Salcete: सत्तरी तालुक्यामध्ये दर्जेदार कलाकार आहेत. मात्र त्यांना सातत्याने उभारी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सत्तरीतील कलाकारांना रवींद्र भवन नसल्याने साखळी, फोंडा आदी भागात जावे लागते. त्यामुळे सत्तरी तालुक्यातच रवींद भवन उभारावे, अशी मागणी येथील कलाप्रेमींकडून होत आहे. याचीच दखल घेत पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी सत्तरीत लवकरच रवींद्र भवन अस्तित्वात येईल, असे आश्वासन दिले आहे.
म्हाऊस पंचायत क्षेत्रातील कोपार्डे या ठिकाणी पशुपैदास केंद्राच्या परिसरात रवींद्र भवनची संकल्पना साकार करण्यासाठी पावले उचललेली आहेत. या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार केलेला आहे.
पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सहकार्य केल्यास 2023 मध्ये रवींद्र भवनाची पायाभरणी करण्यात येईल. हे स्वप्न साकार झाल्यास सत्तरी तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार असून यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण होईल,अशी आशा डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केली.
डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, की सत्तरीच्या शेजारी डिचोली तालुक्यात साखळी या ठिकाणी रवींद्र भवन आहे. मात्र सत्तरीतील कलाकारांना हा प्रकल्प दूर होत असल्यामुळे कलेच्या विकासात चालना मिळत नाही. सत्तरीत रवींद्र भवनची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडेही ही मागणी कलाकारांनी केली होती.
कोपार्डे येथील पशुपैदास केंद्राच्या जमिनीपैकी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यास तिथे सुंदर रवींद्र भवनाची वास्तू साकार होऊ शकते. यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्या उपस्थितीत झाली.
राधिका सावंत, उपसरपंच म्हाऊस-
कोपार्डे येथे रवींद्र भवन झाल्यास काही प्रमाणात येथील लोकांना रोजगार मिळू शकतो. तसेच आमच्या पंचायतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी आमदार प्रयत्न करत असून सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
सयाजी सावंत, पंचसदस्य-
कोपार्डे येथील विनावापर असलेली सरकारी जमीन रवींद्र भवनासाठी योग्य असून डाॅ. दिव्या राणे आमचे स्वप्न लवकर पुर्ण करतील यात काही शंका नाही. सर्वांनी मतभेद विसरुन सहकार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पातून कलाकारांना एक चांगली संधी प्राप्त होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.