Ranbir Kapoor At IFFI 2024 About Raj Kappor Film Festival
पणजी : ग्रेट शोमन राज कपूर यांच्या आठवणींना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज उजाळा देण्यात आला. त्यांच्याविषयी नातू रणबीर कपूर याच्या तोंडून अनेक किस्से ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी रविवारी अफाट गर्दी केली होती. रणबीरने राज कपूर यांच्या चित्रपटांच्या पुनर्संचलित आवृत्त्या सादर करण्यासाठी १३ ते १५ डिसेंबरदरम्यान एक चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे सांगून प्रेक्षकांना खूश केले.
सध्या १० चित्रपट पुनर्संचयित केले असून इतर चित्रपटही पुनर्संचयित केले जाणार असल्याचे रणबीरने स्पष्ट केले. दिग्दर्शक राहुल रवैल यांच्याशी झालेल्या संवादावेळी रणबीरने आपले आजोबा, दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.
रणबीरने त्याच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, मी लहान असल्याने राज कपूर यांचे महत्त्व त्याकाळी समजले नव्हते. मात्र, जेव्हा त्यांचे निधन झाले आणि असंख्य लोक त्यांचे अंतिम दर्शन घ्यायला आले, तेव्हा हा माणूस किती मोठा होता आणि त्यांच्याविषयी लोकांच्या मनात प्रचंड आदर होता, हे समजले.
रणबीर कपूर हा उत्तम सिने अभिनेता आहे आणि त्याने आपल्या विरळा अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. चित्रपट दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का असे विचारले असता, दिग्दर्शक व्हायची माझी इच्छा असल्याचे रणबीरने सांगितले. एखादी प्रभावी कथा मिळाली तर मी निश्चित दिग्दर्शन करेन, असे तो म्हणाला.
रणबीर कपूरचे चाहते त्याला भेटायला आणि त्याच्यासोबत सेल्फी काढायला खूपच उत्सुक होते; परंतु त्याच्याभोवती सुरक्षेचा घेरा मजबूत असल्याने कुणालाही सेल्फी काढता आले नाहीत. त्यामुळे चाहते नाराज झाल्याचे दिसून आले. त्याला ऐकण्याची उत्सुकता सर्वांचीच होती, ती इच्छा पूर्ण झाली. मात्र, त्याच्यासोबत फोटो काढता आला नाही.
साठीच्या जवळ एखादी व्यक्ती पोहोचली की, त्याला युवकांच्या गोष्टी समजत नाहीत किंवा पटत नाहीत असा एक समज आहे. तरीही राज कपूर यांनी साठीच्या वयात युवकांना आवडणारे आणि त्यांच्या वयानुसार भावणारे चित्रपट निर्माण केले. विशेषतः ‘श्री ४२०’ आणि ‘जागते रहो’ यासारख्या चित्रपटांमधून तरुण पिढीशी ते कनेक्ट झाले, असे रणबीर म्हणाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.