गोवा: विधानसभा निवडणुकीत आर. जी. कोणाला पावला तर तो फक्त भाजपाला. काहीजण आधीपासूनच सांगत होते की आर. जी. भाजपाची ‘बी’ टीम म्हणून. विधानसभा निवडणुकीत मतांची विभागणी करून काँग्रेस पक्षाचे आठ मतदारसंघ अल्प मताने पाडले. काँग्रेस पक्षाचे आर. जी. मुळे नुकसान झाले हे आतापर्यंत बऱ्याच जणांना कळून चुकले आहेत. त्यातल्या त्यात ख्रिस्ती मतदारांना आर. जी. काय ते पूर्णपणे समजले आहे. आता परत लोकसभा निवडणुकीत आर. जी. आपला उमेदवार उभा करणार म्हणजे मतविभागणी अटळ असल्याने मतदारांनी आता तरी पारख करावी, अन्यथा पश्चाताप ठरलेलाच.
साखळी मतदारसंघात पुन्हा ‘बाबा’
विधानसभा निवडणूक तर आटोपलीच, पण आता पंचायत निवडणुका डोक्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीत साखळी मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागले आहे हे सर्वच जाणतात. निसटता विजय दोतोरांना मिळाला आणि सुटले बुवा म्हणत समाधान मानवे लागले. पण आता पंचायत निवडणुकीतही बाबाने हस्तक्षेप करायला सुरवात केली आहे. त्यामुळे पंचायती ताब्यात घेण्यासाठी बाबा आटापिटा करील हे नक्की. मात्र दोतोर आहेत कुठे, निदान आता तरी सावध व्हायला नको का, की फक्त कार्यकर्त्यांवरच विसंबून रहायचे..!
पंचायतमंत्री की आयुक्त
पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पंचायत निवडणूक येत्या ४ जून रोजी जवळजवळ नक्की केल्या आहे. त्यातही ते चार जूनला पाऊस येणार नसल्याचेही सांगून जातात. आता माविन गुदिन्हो हे पंचायत मंत्री की, निवडणूक आयुक्त की, पर्जन्यमंत्री हेच गोमंतकीय जनतेला कळेनासे झाले आहे. निवडणूक आयुक्तांनी निवडणूक तारीख जाहीर करायची असताना ते आधीच तारीख जाहीर करतात आणि मागाहून ते निवडणूक तारीख निवडणूक आयुक्त जाहीर करणार असल्याचे सांगतात. त्यापुढे जाऊन ते चार जूनला पाऊस येणार नसल्याचेही सांगतात. यावरून त्यांना पर्जन्यमंत्री हे खाते दिले की काय? असा सूर राज्यात सुरू झाला आहे. सावंत सरकारातील मंत्री का म्हणून उतावीळ होत आहे, हे जनतेला समजलेले नाही. अशा मंत्र्यांची शाळा संघटनमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. ∙∙∙
पालिकेचा गजब कारभार
मडगाव नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या खास बैठकीत सर्व प्रभागांत मॉन्सूनपूर्व कामे करण्याचा निर्णय घेतला गेला; मात्र सर्व सोपस्कार कधी पूर्ण करणार, कामे कधी हाती घेणार? याचे उत्तर संबंधितांकडे नाही. पालिका प्रशासनाची मंजुरी, निविदा मागविणे वगैरेंना खूप वेळ जातो. यापूर्वी अशी कामे हाती घेण्यात आली होती. त्यादरम्यान पावसाने जोर पकडला व कंत्राटदाराचे साधले होते.. त्यामुळे मुद्दाम तर असा विलंब केला जात नसावा ना असा संशय व्यक्त येतो. इथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे कुणालाच त्याचे काही पडून गेलेले नाही. तसे असते तर दरवर्षी त्याची पुनरावृत्ती झाली नसती. अजब मडगाव पालिकेचा गजब कारभार सर्वांना बुचकळ्यात टाकणारा आहे, असेच म्हणावा लागेल. ∙∙∙
आता पूर्ण वेळ शिक्षक
