गोव्यात शपथविधी सोहळ्याची तयारी जय्यत

शपथविधी सोहळ्यासाठी दर्शकांची जमवाजमव
Preparations for swearing in ceremony in Goa are in full swing
Preparations for swearing in ceremony in Goa are in full swing Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यातील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी तर जय्यत करण्यात आली आहे. मात्र हा सोहळा पाहण्यासाठी तेवढी गर्दीही अपेक्षित असल्याने सध्या भाजप नेत्यांची धावपळ उडाली आहे. संपूर्ण स्टेडियम भरून उरेल एवढी गर्दी जमवण्याचे आदेश म्हणे भाजपच्या श्रेष्ठींनी दिले आहेत, त्यामुळे दर्शकांची जमवाजमव सध्या सुरू आहे. भाजप आमदार जेथून निवडून आले, त्या संबंधित मतदारसंघातून किमान दोन हजार दर्शकांची उपस्थिती आवश्‍यक आहे. त्यामुळेच तर एवढ्या मोठ्या संख्येने दर्शकांची सोय करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी संबंधित मतदारसंघातील भाजप नेत्यांवर आली आहे आणि ही एक प्रकारची कसोटीच मानली जाते, असे समजते. ∙∙∙

Preparations for swearing in ceremony in Goa are in full swing
गोव्यात विदेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वेगळा शिगमा कशासाठी?

एक पावसाळा डोक्यावरुन गेला म्हणून म्हातारा होत नाही; पण अर्ध्या हळदकुंडाने पिवळ्या होणाऱ्यांना ते भान नसते. काणकोणच्या जनाचे तेच झाले आहे. यावेळी काँग्रेसने तिकिट दिल्यापासून तर त्यांना आपण राज्यस्तरीय नेता बनल्याची स्वप्ने पडू लागली असावीत असे आम्ही नव्हे तर काणकोणमधील त्यांचे कार्यकर्तेच म्हणू लागले आहेत.

सरकारी शिगम्याच्या मिरवणुका अन्य भागांप्रमाणेच काणकोणातही आयोजित कराव्यात अशी जी मागणी जनाभाऊंनी केली आहे. त्या संदर्भात या प्रतिक्रिया आहेत. काहीजण तर गेल्या काही वर्षात तेथील राजकारण्यांनी जो राजकीय शिगमा घातला आहे तो पाहिला तर वेगळ्या शिगम्याची आणखी गरज आहे का? असे सवालही आता करू लागले आहेत. ∙∙∙

कौन बनेगा मिनिस्टर?

मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास बाकी असतानाही नक्की मंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याने सर्वांमध्ये धाकधूक आहे. रमेश तवडकर हे सभापतीपदाचे उमेदवार असल्याने त्यांचा मंत्री मंडळातील पत्ता कट झालेला असताना दक्षिण गोव्यात गणेश गावकर व सुभाष फळदेसाई हे दोघेही आपापले देव पाण्यात घालून बसले असावेत. फक्त आमदरामध्येच ही धामधूम नसून आतापर्यंत अमुकच मंत्री होणार असे अदमास पंचे ठोकून देत होते ते पत्रकारही सध्या भांबावून गेले आहेत. आपले अंदाज खरे होणार की निवडणूक निकालाच्या अंदाजाप्रमाणे याही अंदाजाची वाट लागणार याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. शेवटी ‘कौन बनेगा मिनिस्टर’ हे अवघ्या काही वेळातच कळणार आहे. ∙∙∙

आलेक्स बळीचा बकरा

नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा यांना सभापतीपदासाठी विरोधी पक्षांचा संयुकत उमेदवार बनविण्याचा प्रकार म्हणजे त्यांना बळीचा बकरा बनविण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्येच व्यक्त होत आहे. आलेक्स हे ज्येष्ठ नेते आहेत तसेच ते माजी मंत्रीही आहेत व म्हणून ते विरोधी पक्षनेते पदावरही दावा करू शकतात व म्हणूनच तर त्यांना सभापतीपदाची लालूच दाखवून त्यांचा काटा तर काढला गेला नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे. कारण सद्यःस्थितीत विरोधी गटाचा सभापती होणे शक्यच नाही. आलेक्स यांना त्याची कल्पना नाही का? ∙∙∙

क्रीडामंत्रिपदी कोण?

