राज्यात सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. आज रविवारी दुपारी केपे येथे प्रवासी बसमध्ये चढताना दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळवून नेण्यात आल्या. दोन्ही मिळून सुमारे अठरा ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याने केपेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केपे येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. आज दुपारी केपे येथून कावरे-पिर्ला येथे जाणाऱ्या प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केल्याने याचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेच्या व एका मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली.
बस काही अंतरावर पोहचल्यानंतर दोघांनीही आपल्या गळ्यात सोनसाखळी नसल्याने आरडाओरड केल्याने बस तेथेच थांबवून केपे पोलिस स्थानकात आणण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली असता काहीही सापडून न आल्याने नंतर बस तेथून सोडण्यात आली.
बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरी
रविवारचा केपे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधतात असे लोकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी याच बसमध्ये चढताना एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील चार हजार रुपये चोरून नेल्याचे एकाने सांगितले. आजच्या चोरीची घटना केपे पोलिस स्थानकात नोंद करण्यास दोन्ही महिलांनी नकार दिल्याने केपे पोलिसांनी त्यांची जबानी नोंद करून बस सोडून देण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.