Konkan Railway: कॅसलरॉक-कुळे लोहमार्ग 90 दिवस राहणार बंद; कोकण आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Castlerock to Kulem Railway Track: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी येथील मुख्यालयातील प्रधान मुख्य कार्यचालन व्यवस्थापकांनी जारी केलेल्या पत्रानुसार टीआरटी व बीसीएम ही कामे ९० दिवसांत केली जाणार आहेत.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Castlerock to Kulem Railway Track Doublening

पणजी: गोवा आणि कर्नाटकातील पश्चिम घाटातील कॅसलरॉक ते कुळे दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय सशक्त समितीने केलेली शिफारस आणि या शिफारशींना पाठिंबा देण्यासाठी संशोधक आणि वैज्ञानिकांनी पाठविलेले संयुक्त निवेदन यांमुळे हे काम लांबणीवर टाकण्याचा निर्णय भारतीय रेल्वे मंडळाच्या पातळीवर दिल्लीत घेण्यात आला आहे.

याऐवजी या मार्गावरील लोहमार्गाचे रूळ बदलणे आणि खडी बदलण्याचे काम हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कॅसलरॉक ते कुळे हा लोहमार्ग १७ जानेवारीपासून १६ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या कामाला रेल्वे मंडळाने मान्यता दिली आहे.(अंतर्गत पत्रव्यवहाराची प्रत ‘गोमन्तक’ला प्राप्त झाली आहे). कॅसलरॉक आणि कुळे रेल्वे स्थानकांदरम्यानचे अंतर सुमारे १४ किलोमीटर आहे. हा मार्ग पश्चिम घाटातील डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसरातून जातो. त्यामुळे तो प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी येथील मुख्यालयातील प्रधान मुख्य कार्यचालन व्यवस्थापकांनी जारी केलेल्या पत्रानुसार टीआरटी व बीसीएम ही कामे ९० दिवसांत केली जाणार आहेत. टीआरटी म्हणजे रेल्वेच्या जुन्या आणि खराब झालेले रूळ काढून नवीन रूळ बसविण्याचे काम. यामुळे रेल्वे रूळांचे आयुष्यमान वाढते आणि गाड्यांच्या सुरक्षित व वेगवान प्रवासासाठी मदत होते.

याचा अर्थ भविष्यात रेल्वे मार्ग दुपरीकरण केले गेले नाही तरी या टप्प्यातील लोहमार्ग पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सज्ज असला पाहिजे. त्यांच्या पत्रातील दुसरे काम म्हणजे ‘बीसीएम’ याचा अर्थ रेल्वे रूळांखालील खडी साफ करण्याचे काम. वेळोवेळी खडी माती आणि कचऱ्यामुळे खराब होते. त्यामुळे लोहमार्गाची ताकद कमी होऊ शकते.

बीसीएम यंत्र ती खडी स्वच्छ करून पुन्हा वापरण्यास सक्षम करते. याचा उपयोग लोहमार्गाच्या स्थिरतेसाठी आणि रेल्वे गाड्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी महत्त्वाचा आहे. यामुळे दुहेरीकरणाचा निर्णय लांबणीवर पडल्यातच जमा झाला आहे.

रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण रद्द करण्याची शिफारस केंद्रीय सशक्त समितीने केल्यावर त्या शिफारशींना पाठिंबा देण्यासाठी संशोधक आणि वैज्ञानिकांनी संयुक्त निवेदन पाठविले होते. त्यांनी पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या संभाव्य तोट्यांकडे लक्ष वेधले होते. गोवा आणि कर्नाटकातील पश्चिम घाटातील हा प्रकल्प पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत विनाशकारी ठरू शकतो. त्यामुळे प्रकल्प संपूर्णपणे रद्द करण्याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते.

या दुपदरीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ आणि सद्यस्थितीबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. अशा प्रकल्पांसाठी अनेकदा विस्तृत नियोजन, पर्यावरणीय परवानग्या आणि निधीची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांची पूर्तता वेळखाऊ ठरू शकते, हेही कारण दुपदरीकरण लांबणीवर टाकण्यामागे असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Konkan Railway
Konkan Railway: कोकण रेल्‍वेला कारणे दाखवा नोटीस! बेकायदेशीर डाेंगरकापणीची तक्रार; कुंकळ्ळी येथील प्रकार

विरोधामुळे लटकणार दुपदरीकरण प्रकल्प

कुळे ते कॅसलरॉक या लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. हा टप्पा भूमिगत पद्धतीने केला जाणार असल्याचे नंतर सांगण्यात आले. मात्र, नंतर दुपदरीकरणाचे घोडे दामटण्यात आले. त्याला विरोध होऊ लागल्याने तो प्रकल्प पुढे ढकलण्याचे ठरविल्याची माहिती मिळाली आहे.

Konkan Railway
Goa Railway: वास्को-चेन्नई, मिरज रेल्वे सुरू करा! सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी; ‘दूधसागर एक्सप्रेस’साठी आग्रह

असे असेल नवे वेळापत्रक

१. या कामामुळे १६ जानेवारी ते १५ एप्रिलदरम्यानची शालीमार (पश्चिम बंगाल) ते वास्को एक्सप्रेस हुबळीपर्यंतच धावणार आहे.

२.१९ जानेवारी ते १८ एप्रिलदरम्यान वास्को ते शालीमार एक्सप्रेस वास्कोऐवजी हुबळी येथूनच सुटणार आहे.

३. हैदराबाद-वास्को एक्सप्रेस १६ जानेवारी ते १० एप्रिलपर्यंत हुबळीपर्यंतच धावेल, तर परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे १७ जानेवारी ते ११ एप्रिलदरम्यान हुबळीहूनच उपलब्ध असेल.

४. सिकंदराबाद-वास्को एक्सप्रेस १७ जानेवारी ते १६ एप्रिलपर्यंत हुबळी येथेच थांबेल. १८ जानेवारी ते १७ एप्रिलपर्यंत परतीची एक्सप्रेस हुबळी येथूनच सुटणार आहे.

५. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस १८ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत, एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस २० जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत रोहा, पनवेलमार्गे धावणार आहे.

६. वास्को-वेरावल एक्सप्रेस २० जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत तर वेरावल-वास्को एक्सप्रेस २१ जानेवारी ते १५ एप्रिलपर्यंत मडगाव मंगळूर, इरोड, शोरनूरमार्गे धावेेल.

अभयारण्यात संचाराचा पहिला हक्क वन्यजीवांचा असतो. रेल्वे ते मानत नाही. मुख्य वन्यजीव संरक्षक, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळ, स्थायी समिती आदींची मान्यता अभयारण्यातील प्रकल्पांसाठी लागते. रेल्वेने सध्याच्या लोहमार्गावरील रूळ बदलण्याचे ठरविले असले तरी लोहमार्ग दुपदरीकरण रद्द झाल्याचे अधिकृतपणे त्यांनी जाहीर केलेले नाही.

क्लॉड अल्वारिस, संचालक, गोवा फाऊंडेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com