रमेश तवडकर यांनी भाजपतर्फे राज्य विधानसभेच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. भाजप व त्यांना मिळालेला पाठिंबा पाहता, तवडकर आरामात सभापती बनणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्रिपद कोणाकडे असेल याची उत्सुकता आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मागील मंत्रिमंडळात बाबू आजगावकर क्रीडामंत्री होते, पण यावेळेस त्यांचा मडगावमध्ये दिगंबर कामत यांनी पराभव केला. त्यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना तवडकर यांच्याकडे क्रीडामंत्रिपद होते. तवडकर, तसेच आजगावकर यांच्या कार्यकाळात गोव्यात नियोजित असलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा काही झाली नाही, मात्र घोषणाबाजी प्रचंड प्रमाणात झाली. आता नव्या क्रीडामंत्र्यांच्या पायगुणाने गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा होणार का, की आयओए यजमानपद दुसऱ्या राज्याला बहाल करणार या प्रश्नांच्या उत्तरासाठी थांबावे लागेल. ∙∙∙

Preparations for swearing in ceremony in Goa are in full swing
पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर काणकोणात असंतोष

त्यांच्या तोंडावर आली पट्टी

प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर मडगावच्या एका नगरसेवकाने त्यांचे अभिनंदन करणारा एक भला मोठा फलक मडगाव बाजारात लावला होता. या पोस्टरवर प्रमोद सावंत यांच्याबरोबर वरच्या रांगेत मोदी, शहा आणि नड्डा तर खालच्या रांगेत उर्फान मुल्ला, तानावडे व सतीश धोंड यांचे फोटो होते. मात्र, मंत्रिमंडळ स्थापन होण्यास एक दिवस बाकी असताना मुल्ला, तानावडे आणि धोंड यांच्या तोंडावर अकस्मात पांढरी पट्टी लावण्यात आली असल्याचे दिसले. आता ही पट्टी नेमकी कुणी लावली आणि का लावली हे कोडे मात्र सुटले नाही बुवा! ∙∙∙

पंजाब सरकारचा धडा घ्या

पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी आमदार, मंत्री, पराभूत किंवा निवृत्ती घेतल्यानंतर मिळणारे हजारो रुपयांचे पेन्शन बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो देशातील जनतेच्या दृष्टीने आदर्शवादी निर्णय म्हणावा लागेल. अशीच अपेक्षा संपूर्ण राज्यातील सरकाराकडून अपेक्षित आहे.

गोव्यातील भाजप सरकार हा निर्णय घेण्याचा विचार तरी करतील काय? पाच वर्षे आमदार व्हायचे आणि आयुष्यभर पेन्शन त्याच्यानंतर पत्नीला पेन्शन. किती काम केले असतील या लोकांनी म्हणून भरमसाठ पेन्शन दिले जाते. ही जनतेची लूट आहे आणि ती थांबलीच पाहिजे. कारण एकदा आमदार होताच मरेपर्यंत आणि त्या नंतरही पेन्शन देणे हा निर्णय चुकीचा आहे तो बदललाच पाहिजे. जनतेला ओरबाडून आयुष्य भर पेन्शन घेणाऱ्यांकडून सामान्यांना सुख कधीच मिळणार नाही, अशा तिखट प्रतिक्रिया पंजाबमधील ‘आप’ सरकारच्या निर्णयानंतर सर्वत्र उमटू लागल्या आहेत. ∙∙∙

लोबो दाम्पत्य की सम्राट-सम्राज्ञी?

सत्ताधारी पक्षात नसतानाही लोबो दाम्पत्याने अनभिषिक्त सम्राट-सम्राज्ञी अशी बिरुदावली प्राप्त केली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो अशा दोघांनीही सध्या आपापल्या मतदारसंघांत विकासकामांचा धडाकाच लावलेला आहे. गेल्या पंचविशेक वर्षात जी विकासकामे शक्य झाली नव्हती ती या दाम्पत्याने पूर्ण केली असल्याने त्यांना मतदारही सध्या दुवा देत आहेत.

विकासकामे मार्गी लावण्याबाबत त्या दोघांना सत्ताधारी भाजप पक्ष सहकार्य करीत नसला तरी, स्वत:ची क्लृप्ती लढवून व शक्कल वापरून त्यापैकी काही कामे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून, तर काही कामे स्वखर्चाने करून त्यांनी सुमारे पंधरा दिवसांपासून तडीस नेलेली आहेत. दिलायला लोबो यांनी तर पाणीपुरवठ्याचा प्रश्न आक्रमकतेने हाती घेतलेला आहे व त्याबाबत त्या शासकीय अधिकाऱ्यांसमोर पाठपुरावाही करीत आहेत. राजकारणात अगदीच नवख्या असलेल्या दिलायला यांच्या विकासकामांचा धडाका पाहून सध्या भाजप कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चाही लोबोसमर्थकांत ऐकावयास मिळते. ∙∙∙

तृणमूलचा नवा स्टंट

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण आपटी खाऊनही शहाणे न झालेल्या तृणमूल काँग्रेसने गोव्यातील पंचायत निवडणुकीत सर्व शक्तिनीशी उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अन्य कोणी तो जरी गांभीर्याने घेतलेला नसला तरी त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक स्वयंभू नेते अस्वस्थ बनले आहेत. कारण तृणमूल स्वतः जरी जिंकून येत नसला तरी इतरांना पाडण्याचे काम चोखपणे बजावतो हे विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे व त्यामुळे हा पक्ष खरेच पंचायत निवडणुकीत उतरो वा न उतरो; पण या घोषणेने ग्रामीण भागातील अनेकजण धास्तावले आहेत हे मात्र खरे. ∙∙∙

युरीवर नगरसेवकांचा दबाव!

सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्याने केवळ खुर्ची गरम करण्यासाठी खुर्ची घ्यायची नसते तर सत्तेचा योग्य वापर करण्यासाठी खुर्चीची ऊब घ्यायची असते. कुंकळ्ळी नगरपालिकेचे अध्यक्ष केवळ खुर्ची गरम करतात असे आम्ही नव्हे, तर युरी समर्थक नगरसेवकच म्हणायला लागले आहेत. विद्यामान नगराध्यक्षाची कार्यपद्धत नगरसेवकांना पसंद नाही. नगराध्यक्ष ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ अशा पद्धतीने वागतात व नगरसेवकांचे ऐकत नाही अशी तक्रार नगरसेवक करतात. आता लक्ष्मणरावांना बदलण्यासाठी युरी समर्थक नगरसेवक युरीवर दबाव टाकायला लागले आहेत. नगराध्यक्षांनी युरीला आपला मेंटर मानलेला असून आता गुरू युरी हे शिष्य लक्ष्मणाला सांभाळतात की आपल्या कुणब्याला ते लवकरच कळणार आहे. ∙∙∙

ज्योशुआंचेही लॉबिंग

सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी सुद्धा सध्या राज्य मंत्रिमंडळात स्वत:ला स्थान मिळावे यासाठी लॉबिंग चालवल्याचे वृत्त आहे. मंत्रिपदासाठी फारसा आग्रह न धरता अगदी शांतपणे ते सध्या त्याबाबत पक्षनेत्यांची मनधरणी करीत असल्याचे ऐकिवात आहे. बार्देशमधील सात मतदारसंघांपैकी पर्वरी, थिवी व म्हापसा अशा तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे व थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांना मंत्रिपद मिळणारच हे तर सर्वश्रुतच आहे.

त्याबाबत खात्री झाल्याने त्या दोघांपुढी स्वत:ची डाळ शिजणारच नाही, हे पक्के माहीत असतानाही ज्योशुआ डिसोझा सध्या मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. म्हापसा शहर हे गोव्यातील सर्वाधिक मोठे व्यापारी केंद्र आहे व त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळायलाच हवे, असा मुद्दा ते पक्षनेत्यांसमोर मांडत असल्याचेही ऐकिवात आहे. ∙∙∙

पिटी मास्तर बनणार विधानसभेचे मास्तर !

नशीब कधी कोणाला काय देईल व कसे देणार हे सांगता येत नाही. कोणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर हे स्वतःच्या हिमतीवर व कर्तृत्वावर राजकारणात पुढे आले आहेत हे कोणकोणकरांना मान्य करावेच लागेल. कुंकळ्ळी महाविद्यालयात शिकताना एनएसएसचा स्वयंसेवक कधी राजकारणी बनला हे समजलेच नाही.

रमेश तवडकर हे तसे शारीरिक शिक्षक म्हणजे पिटी मास्तर. तोंडात शिटी घालून हातात छडी धरून विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायामाबरोबरच शिस्तीचे धडे देणे हे त्यांचे काम. आता रमेश तवडकर विधानसभेचे मास्तर बनण्यास सज्ज झाले आहेत. विधानसभेच्या चाळीस विद्यार्थ्यांना (आमदारांना) शिस्त लावण्याचे व शिस्तीत ठेवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. रमेश तवडकर यांना मस्ती विद्यार्थ्यांना वठणीवर आणण्याचा अनुभव आहे आता रमेश सर ‘त्या’ चाळीस विद्यार्थ्यांना कसे शिस्तीत ठेवतात ते पहावेच लागेल. ∙∙∙

Preparations for swearing in ceremony in Goa are in full swing
गोव्यातील आजचे खास कार्यक्रम

एल्टनचे पंतप्रधानाला पत्र

माणसाने आशावादी असायला हवे असे म्हणतात ते खरे. बाबू कवळेकर यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकोस्टा जरी विरोधी पक्षात असले तरी ते आशावादी आहेत. केपे मतदारसंघातील ग्रामीण भागात पाण्याची समस्या तीव्र आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘हरघर जल’ या योजनेअंतर्गत केपेत पिण्याचे पाणी पोहचवावे, अशी मागणी एल्टन यांनी पत्रातून नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आता एल्टनबाब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे जाण्याऐवजी थेट पंतप्रधानांकडे जाण्याचे प्रायोजन मात्र समजू शकले नाही. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com