पणजी: कला अकादमीचे नूतनीकरण हे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार करण्यात येत आहे. इमारतीच्या मूळ ढाच्याला कोणत्याही स्वरूपात न बदलता अकादमीची दुरुस्ती करून तिच्या सौंदर्यात भर टाकण्यात येत असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
राज्यातील कलावंतांची शिखर संस्था असलेल्या कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, हे काम नियम धाब्यावर बसवून पारदर्शक पद्धतीने करण्यात येत नसल्याचा आरोप चार्ल्स कुरैया फाऊंडेशनने केला होता. अकादमीचे अध्यक्ष तथा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी हा आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले, कला अकादमीच्या मुख्य ढाच्याचे बांधकाम सदोष आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याला गळती लागते. मुख्य सभागृहांमध्ये पाणी साचते.
कला अकादमीमध्ये हे आहेत नवे बदल!
1) दीनानाथ मंगेशकर सभागृहाला नव्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानानुसार जलनिस्सारण आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नवी पंपिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे.
2) कृष्ण कक्षाला (ब्लॅक बॉक्स) मूळ स्वरूपात आणून त्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्यात आली आहे.
3) खुला मंच अधिक उपयोगी करण्याच्या उद्देशाने सध्या काम सुरू असून हा मंच नव्या तंत्रज्ञानानुसार डोमच्या साहाय्याने बंदिस्त करण्यात येणार आहे.
4) डोम तंत्रज्ञानामुळे खुला मंच पावसाळ्यातही वापरता येईल आणि वातानुकुलीतही करण्यात येईल.
2004 पासून दर पावसाळ्यादरम्यान सभागृह बंद ठेवण्याची वेळ येते. यासाठी सरकारने अनेक वेळेला दुरुस्ती आणि डागडुजी केली. मात्र पूर्वीचे डागडुजीचे सर्व काम चुकीच्या पद्धतीने केल्याने मूळ स्ट्रक्चरवर मोठा भार आला आहे. यासाठी इमारतीच्या मूळ ढाच्याला बाधा न पोचवता कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे.
- गोविंद गावडे, मंत्री, कला व संस्कृती खाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.