"पावसाळा सुरू झाला, पण दुरुस्ती कधी?" ताळगाव ते वाळपई अनेक शाळांची दयनीय अवस्था; दुरुस्तीअभावी पालकांचा संताप

Goa School Reopening: गोव्यात ४ जून पासून शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अनेक शाळांमधील दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला
Goa school infrastructure
Goa school infrastructureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात ४ जून पासून शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अनेक शाळांमधील दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या शाळांच्या छप्परांची दुरुस्ती अजूनही अपूर्ण राहिली असल्याने कोणताही धोका पत्करणार नाही, असे आश्वासन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिलेय.राज्यात ज्या शाळांना दुरुस्तीची गरज आहे अशा शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलाय.

ताळगाव ते वाळपई: अनेक शाळांची दयनीय अवस्था

ताळगाव येथील एका शाळेच्या छप्पराचे काम अपूर्ण राहण्याचे कारण म्हणजे, दोन दिवसांपूर्वी काम सुरू असताना एक कामगार खाली पडला. त्यामुळे काम थांबवावे लागले. यानंतर या शाळेचे वर्ग काही दिवसांसाठी समोरच्या पंचायत सभागृहात चालवले जाणार असल्याची माहिती उघड झाली आहे.

दुसरीकडे, वाळपई येथील गुंडेलवाडा वेळूस येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या छप्पराची दुरुस्ती महिनाभरापासून रखडली असल्याने विद्यार्थ्यांना भर पावसात शिकण्याची वेळ आली असून, शाळा सुरू होऊनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुरुस्तीच्या तयारीसाठी वर्गातील सर्व साहित्य बाहेर काढण्यात आले होते, मात्र काम सुरूच न झाल्यामुळे पालकांनी मुलांची तात्पुरती सोय करत साहित्य पुन्हा वर्गात नेले आहे. गेल्या वर्षी छप्परावर ताडपत्री टाकून तात्पुरती सोय करण्यात आली होती, यंदा मात्र तीही व्यवस्था नाही.

या शाळेच्या छप्पर व भिंतींना तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पालकांनी केलाय आणि सोबतच सरकारचा मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. या शाळेत पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग चालतात.

Goa school infrastructure
Goa School Reopening: 'बॅक टू स्कूल' उद्यापासून राज्यातील शाळा सुरू; शालेय साहित्याच्या खरेदीची गजबजली बाजारपेठ

केवळ दोन खोल्यांत शिक्षण घेतले जात असल्याने दोन वर्गांना एकाच खोलीत बसवले जाते. पालकांचा ठाम दावा आहे की, केवळ दुरुस्ती नव्हे, तर शाळेसाठी नवीन इमारतीची अत्यंत गरज आहे. "पावसाळा सुरू झाला, पण दुरुस्ती कधी होणार?" असा सवाल पालकांनी प्रशासनाला केला आहे.

याचबरोबर, तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीलाही गळती लागली असून, तिची स्थिती गंभीर आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे शाळेतील व अंगणवाडीतील मुलांवर छप्पर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याउलट, वाजे-शिरोडा येथील बंद असलेल्या प्राथमिक विद्यालयाच्या शाळेचे काम मंगळवारी पूर्ण झाले आहे. दुसऱ्या खोलीत सुरु असलेल्या अंगणवाडीमधील ७-८ मुलांना आज जवळील भाड्याच्या खोलीत स्थलांतरित करण्यात आले आहे.

दुरुस्तीचा वेग संथ: शिक्षण संचालक झिंगडे यांची कबुली

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी माहिती दिली की, एकूण ३८ शाळांच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यापैकी १८ शाळांचे काम पूर्ण झाले असून, अजून काही कामे पूर्ण झाली आहेत. कामाचा अंदाज घेतला जात आहे. छप्पर व इतर दुरुस्तीनंतर सफाईचे काम सुरू होईल. जरी १८ शाळांचे काम पूर्ण झाले असले तरी, सुमारे १५-२० शाळांमध्ये अजूनही किरकोळ कामे प्रलंबित आहेत, असे त्यांनी कबूल केले. ताळगाव येथील प्राथमिक शाळेत जोरदार पावसामुळे दुरुस्ती थांबली होती, तसेच एक कामगार उंचीवरून पडला आणि दुसऱ्याला विजेचा धक्का लागल्यानेही कामात अडथळा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

झिंगडे यांनी शाळा व्यवस्थापनांना वेळेसंदर्भात मोकळीक दिली आहे. मुलांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वर्ग सुरू करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. "दोन दिवस उशिरा शाळा सुरू झाल्या तरी चालतील," असेही शाळांना सांगण्यात आले असल्याचे झिंगडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com