केपे: केपे मतदारसंघात भाजपचा प्रभाव वाढला असून केप्यात भाजपच्या २० हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठण्यात येईल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी व्यक्त केला आहे.
बेतुल येथे कवळेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप सदस्य नोंदणी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. या मोहिमेचे केपे मतदारसंघाचे प्रभारी सभापती रमेश तवडकर यावेळी उपस्थित होते.
पक्षाने वेळोवेळी सोपवलेली जबाबदारी केपे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी चोखपणे पार पाडली आहे. सदस्य नोंदणी मोहिमेतही केपे मतदारसंघ पक्षासाठी अव्वल कामगिरी बजावेल, असे कवळेकर यांनी सांगितले.
यावेळी खुशाली जोरगो वेळीप, सुरेश केपेकर, शाणू वेळीप, संजना वेळीप, रुपेश पालयेकर, प्रेमराज, संजय वेळीप, प्रभाकर गावकर, दयेश नाईक, सुचिता शिरवईकर, प्रसाद फळदेसाई, शीतल नाईक, देविदास वेळीप, खुशाली कुष्ट वेळीप उपस्थित होते.
कार्यकर्ते ही भाजपची ताकद असून पक्ष म्हणजे आपली हक्काची संस्था असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बाळगावी व सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले. मागच्या विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात थोडी कसर राहिली. ही कसर भरून काढून पुढील निवडणुकीत केपे मतदारसंघ काबीज करण्याची कामगिरी कार्यकर्ते बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.