प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले गिरीशबाबू आता पुन्हा एकदा याच महिन्यात शिक्षकीपेशात दिसणार आहेत. वास्तविक राजकारणातून पुन्हा शिक्षकी पेशात शिरणारे मोजकेच आहेत. त्यामुळे त्यांच्या पंक्तीत गिरीशबाबू जाणार आहेत. राजकारणात येऊन विविध पदे उपभोगलेले अधिकतम पुन्हा या पेशाकडे वळलेले नाहीत. कारण काहीही असो पण गिरीशबाबूंनी पुन्हा त्या पेशात शिरण्याचे जाहीर करून आपण हाडाचा शिक्षक असल्याचे दाखवून दिले आहे. सरकारविरुद्ध आवाज उठवून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे गिरीशबाबू आता शाळेत उच्चतम कामगिरी करून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या आवडीचे शिक्षक बनावेत, हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरावी. ∙∙∙
दामूचे पुन्हा गुडघ्याला बाशिंग
फातोर्डा येथील काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि भाजपचे दामू नाईक यांच्याबद्दल एक साम्य सांगितले जाते. हे दोघेही कुठलीही निवडणूक येऊ द्या ती लढविण्यासाठी एका पायावर तयार असतात. गिरीशने विधानसभा, लोकसभा अशा कित्येक निवडणुका केल्या; पण एकही न जिंकल्याने त्यांनी पुन्हा आपला मास्तरकीचा पेशा पत्करला आहे. मात्र, दामू यापूर्वी दोन विधानसभा जिंकले असल्यामुळे असेल कदाचित त्यांची निवडणूक लढविण्याची खुमखुमी अजून कमी झालेली नाही असे वाटते. त्यांनी म्हणे लोकसभा निवडणुकीत आपल्याला दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळावी यासाठी आपले घोडे पुढे दामटले आहे. यासाठी की काय माहीत नाही. परंतु ते कधी दिल्ली कधी गुजरात अशा वाऱ्या करत आहेत असे सांगितले जाते. एका बाजूने माजी खासदार नरेंद्र सावईकर हे दक्षिण गोव्यात काही प्रमाणात विखरून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी जिल्हा पिंजून काढत असताना दामू मात्र गल्लीपेक्षा दिल्लीतच अधिक रमलेले नाहीत ना? असे त्यांचे कार्यकर्तेच प्रश्न करू लागले आहेत. ∙∙∙
कामगार नेत्याचे समर्थन
‘गोव्याला व्याघ्रक्षेत्राची गरज नाही’ या वनमंत्र्यांच्या व्यक्तव्यावरून समाजमाध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच कामगार नेते पुती गावकर यांनी वनमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींना त्यांच्या या भूमिकेमागे खाणव्यवसायाचा संबंध जोडण्याचा मोह आवरता आला नाही. पुती हे खाण अवलंबितांच्या बाजूचे आहेत व गोव्यात व्याघ्रक्षेत्र अधिसूचीत झाले तर खाणी सुरू होण्यात अडचणी येऊ शकतील हाही त्यांच्या या भूमिकेमागील हेतू असू शकतो अशी चर्चा सध्या ऐकू येते. काही का असेना वनमंत्र्यांच्या वक्तव्याला उघड उघड समर्थन करणारे पुती गावकर हे पहिलेच आहेत. ∙∙∙
फोंडा पालिकेतील ‘चिकी’
फोंडा पालिकेतील ‘चिकी’ या श्वानाची फार मोठी चर्चा आहे. चिकीचा वावर फोंडा पालिकेत कायम असतो. बैठक असो व एखादी निवडणूक असो, बिनधास्त चिकी पालिका सभागृहात सगळे कामकाज शांतपणे ऐकते; मात्र कुणालाही त्रास नाही की उपद्रव..! सगळं एकदम शिस्तीत... बैठक संपली अथवा निवडणूक आटोपली की पुन्हा शांतपणे जाऊन बाहेर बसते, तेसुद्धा खास तयार ठेवलेल्या छोट्याशा लाकडी सोप्यावर. एका अर्थाने चिकीचा पहाराच पालिकेवर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चिकीच्या या स्वभावामुळे फोंडा पालिकेतील नगरसेवक किंवा कर्मचारीच सोडा आपल्या कामासाठी येणाऱ्या ग्राहकांनाही चिकीचा लळा लागला आहे, हे विशेष. माणसांच्या या दुनियेत एखाद्या श्वानाकडून दाखवण्यात येणारी शिस्त पाहिली तर माणसांबद्दल आणखी काय बोलायचे. ∙∙∙
