कळंगुटच्या किनारी भागात वेश्या व्यवसाय आणि इतर अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. अनधिकृत टाऊट्स हे पर्यटकांना फसवी आमिषे दाखवून लुटत आहेत. मध्यंतरी तेथील स्थानिक आमदारांनी या गोष्टींवर नियंत्रण आणणार, असे म्हणाले होते.
मात्र, आता ते त्यांचीच बाजू घेत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा, असे म्हणत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पुन्हा आमदार मायकल लोबोंना लक्ष्य केले.
जलक्रीडा स्थानिकांकडेच राहणार
किनारी भागातील अवैध गोष्टींवर चाप बसविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, काहीजण त्यात व्यत्यय आणत आहेत. किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स (जल क्रीडा) खेळप्रकार हे स्थानिकांच्याच हाती राहणार. त्याचे खासगीकरण होणार नाही. स्थानिकांचे हित जपण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे लोकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पर्यटनमंत्र्यांनी केले.
कळंगुटमध्येच सर्व अवैध गोष्टी व वेश्याव्यवसाय कसा चालतो?, असा सवाल करीत पर्यटनमंत्र्यांनी आपल्याच सरकारमधील आमदारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय कळंगुट पोलिस निरीक्षकांकडून या गोष्टींना चाप लावला जात नाही, असा आरोप करून त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमेतवर संशय घेतला.
पर्यटनमंत्र्यांचे हे गंभीर आरोप आपल्याच भाजप सरकारला घरचा आहेर आहे. त्यामुळे खंवटे आणि लोबोंमधील वाद अद्याप मिटलेला नाही, हे स्पष्ट होते. पर्यटनमंत्र्यांनी मध्यंतरी कळंगुट किनाऱ्यावर भेट देऊन तेथील अवैध प्रकारांविषयी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.
तसेच किनाऱ्यावरील अतिक्रमणे व गैरप्रकार ताबडतोब बंद करण्याबाबत निर्देश दिले होते. ‘सध्या किनाऱ्यांवर अतिक्रमण वाढलेत. कळंगुटमध्ये पॅराग्लायडिंगला ८०० रुपयांऐवजी तीन हजार रुपये वसूल केले जातात हे चुकीचे आहे.
या प्रकारामुळे पर्यटन क्षेत्राचे व गोव्याचे नाव बदनाम होते. चंदगडमधील पर्यटकांना मारहानीचे प्रकरण हे याच गोष्टींचे उदाहरण आहे. सर्व बेकायदा गोष्टी या कळंगुटमध्येच चालताहेत, असा गंभीर आरोप पर्यटनमंत्र्यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.