Rafale Marine Flight Tests: गोव्यात 'राफेल मरिन'ची पुन्हा चाचणी! 'आयएनएस विक्रांत'वर तैनातीपूर्वी महत्त्वाचे परीक्षण

Rafale Marine Goa Testing: भारतीय नौदलाच्या हवाई युद्धक्षमतेत भर घालणाऱ्या फ्रान्सनिर्मित ‘राफेल मरिन’ या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचण्या दाबोळी येथील हंस नौदल तळावर सुरू झाल्या आहेत.
Rafale Marine Goa Testing
Rafale Marine Flight TestsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भारतीय नौदलाच्या हवाई युद्धक्षमतेत भर घालणाऱ्या फ्रान्सनिर्मित ‘राफेल मरिन’ या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचण्या दाबोळी येथील हंस नौदल तळावर सुरू झाल्या आहेत. तळावरील किनारपट्टीस्थित चाचणी सुविधेत हे परीक्षण सुरू असून, विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’वरून या विमानाचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पडताळणी केली जात आहे.

नौदलात या विमानांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण करणे आणि समुद्रात कार्यरत असलेल्या युद्धनौकेवर सुरक्षितपणे उतरवणे, यासाठी विशिष्ट तांत्रिक क्षमता आवश्यक असतात. त्यामुळे राफेल मरिन विमान भारतीय नौदलाच्या कार्यपद्धतीशी सुसंगत आहे का, याची खातरजमा करणे या चाचण्यांचा प्रमुख उद्देश आहे.

Rafale Marine Goa Testing
Goa Dairy AGM Adjourned: मराठीत कामकाज नाकारल्याने गोवा डेअरीची सभा गुंडाळली! बेकायदेशीर नोटिशीवरूनही गदारोळ

राफेल मरिन हे फ्रान्सच्या दासॉल्ट एव्हिएशन कंपनीने विकसित केलेले विमानवाहू युद्धनौकेवरून कार्यरत राहण्यासाठी तयार केलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. जमिनीवरील हवाई तळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांपेक्षा विमानवाहू युद्धनौकेवरील विमानांना मर्यादित जागेतून उड्डाण करावे लागते. तसेच समुद्राच्या हालचालींमध्ये जहाजाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरावे लागते. त्यामुळे अशा विमानांच्या रचनेत, अवतरण यंत्रणेत आणि संचालन प्रक्रियेत विशेष तरतुदी असतात.

भारतीय नौदलाच्या ‘विक्रांत’ आणि ‘विक्रमादित्य’ या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांवर लहान धावपट्टीवरून उड्डाण करण्यासाठी पुढे उंचावणारा उतार अर्थात ‘स्की-जम्प’ वापरला जातो. विमान उतरवताना त्यावरील विशेष आकड्याच्या साहाय्याने धावपट्टीवरील अडथळा-तारा पकडून विमानाचा वेग कमी केला जातो. या पद्धतीला ‘शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी’ असे म्हणतात. मात्र, राफेल मरिनची मूळ रचना फ्रान्सच्या ‘शार्ल द गॉल’ या विमानवाहू युद्धनौकेवर वापरल्या जाणाऱ्या कॅटपल्टद्वारे उड्डाण करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. त्यामुळे भारतीय युद्धनौकांवरील स्की-जम्प पद्धतीनुसार विमानाची कामगिरी आणि संचालनाची व्यवहार्यता तपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच या चाचण्या केल्या जात आहेत.

गोव्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित

दाबोळीतील ‘आयएनएस हंस’ येथील शोर-बेस्ड टेस्ट फॅसिलिटीवर २८३ मीटर लांबीचा स्की-जम्प उतार आहे. विमानवाहू युद्धनौकेवरील उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीची प्रतिकृती या सुविधेत तयार करता येते. जानेवारी २०२२ मध्येही राफेल मरिन विमानाची येथे सुमारे १२ दिवस चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या विमानवाहू युद्धनौकेसाठी योग्य लढाऊ विमान निवडण्याच्या प्रक्रियेत राफेल मरिन आणि अमेरिकेच्या एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट या विमानांचे मूल्यमापन करण्यात आले होते.

Rafale Marine Goa Testing
Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

तांत्रिक बाबी तपासण्यावर भर

आता सुरू झालेल्या नव्या चाचण्यांमुळे राफेल मरिनच्या भारतीय नौदलातील समावेशाच्या तयारीला गती मिळण्याची अपेक्षा आहे. फ्रान्सकडून विमानांची प्रत्यक्ष डिलिव्हरी सुरू होण्यापूर्वी भारतीय विमानवाहू युद्धनौकांवरील संचालनासाठी आवश्यक तांत्रिक बाबी तपासण्यावर नौदलाचा भर आहे. त्यामुळे दाबोळीतील ही चाचणी प्रक्रिया भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. या चाचण्यांमुळे विमानांच्या सुरक्षित उड्डाण आणि लँडिंगसाठी आवश्यक यंत्रणांची कार्यक्षमता पडताळण्यासही मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com