रवी नाईक यांचा अजब सल्ला
कृषिमंत्री रवी नाईक साहित्यिक पुंडलिक नायक यांच्या सत्कार सोहळ्याला विशेष आमंत्रित होते. त्यांनी आपल्या नेहमीच्या साध्या सरळ शैलीने काही विधाने केली, ती लोकांना विनोदी वाटली. त्यामध्ये काही शाल जोडीतील फटकेही होते. रवी नाईक म्हणाले, ‘अरे, तू म्हज्यापेक्षा भुरगो मरे. तू माझ्यापेक्षा लवकर म्हातारा झालास. मी तुझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे. कारण कदाचित तू बसून लेखन करत होतास आणि मी व्हॉलीबॉल खेळत होतो. आता तू उठ आणि छान व्यायाम करायला लाग,’ असाही सल्ला द्यायला रवी नाईक विसरले नाहीत. ∙∙∙
चेतना यात्रेस एल्विस अनुपस्थित!
‘बोलावे तसे चालावे’ या बोधवाक्याचा खरा अर्थ काँग्रेसला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काँग्रेसचे भले होणे शक्य नाही. कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसने जी ‘चेतना यात्रा’ सुरू केली त्याचा पहिलाच नारळ कुजका निघाला. काँग्रेसचे थिंक टॅंक समजले जाणारे व कुंकळळीचे सुपुत्र एल्विस कुंकळ्ळीतून सुरू झालेल्या चेतना यात्रेत दिसलेच नाहीत. एल्विसची अनुपस्थिती चेतना यात्रेत जाणवली. कार्यकारी अध्यक्षांनी म्हणे एल्विसला या यात्रेचे निमंत्रणच दिले नाही. एल्विसच्या मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष येतात, जिल्हा अध्यक्ष येतात आणि एल्विसला निमंत्रण नसेल तर काँग्रेस काय खाक चेतना जागवणार, असे आता आम्ही नव्हे काँग्रेसजनच म्हणायला लागले आहेत. ∙∙∙
म्हापशात गाडेचालकांना नवीन ‘रेट’!
म्हापसा बाजारपेठेतील एकंदरीत विक्रेत्यांच्या संदर्भातील अनागोंदी व्यवस्थापनमुळे दररोज या ना त्या कारणाने खटके उडत असतातच. पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक व त्यांच्या दिमतीस इतर साहाय्यक कर्मचारी असूनही व्यवस्थापनात अजूनही सुसूत्रता आलेली नाही. तरीदेखील फिरत्या गाड्यांच्या मालकांना व भेळपुरीवाल्यांना बाजारपेठेतील मुख्य प्रवेशद्वारावरच कसे काय कायमस्वरूपी सामावून घेण्यात कसे काय आले आहे, हा सवाल काहीजण उपस्थित करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना तिथे गाडे लावण्यास मनाई करण्यात आली होती. आता ‘फिक्सिंग’ झाल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी त्यांना सामावून घेण्यात आले आहे, अशी चर्चा सध्या म्हापशात ऐकावयास मिळते. पालिका मंडळाच्या बाजार समितीने त्यांचा अगोदरचा ‘रेट’ वाढवून नवीन रेट लावून सेटिंग केले असल्याचाही सध्या चर्चा आहे. ∙∙∙
डोंगर पोखरून उंदीर
यापूर्वी एकेरी घरांसाठी लागू केलेली १६ युनिटची पाणी सवलत आता इमारतीमध्ये राहणाऱ्या फ्लॅट धारकांनाही दिली जाणार, असे सांगून सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने निर्धारित पाण्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर केला तर ही सवलत मिळणार नाही ही बाब अलगदपणे लपवून ठेवली आहे. ज्या इमारतीत बहुतेक फ्लॅट बंद आहेत त्यांना या सवलतींचा फायदा जरूर होणार. पण, जिथे इमारतीतील सर्व फ्लॅटात लोक राहत असतील आणि त्यामुळे त्यांचा पाण्याचा वापर जास्त होत असेल तर त्यांना काहीच फायदा मिळणार नाही. त्यामुळे सरकारकडून हा शेवटी डोंगर पोखरून उंदीर काढण्याचाच प्रकार तर नाही ना? हा प्रश्न आहे. ∙∙∙
छळ की सतावणूक?
