Priya Bicholim Job Scam Accused Still at Large Despite Police Efforts
डिचोली: नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. या प्रकरणी पूजा नाईक या महिलेसह काहीजणांना गजाआड केले आहे. तरीसुद्धा डिचोलीत काहीजणांना लाखो रुपयांना चुना लावणारी ‘प्रिया’ नामक महिला अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
या प्रकरणात संशयित महिलेला मदत केल्याच्या आरोपावरून मास्टरमाईंड पोलिसाला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले. मात्र ती महिला अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही, याबद्दल डिचोलीत
आश्चर्य व्यक्त होत आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरून संशयित प्रिया नाईक या महिलेने डिचोलीतील अनेकांना मिळून लाखो रुपयांची ‘टोपी’ घालून डिचोलीतून पलायन केले आहे.
संशयित प्रिया हिच्या भूलथापांना बळी पडल्याची जाणीव होताच, गेल्या ऑगस्ट महिन्यात तिच्याविरोधात काहींनी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस स्थानकावर धडक देत संशयित प्रियाला अटक करा, अशी मागणी आमिषाला बळी पडलेल्यांनी केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, संशयित प्रिया या महिलेने डिचोलीतील २० हून अधिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. ती आपल्या लहान मुलीसमवेत शहरातील एका फ्लॅटमध्ये राहत होती. डिचोलीतून फरार होताना प्रियाने आपल्या मुलीचे नाव शाळेतून काढले. या महिलेला मदत करणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेतल्यानंतर प्रिया हीसुद्धा पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असे वाटत होते. मात्र तसे काहीच झाले नाही. अजूनही प्रिया मोकाटच आहे.
अनेकांना गंडा घालून सध्या फरारी असलेल्या संशयित महिलेने डिचोलीतील लोकांचा विशेषत: महिलांचा विश्वास संपादन केला. तिने काहींना आपले नाव प्रिया नाईक तर काहींना आपले नाव प्रिया यादव असल्याचे सांगितले. तसेच सावज हेरून नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला. काहीजणांकडून तर या महिलेने आपल्यासह मुलीवर शस्त्रक्रिया करायची आहे असे सांगून पैसे उकळल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला सध्या महाराष्ट्रात लपली असण्याची शक्यता तिच्या आमिषाला बळी पडलेल्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.