पणजी: 'ॲनिमल', 'वेक अप सिड', 'ये जवानी है दिवानी' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला रणबीर कपूर सध्या गोव्यात आहे. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी रणबीर गोव्यात पोहोचला आहे.
यावेळी त्याने चित्रपट निर्माते राहुल रवैल यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, रणबीरने एक मोठी घोषणा केली. येत्या 14 डिसेंबरला राज कपूर यांची 100 वी जयंती असून या जंयतीनिमित्त आम्ही 13 ते 15 डिसेंबर दरम्यान राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करणार आहोत, अशी माहिती रणबीरने दिली.
दरम्यान, या फेस्टिव्हलसाठी रणबीरचे काका कुणाल कपूर, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC), फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NFAI) आणि फिल्म हेरिटेज ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे राज कपूर यांच्या चित्रपटांना री-स्टोर करण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत त्यांचे 10 चित्रपट री-स्टोर झाले आहेत.
या प्रोजेक्टबद्दल बोलताना रणबीर पुढे म्हणाला की, "राज कपूर यांच्या चित्रपटांबाबत असे बरेच लोक आहेत ज्यांनी त्यांचे काम पाहिलेले नाही. उदाहरणार्थ, जेव्हा मी आलियाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने मला विचारले की, किशोर कुमार कोण आहेत?' हे जीवनाचे एक चक्र आहे. जुने कलाकार विसरले जातात आणि नवीन कलाकार येतात.
संवादादरम्यान, रणबीरला पुढे विचारण्यात आले की, तुला आजोबांच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा आहे. यावर रणबीर म्हणाला की, "मी रिमेकवर विश्वास ठेवत नाही. एखादा चित्रपट त्याच्या गुणवत्तेनुसार बनवला जातो.
त्यामुळे त्याच्या मूळ कलात्मक ढाचाला धक्का लागता कामा नये, खासकरुन राज कपूर यांच्या चित्रपटांबाबत मी हे बोलतो आहे. परंतु मला 'श्री 420' चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा आहे. हा माझा आवडता चित्रपट आहे. रणबीर पुढे म्हणाला की, असाच 'संगम' नावाचा आणखी एक चित्रपट आहे, ज्याचा रिमेक बनवण्याची माझी इच्छा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.