PM Narendra Modi: बेतुल येथे 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 6 रोजी बेतुल येथे येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मडगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात येत आहे. त्याविषयी प्राथमिक चर्चा पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत आज झाली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला यश मिळवता आलेले नव्हते. त्यामुळे पंतप्रधानांनी मडगावात जाहीर सभा घेतली, तर त्यातून सकारात्मक वातावरण निर्मितीस मदत होईल असे गृहीत धरून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कुंकळ्ळी येथील एनआयटी संकुल, नौदलाचे वेरे येथील युद्धाभ्यास महाविद्यालय व अन्य दोन प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधानांनी करावीत असे नियोजन करण्यात येत आहे. या सभेच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात सरकारी कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यात काही प्रकल्पांची उद्घाटने करण्याचे नियोजन आहे. अद्याप तपशील निश्चित झालेला नाही, तो झाल्यावर सविस्तर सांगू शकेन.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
घाबरलेले भाजप सरकार ६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या गोवा भेटीचे कारण देत गोवा विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करून विरोधकांच्या सरळ प्रश्नांना सामोरे जाण्यापासून पळवाट काढणार नाही अशी आशा बाळगतो.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
सभेचे स्थान, उपस्थिती याविषयीच्या तपशिलावर बारकाईने या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या कार्यक्रमास मान्यता मिळाल्यानंतर तो कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. तूर्त या बैठकीत लोकसभा निवडणूक प्रचार तयारीचे नियोजन करण्यात आले अशी माहिती प्रसारित करण्याबाबतही बैठकीत ठरवण्यात आले होते.
सदानंद शेट तानावडे म्हणाले, की लोकसभा निवडणूक जवळ आल्याने गाभा समितीच्या बैठकीत संघटनात्मक तयारीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. विविध उपक्रमांबाबत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. ‘गाव गाव चलो अभियान’ राबवले जाणार आहे. त्यावरही चर्चा करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.