धुळेर - म्हापसा येथे काही दिवसांपूर्वी, चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. रस्त्यांवरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी जेट - पॅचरच्या साहाय्याने चार दिवसांपूर्वीच या रस्त्यावरील खड्डे बुजविले. मात्र, तेथे पुन्हा खड्डे पडले असून आता या रस्त्याची स्थिती आणखीनच बिकट बनली आहे. या जेट - पॅचरचा विषय नुकताच विधानसभा अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी मांडला होता. तसेच, बुजवलेले खड्डे दोन दिवसांत पुन्हा अवतरत असल्यास अशा कुचकामी जेट-पॅचरची खरीच आवश्यकता आहे का? हा संशोधनाचा विषय बनतो. याशिवाय एक खड्डा बुजविण्यास १६ हजार लागतात. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा होणारा हा चुराडा तसेच लोकांना होणाऱ्या मानसिक त्रासाची भरपाई प्रशासकीय अधिकारी आता स्वतःच्या खिशातून भरणार की कंत्राटदारांकडून वसूल करणार? हे सरकारने एकदाचे सांगावे.∙∙∙
राज्याचे सभापती रमेश तवडकर यांनी विविध समाजकार्यांद्वारे समाजात आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. हल्लीच झालेल्या विधानसभेत त्यांनी केलेली कामगिरीही उल्लेखनीय होती. त्याची पोचपावती विरोधकांनीही दिली आहे. त्यांनी मतभेद न करता विरोधकांना चर्चा करण्यास तसेच विषय मांडण्यास समान संधी दिली असा दावा करून गोवा फॉरवर्डने त्यांचे अभिनंदनही केले आहे. विधानसभेच्या सुरवातीला लक्षवेधी सूचना सत्ताधारी व विरोधकांच्या समान असाव्यात असे कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिले जात असल्याचे विरोधकांना निदर्शनास आणून दिल्यावर ही चूक सुधारली गेली. गोव्यातील काही गरजूंना श्रमधाम संकल्पनेतून स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्यांच्या या संकल्पनेबाबत राज्यात कौतुक होत आहे. वायनाड येथेही त्यांनी गोव्यातील कार्यकर्त्यांच्या मदतीने तेथील लोकांसाठी खारीचा वाटा उचलण्याचे ध्येय ठेवून त्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यामुळे सभापती तवडकर यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. मात्र, त्यातून इतर मंत्री वा आमदारांना अजून स्फूर्ती मिळालेली दिसत नाही. ∙∙∙
माजी नौदल अधिकारी असलेले दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस दिल्लीत सराईतपणे वावरत आहेत. ते पहिल्यांदाच खासदार झाले असले तरी केंद्रीयमंत्र्यांना भेटतात. ते एकटे फिरत असतात. गोव्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. निर्भीडपणे विषयाची मांडणी ते करतात. त्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनाही निवेदने देणे त्यांनी सुरू केले आहे. विरियातो यांचे हे पहिलेच संसदीय अधिवेशन असले तरी कुठेही न बुजता त्यांनी स्वतंत्र अस्तित्व दाखवून देणे सुरू केले आहे. गोवा म्हणजे विरियातो असे समीकरण दिल्ली दरबारी तयार करण्यासाठी त्यांनी ही दमदार पावले टाकणे सुरू केले आहे. राज्यसभेचे खासदार असलेले सदानंद शेट तानावडे यांच्याशी विरियातो यांची स्पर्धा आहे यात सध्या विरियातो यांची आघाडी जाणवल्याशिवाय राहत नाही.∙∙∙
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व आमदार जीत आरोलकर हे सध्या खासदार सदानंद शेट तानावडे यांचे दिल्लीतील पाहुणे झाले आहेत. शुक्रवारी संसद भवन पाहण्यासाठी ते तानावडेंकडे पोचले. काही मंत्र्यांना भेटण्याची त्यांची इच्छा होती, तसा रेटाही तानावडे यांच्यामागे होता. तानावडे यांनी मग दुधाची तहान ताकावर भागवतात तसे या द्वयींची भेट खासदार सुधा मूर्ती, सुधांशू त्रिवेदी व गोविंद धोलाकीया यांच्याशी घडवून आणली. संसदेचे कामकाज शुक्रवारी संपले असले, तरी तानावडे आणखी दोन दिवस पक्षाच्या बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत असतील. त्या दरम्यान हे दोन्ही नेते तानावडेंकडून कोणता हट्ट पूर्ण करून घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙
मडगावचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सोपो वसुलीच्या कामासाठी कोणालाच ठेकेदार मिळत नाही. तो का मिळत नाही याचे उत्तर शोधण्याच्या फंदात मात्र कोणीच पडत नाही. मागे नगरपालिकेला हा अनुभव येत होता व आता एसजीपीडीए म्हणजे दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणालाही त्याची लागण झालेली आढळून येते अशी चर्चा मडगावात सुरू झालेली आहे. नगरपालिकेला अगोदर सोपो वसुलीची पावणी वेळेवर करता येत नव्हती, नंतर त्या मागील विविध कारणे सांगितली जात असत. नंतर पूर्वीच्या ठेकेदाराला नाममात्र रक्कम वाढवून देऊन ते काम करायला सांगितले जात असे वा पालिका कर्मचारीच सोपो गोळा करत त्यात घोळच अधिक असे अशी तक्रार नगरसेवकच करत. आता एसजीपीडीएचेही तसेच झाले आहे. तेथे नियुक्त ठेकेदार तो वसूल करे व त्यात कोणतेच ताळतंत्र नसे. आता प्राधिकरणाने ऑनलाइन निविदा मागवून हे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला तरी ठेकेदार मिळो अशी प्रार्थना तेथील घाऊक मासळी विक्रेते करत आहेत.∙∙∙
दवर्ली मारुती मंदिराजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा उपस्थित झाला आहे. तेथे तीन महिन्यांपूर्वी उभारलेल्या या पुतळ्याला मारुती मंदिर ट्रस्टने विरोध करून त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. प्रत्यक्षात हा आरियाल येथे यापूर्वी उपस्थित झाला तसा वाद नाही, तर मिळत असलेल्या माहितीप्रमाणे अहंकारातून निर्माण झालेला मुद्दा आहे. येथील दोन्ही गट हे एकाच धर्मातील आहेत असे नव्हे, तर एका राष्ट्रीय पक्षांतीलही आहेत. या पुतळ्याचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते झाले होते हेही महत्त्वाचे. ट्रस्टने सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केलेला असला, तरी प्रत्यक्षात ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाची आहे व तेथील सौंदर्यीकरणही पुतळा बसविलेल्या मंडळीने केले होते असा दावा ते करतात व त्यामुळे सौंदर्यीकरणावेळी गप्प बसलेले पुतळ्याला का विरोध करतात याचे उत्तर मात्र मिळेनासे झाले आहे.∙∙∙
गोव्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविलेले राजकारणी म्हणजे स्व. अनंत नरसिंह ऊर्फ बाबू नायक. मडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतानाच बाबू नायकांनी गोव्याचे अनेक प्रश्न धसास लावले. आपल्या मुलीचा लग्नसोहळा अर्ध्यावरच सोडून बाबू नायकांनी कुठ्ठाळी फेरीबोटीत इंदिरा गांधींना भेटून युगोच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणाची बोलणी यशस्वी केली हे अजूनही लोकांना आठवते. आता याच बाबू नायकांचे नातू प्रभव हे २०२७ मध्ये मडगाव मतदारसंघाचे उमेदवार असतील व ते आमदारच नव्हे, तर मंत्री बनतील अशी भविष्यवाणी गुरुप्रसाद महाराजांनी करून तशी पोस्ट समाज माध्यमावर टाकली आहे. एकेकाळी बाबूंनी मडगावच्या बाबांचा पराभव केला होता. आता त्यांचे नातू इतिहासाची पुनरावृत्ती करतात का ते येणारा काळच सांगेल. ∙∙∙
मोपा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचा प्रश्न आता गाजू लागला आहे. गेली अनेक वर्षे या शाळा इमारतीकडे कोणाचेही लक्ष नव्हते. शाळा दुरुस्त व्हावी म्हणून लोकांनी सरकार दरबारी आपले गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे दुर्लक्षित अशी शाळा इमारत काही ग्रामस्थांनी आता दुरुस्त केली. त्याआधी प्राथमिक विद्यालयासाठी नवीन इमारतही बांधण्यात आलेली आहे. जुन्या इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर आता ती जागा देवस्थानची असल्याचा दावा करण्यासाठी ग्रामस्थ पुढे आले आहेत. मोपा येथील सरकारी शाळा इमारतीची दुरुस्ती झाली आणि या गावात नवा वाद आता उफाळून आला आहे. आता जी जागा देवस्थानची आहे तेथील देवस्थान तरी कोणाली सुबुध्दी देतोय हे पहावे लागेल.∙∙∙
गोव्यातील एसटींना आरक्षण देणारे विधेयक लोकसभेच्या याच अधिवेशनात संमत केले जाईल आणि एसटींना राजकीय आरक्षणाची दारे खुली होतील अशी हवा भाजपने तयार केली होती, पण काल हे विधेयक चर्चेसाठी आलेच नाही आणि सर्वांच्या आशेवर पाणी फेरले गेले. हे विधेयक म्हणजे गोव्यातील एसटींना दाखविलेले आरक्षणाचे गाजरच होते का? २०१३ साली भाजपने याविषयी गोव्यातील एसटींना तीन पाने दाखवली होती. याहीवेळी तसेच केले जाणार तर नाही ना?∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.