
फोंडा: माजी मुख्यमंत्री, मंत्री तथा बहुजन समाजाचे मोठे नेते रवी नाईक (वय ७९) यांच्या पार्थिवावर हजारोंच्या गर्दीत बुधवारी सायंकाळी खडपाबांध–फोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुजनांचा कैवारी ठरलेल्या रवी नाईक यांना निरोप देताना त्यांच्या हितचिंतकांनी हंबरडा फोडला.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली.
कृषिमंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री फोंडा येथील एका खासगी इस्पितळात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त राज्यभरात पसरताच बुधवारी सकाळपासून त्यांच्या खडपाबांध येथील घरासमोर राजकीय नेते आणि नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंतिम यात्रा काढण्यात आली. त्यानंतर ईश्वर पार्वती देवस्थानाजवळील जागेत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले दोन दिवस रवी नाईक यांनी कार्यक्रमांना जाणे टाळले होते. बुधवारी आरोग्याच्या तपासणीसाठी ते बंगळुरूला रवाना होणार होते. परंतु, मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना फोंड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा, पुत्र रितेश व रॉय, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
खाशांचे डोळे पाणावले....!
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी रवी नाईक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रवी नाईक आणि प्रतापसिंह राणे यांनी राजकारणात बरीच वर्षे एकत्रित काढली आहेत. प्रतापसिंग राणे यांना त्यांचे पुत्र मंत्री विश्वजीत राणे हे स्वतः घेऊन रवी नाईक यांच्या निवासस्थानी आले. पुष्पहार वाहिल्यानंतर प्रतापसिंग राणे काही क्षण स्तब्ध उभे राहिले आणि रवींकडे एकटक पाहत राहिले, त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रवी नाईक यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास थक्क करणारा आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्री या प्रवासात लोकसभा निवडणुकीत ते एकदा उत्तर गोव्यातून खासदारही झाले. राजकीय प्रवासात त्यांनी नेहमीच गोवा आणि ‘गोंयकारपण’ अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला.
सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर त्यांनी भर दिला. त्यातूनच कला संस्कृती खाते, ओबीसी आयुक्तालयाचा जन्म झाला, ज्यामुळे प्रशासन सुलभ झाले. फोंड्याचा सर्वांगीण विकास साधत असतानाच राज्याच्या विकासावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
माजी मुख्यमंत्री तथा मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्य सरकारकडून तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सरकारने बुधवारी सर्व शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामही बंद ठेवले.
मुख्यमंत्री दिवसभर खडपाबांधमध्ये
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सकाळी दहा वाजता खडपाबांध - फोंडा येथे रवी नाईक यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते, ते दिवसभर तेथेच मुक्काम ठोकून होते. खडपाबांध येथे अंत्यसंस्कारासाठी रवी नाईक यांचे पार्थिव नेल्यानंतर स्मशानभूमीतही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.