Pune Businessman Vinayak Naik Karwar Murder Case
पणजी: कारवार येथील विनायक नाईक ऊर्फ राजू खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या गुरुप्रसाद राणे याचा मृतदेह मांडवी नदीत बेती येथील जेटीजवळ बुधवारी सापडला होता. गोमेकॉ फॉरेन्सिक मेडिसिनच्या डॉक्टरांनी केलेल्या शव चिकित्सेत त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल गुरुवारी दिला. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचे गूढ वाढले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
कारवार पोलिसांना राणे याच्या मृतदेहाची माहिती देण्यात आली असली तरी ते अजूनही पर्वरी पोलिसात चौकशीसाठी आलेले नाहीत. शवचिकित्सा अहवालात मृतदेहाच्या शरीरावर संशयास्पद जखमा नाहीत. त्याच्या पत्नीची जबानी पर्वरी पोलिसांनी नोंदवून घेतली आहे, त्यामध्ये तिने मृतदेह राणे याचाच असल्याचे म्हटले आहे. ती त्याच्यासोबत राहत नसल्याने अधिक काही माहिती पोलिसांना मिळाली नाही. तिने या मृत्यूबाबत संशयही व्यक्त केलेला नाही. तसेच त्यामागील कारणही माहीत नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
कारवार पोलिसांनी पुण्यातील व्यावसायिक विनायक नाईक याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ते तिघेही पळून जाण्यापूर्वी पोलिसांच्या हाती लागले. राणे यानेच नाईक याच्या खुनाची सुपारी त्याच्याकडेच कामाला असलेल्या नेपाळी कामगाराला दिली होती. राणे याचा जवळचा कामगार लक्ष यालाही अटक करून त्याच्याकडून या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न कारवार पोलिस करत आहेत.
मूळ कारवार येथील पण पुण्यातील एक नामवंत उद्योजक विनायक नाईक याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित गुरुप्रसाद राणे याच्या मृत्युमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली, मात्र त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.
दरम्यान,गुरुप्रसादनेच हा खुनाचा कट रचल्याचा संशय आता दृढ झाला आहे. गुरुप्रसाद हा खडपाबांध - फोंडा येथे राहत होता. बेतोड्यातील मॅकडोवेल कंपनीत केमिस्ट म्हणून काम करणाऱ्या गुरुप्रसादने स्वतःचा दारुचा उद्योग सुरू केला होता.
खडपाबांध फोंडा येथे गुरुप्रसाद राणे पत्नी तसेच दोन मुली व एका मुलासह राहत होता. ३५ वर्षांपूर्वी कारवार येथून गोव्यात फोंडा येथे आल्यावर आडपई येथे भाड्याच्या खोलीत गुरुप्रसाद राहत होता. सुरवातीला मॅकडोवेल कंपनीत कामाला लागल्यानंतर त्याने हळूहळू आपली ओळख वाढवली, आणि नंतर मडकई येथे दारूनिर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यानंतर शिरोडा येथे पावडर कोटींगचा उद्योगही त्याने सुरू केला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले होते.
विनायक नाईक खुनाचा तपास कारवार पोलिस करीत असतानाच गुरुप्रसादचा मृतदेह नदीत सापडल्याने संशयाची सुई गुरुप्रसादवरच रोखण्यात आली. त्याने आत्महत्या केली की, त्याला मारून टाकले, अशीच चर्चा आहे, पण प्राप्त माहितीनुसार त्याने आत्महत्या केल्याची पुष्टी मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.