने केलेल्या संशोधनात गोव्यात आढळणारे वाघ हे गोव्याच्या जंगलातीलच असून त्यांचा जन्म हा म्हादई अभयारण्यातीलच आहे हे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी या व्यक्त केली.
जंगलाच्या शिखरस्थानी असलेल्या वाघाबाबत सरकारकडून सदैव नकारात्मक वक्तव्ये ऐकायला मिळत होती. म्हादई अभयारण्यात आढळणारे वाघ कर्नाटक किंवा महाराष्ट्रातून येतात, असे आतापर्यंत सांगण्यात येत होते. तेही फोल ठरले असून म्हादई अभयारण्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेकदा या वाघांचा वावर बंदिस्त झालेला आहे.
म्हादई अभयारण्यात जन्माला आलेल्या वाघ व वाघिणीचा वावर सध्या या जंगलात आढळत आहे. काहीवेळा अन्नासाठी हे वाघ तिळारीपर्यंत किंवा काळी व्याघ्रक्षेत्रापर्यंत जातात. तसेच कोयनाजवळील सह्याद्री व्याघ्र संरक्षण क्षेत्रात त्यांचा वावर अनेकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळला आहे. प्राणी शास्त्र अभ्यासक संशोधक गिरीश पंजाबी यांनी हल्लीच एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार गोव्यात पाच वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे. आता हे वाघ गोव्याचे निवासी असून महाराष्ट्र किंवा कर्नाटकाचे निवासी आहेत, असा समज करणे अत्यंत चुकीचे ठरेल,असेही केरकर म्हणाले.
या वाघाचा म्हादई अभयारण्यात वावर अनेकवेळा दिसून आला आहे. हल्लीच अंजुणे धरण भागात भ्रमंती केली असता वाघाची ‘विष्ठा’ आढळली आहे. तसेच अंजुणे धरण व चोर्ला घाटात अनेकदा ट्रकचालकांना वाघ दिसलेला आहे. एका भागात तर वाघीण तीन बछड्यांसह कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. चोर्ला घाटातील पणसुलीच्या भागातून कर्नाटकच्या भागात, तर काहीवेळा महाराष्ट्राच्या भागात जाताना वाघ दृष्टीस पडलेला आहे व याचे पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहेत, असेही प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
म्हादई अभयारण्यात वारंवार पट्टेरी वाघांचा वावर भ्रंमतीवेळी आढळून येतो. अंजुणे धरण परिसराबरोबरच वाघ चोर्ला घाटातील पणसुली गावात येतात, याचेही पुरावे सापडले आहेत. गोवा सरकारने अभयारण्यात उभारलेला ‘वॉच टॉवर’ तसेच नियुक्त केलेल्या ‘अँटी पोचिंग स्कॉड’ या माध्यमातूनही म्हादई अभयारण्यात वाघांचा वावर वारंवार आढळून येतो. पण या बाबी पुढे येेऊ नयेत यासाठी सरकारकडून त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो, असेही प्रा. केरकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.