बाजाराला ‘कोविड’च्या ग्रहणानंतर महागाईचे टचके बसत असताना बाजारात फिरून पोलिस दंड आकारत आहेत. कारण विचारल्यास रस्त्यावर बसून माल विक्री केली जात असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे बाजार हा पालिका अंतर्गत रस्त्यावर होत असल्यामुळे पालिका कर्मचारीही येऊन प्लास्टिक पिशव्यातून सामान दिल्याचे कारण करून दंड आकारतात. त्यानंतर सोपो कर हा वेगळाच. या सर्व दंडाचा हिशोब केल्यास व्यापारी म्हणतात व्यापार बंद केलेला बरा. कारण सरकार आतातरी न्याय देईल काय? प्लास्टिक पिशव्या जे व्यापारी देत नाहीत त्यांनाही पोलिस हक्काने दंड देऊ लागले आहेत. सरकारने आधी प्लास्टिक निर्मितीवर बंदी घालावी म्हणजे प्लास्टिक देवाण-घेवाण बंद होईल. निदान प्लास्टिकच्या नावाखाली व्यापाऱ्यांची सतावणूक तरी होणार नाही. ∙∙∙
‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है...?’
साहित्यिक पुंडलिक नायक यांनी आपल्या भाषणात लेखक, विचारवंतांची खंत व्यक्त केली. प्रतापसिंह राणे यांना निवृत्तीनंतरही कॅबिनेट दर्जा दिला जातो. जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनाही स्वाभाविकपणे अनेक सोयीसुविधा मिळत असतात. त्याशिवाय जे पडेल उमेदवार असतात, त्यांचीही राज्यसभेवर सोय केली जाते. परंतु राज्यसभेवर जाण्याचा खरा अधिकार लेखक, साहित्यिकांचा असतो. सध्या हा वर्ग कोणी खिजगणतीतच घेत नाही. त्यांचे सन्मान राज्यकर्त्यांनी परस्पर लाटायला सुरवात केली आहे. गोव्यातून राज्यसभेवर हल्ली केवळ राजकारणी पाठवले जातात त्याबाबत नायक यांची ही मल्लिनाथी होती. ∙∙∙
प्रक्रियेनंतरही प्रदूषण कसे?
असे सांगितले जाते की, सांडपाणी व मल्लनिस्सारण प्रक्रियेचे तंत्र आता इतके विकसीत झाले आहे की अशा प्रकल्पांतून प्रक्रियेनंतर उत्सर्जित केलेले पाणी हे इतके शुध्द असते की ते पिण्यालायक असते. गोव्यात विशेषतः शिरवडे, कोलवा येथे उभारलेले प्रकल्प हे अशा तंत्रज्ञानाचे प्रकल्प आहेत. तसे असेल तर विशेषतः कोलवा येथील प्रकल्पातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या या पाण्याबाबत गदारोळ का असा मुद्दा उपस्थित होत आहे. तेथील लोकांनी ते पाणी समुद्रात सोडू नये म्हणून केलेली मागणी मान्य करून ते पाणी साळ नदीत सोडण्यासाठी वेगळी व्यवस्था केली गेली व आता ती अंतिम टप्प्यात असताना तिला विरोध केला जात आहे. हे प्रक्रिया केलेल्या पाण्याबाबत अज्ञान की विरोधासाठी विरोध म्हणायचा. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.