
Vasco to Chennai Belgaum Miraj Railway
पणजी: वास्को-चेन्नई, वास्को-बेळगाव, वास्को-मिरज या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आज हुबळी येथे झालेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रीय प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. आमदार नीलेश काब्राल आणि सावर्डे-कुडचडे रेल्वे प्रवासी संघटनेचे देवानंद नाईक भंडारी या बैठकीस गोव्यातून उपस्थित होते. वास्को-चेन्नई एक्सप्रेसचे नामकरण ‘दूधसागर एक्सप्रेस’ असे करावे, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली.
रेल्वेचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रवासी सुविधा, रेल्वे सेवा व पायाभूत सुविधा विकासाशी संबंधित मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला जी. के. अदप्पगौडर, सिद्धरामय्या पी. सौंशीमठ, के.बी. लिंगराजू, पी. श्रीनिवास मूर्ती, सुशील नोवल, महेंद्र एच. सिंघी, बाबुलाल जी. जैन, डॉ. लक्ष्मण एच., कॅप्टन हिमांशू शेखर आदी उपस्थित होते.
श्रीवास्तव यांनी सांगितले, की सुरक्षा ही दक्षिण पश्चिम रेल्वेची प्रमुख प्राथमिकता राहिली असून, यावर्षी एकही सिग्नल पासिंग ॲट डेंजर प्रकरण नोंदले गेले नाही. मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी ८६.४६ टक्के वेळेवरता मिळवली असून, भारतीय रेल्वेत चौथा क्रमांक मिळवला आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत २८.३४ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली. प्रवासी महसुलात १ हजार ६२९.४५ कोटी रुपयांची नोंद झाली, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. जुलै मध्ये २८६.३ कोटी रुपयांचा सर्वोच्च मासिक प्रवासी महसूल मिळवण्यात आला, जो दक्षिण पश्चिम रेल्वेच्या स्थापनेपासून आजवरचा सर्वोच्च आहे.
महाव्यवस्थापकांनी ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत स्थानके सुविधांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत ४७ टर्मिनल्सवर डायनॅमिक क्यूआर कोड सुरू करण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील. तसेच, ९ एक्सप्रेस गाड्यांचे विस्तारण, ४०४ विशेष गाड्यांचे संचालन आणि सणासुदीच्या काळात १ हजार ४२९ अतिरिक्त डबे जोडल्याचा उल्लेख केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.