फोंडा: फोंड्याचे आमदार तथा मंत्री रवी नाईक व त्यांचे मोठे सुपुत्र नगरसेवक रितेश नाईक द्वयींनी नेहमीप्रमाणे गणेशभक्तांना चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसे बॅनर जागोजागी झळकले आहेत; परंतु त्यावर भाजपचे कमळ नाही. परिणामी राजकीय निरीक्षक तर्क लढवत असून, सामान्यांतून निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.
फोंडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, मगो यांच्यातील कुरघोडी आणि शहकाटशहाचे राजकारण रंगते. मात्र, रवी नाईक भाजपवासी झाल्यानंतर त्यात भाजपचा सहभाग दिसू लागला. आता चतुर्थीचा सण तोंडावर असताना फोंड्यात राजकीय बॅनरबाजीला ऊत आला आहे. त्यात खुद्द रवी नाईक, रितेश नाईक तसेच भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि पुढील विधानसभेसाठी आतापासूनच जोरदार ‘बॅटिंग’ सुरू केलेले विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी आघाडीवर आहेत.
फोंड्यातील बॅनरबाजीची आपल्याला काहीच कल्पना नाही. माझ्यामते चिन्हापेक्षा आपले शहरात आणि प्रभागांमध्ये चाललेले विकासकार्य महत्त्वाचे आहे. माझ्या प्रभागामध्ये मी वडिलांच्यामार्फत कामे मार्गी लावत आहे. भारतीय जनता पक्षाकडून आणि पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला चांगले सहकार्य अन् पाठिंबा मिळत आहे. फोंडा शहर आणि पालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीसाठी मी उपलब्ध असतो आणि यापुढेही उपलब्ध राहीन, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री रवी नाईक यांचे धाकटे सुपुत्र तथा नगरसेवक रॉय नाईक यांनी दिली.
रवी नाईक यांना ठाऊक आहे की, फोंड्यात रितेश नाईक यांना भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक जिंकण्याची अधिक संधी आहे. रितेश यांचे जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभेसाठी ‘लॉन्चिंग’ करण्याचा प्रयत्न केला, तर फोंडा भारतीय जनता पक्षामधील स्थानिक नेतेच रितेश नाईक यांचा पाडाव घडवून आणतील. त्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत रितेश रवी नाईक हे काँग्रेसवासी झालेले आपल्याला पहायला मिळतील, अशी प्रतिक्रिया फोंड्यातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मिलिंद म्हाडगुत यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारीचे प्रबळ दावेदार विश्वनाथ (अपूर्व) दळवींची संधी रवी नाईकांमुळे हुकली होती.
पक्ष आदेशाचे पालन करत रवींच्या विजयात दळवींनी मोठा वाटा उचलला होता.
मात्र, २०२७च्या निवडणुकीत फोंड्यातून विधानसभा लढविण्याचा चंग बांधलेल्या विश्वनाथ दळवींना दिवसेंदिवस फोंड्यात वाढता पाठींबा मिळताना दिसतोय.
आश्चर्याची बाब म्हणजे, भाजप व्यतिरिक्त फोंड्यात मोठा प्रभाव असलेल्या मगोचे स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकारी दळवींच्या कार्यक्रमांत मंचावर खुलेआम हजेरी लावत आहेत. मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्यावरील काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची अंतर्गत नाराजी सध्या दळवींना फायद्याची ठरताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.