खरी कुजबुज: प्रतिमाबाई पुन्‍हा सक्रिय

Khari Kujbuj Political Satire: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा वाढदिवस मतदारसंघातील लोकांसाठी एक अनुभूती असते
Khari Kujbuj Political Satire: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा वाढदिवस मतदारसंघातील लोकांसाठी एक अनुभूती असते
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

प्रतिमाबाई पुन्‍हा सक्रिय

यापूर्वी काँग्रेस तसेच आम आदमी पक्षात महिला आघाडी सांभाळणाऱ्या प्रतिमा कुतिन्‍हो या आता कुठल्‍याही पक्षात नाहीत, पण त्‍यांनी सामाजिक मुद्दे घेऊन त्‍यावर आवाज उठवायचा हे आपले काम मात्र बंद केलेले नाही. कुठलाही मुद्दा कुठल्‍याही गावचा असो प्रतिमा तेथे धावून जातात. हल्‍लीच त्‍यांनी हणजुणे येथे होणाऱ्या आवाज प्रदूषणाच्‍या विरोधात आवाज उठविला होता, तर दोन दिवसांपूर्वी त्‍या नावेलीत रोमीवाल्‍यांच्‍या पंगतीत बसलेल्‍या दिसल्‍या. असे म्‍हणतात, सध्‍या कुठल्‍याही पक्षाचे व्‍यासपीठ त्‍यांच्‍याकडे नसल्‍याने त्‍यांना पूर्वीच्‍या जोमाने काम करता येत नाही. प्रतिमाबाईंना म्‍हणे आता आमदार व्‍हायची स्‍वप्‍ने पडू लागली आहेत. त्‍यामुळे पुन्‍हा काँग्रेस पक्षात शिरून काँग्रेसची नावेलीची उमेदवारी मिळविण्‍यासाठी त्‍यांची ही सारी धडपड चालू आहे, पण काँग्रेस प्रतिमाबाईंना त्‍यांना हवी असलेली जागा देतील का? की प्रतिमाचा वापरच करून घेईल? ∙∙∙

फळदेसाईंची चाणक्य नीती

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा वाढदिवस मतदारसंघातील लोकांसाठी एक अनुभूती असते. समाजाशी एकरूप झालेला आमदार म्हणून त्यांची ओळख, पक्षाच्या पुढे जाऊन त्यांनी येथील जनतेबरोबर नाळ जोडली आहे. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाला लोटणारा जनसमुदाय पाहिल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणारी हीच ती जनता असे म्हणता येते. मागील वाढदिवसाला तीन पंचायतींच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ केला, तर एका पंचायतघराचे उद्‍घाटन केले होते. आता या वाढदिवसाला मात्र मोठ्या प्रकल्पांचे उद्‍घाटन किंवा समारंभ करायचे टाळले आहे. कारणही तसेच आहे. मुख्यमंत्री मंगळवारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे ते वाढदिवसानिमित्त फळदेसाई यांची धावती भेट घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फळदेसाई यांना जास्त कार्यक्रम ठेवू नका, असे सांगितले आहे. तरीही त्यातून फळदेसाई यांनी काही लहान प्रकल्पांचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे, यातूनच त्यांची चाणक्य नीती दिसून येते. ∙∙∙

विरियातो फर्नांडिस यांचे मैं हू ना...!

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी उत्तर गोव्यात येणाऱ्या भोम गावाला भेट देऊन तेथील चौपदरी रस्त्याची समस्या जाणून घेतली. आता विरियातो फर्नांडिस हे दक्षिण गोव्याचे खासदार असले तरी त्यांनी उत्तर गोव्यातील समस्यांना हात घातल्याने आपण फक्त दक्षिण गोव्याचा खासदार नाही हे दाखवून दिले आहे. बऱ्याचदा उत्तर गोव्याचा खासदार दक्षिण गोव्यात जात नाही, पण कॅप्टनसाहेबांनी एक खूप चांगले उदाहरण घालून दिले आहे, ते म्हणजे जरी उत्तर गोव्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली तरी ‘मै हू ना..!’ ∙∙∙

डोंगरकापणीतून आमदाराला मिळाली गाडी!

डोंगरकापणी केल्यास मालकावर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे. आपल्या मतदारसंघात डोंगरकापणी होत असेल, तर ती थांबविण्याचे अधिकार आमदाराला दिले आहेत का? असे अनेक प्रश्न आज जनतेच्या मनात आहेत. किनारी भागात देखील डोंगरकापणी सुरू आहे आणि जे डोंगरकापणी करतात, त्यांच्याकडून आमदार गाड्या घेऊन लोकांच्या सेवेसाठी वापरतात. डोंगर कापणी केलेल्या बिल्डरकडून चक्क एका आमदाराने रुग्णवाहिका घेतली आणि लोकांच्या सेवेसाठी लावली. या किनारी भागातील आमदाराला वाटले असेल की लोकांना कळणार नाही, पण आमदारसाहेब लोक हुशार आहेत आणि गाडीच्या नंबरवरून माहिती देखील मिळते. तुम्ही ती गाडी संस्थेच्या नावावर केली नसल्याने चोरी पकडली बरं का! आता आमदारच जर बिल्डरकडून गाड्या घेऊ लागले, तर डोंगरकापणी थांबणार कशी? ∙∙∙

कॅप्टनची अशीही सक्रियता

दक्षिण गोवा लोकसभा जागा जिंकून भाजपला धोबीपछाड देणारे काँग्रेसचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे केवळ दिल्लीतच नव्हे, तर गोव्यातही भलतेच सक्रिय झालेले दिसून येत आहेत. लोकांनाही त्यांची ही सक्रियता भलतीच भावलेली दिसून येत आहे. आजवर कोणीही लोकसभा खासदार इतका सक्रिय झालेला लोकांना दिसून येत नव्हता. नाही म्हणायला एदुआर्द फालेरो हेही सक्रिय असायचे, पण त्यांची कामाची पध्दत वेगळी असायची. तीच गोष्ट नरेंद्र सावईकरांची, पण कॅप्टन सरळ फिल्डवर वावरताना आढळतात. त्यामुळे लोकांच्या त्यांच्याप्रति अपेक्षाही वाढताना दिसून येत आहेत. परवा त्यांनी भोम येथील रस्ता रुंदीकरणाबाबत तेथे जाऊन पाहणी तर केलीच, पण ती समस्या केंद्रीयमंत्री गडकरी सामोपचाराने सोडवतील अशी खात्री व्यक्त केली. तसेच हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, पण त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर काय हा प्रश्न तर राहतोच. गोव्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार असताना त्याला हवा असेल, तरच हा प्रश्न सुटू शकतो हे कॅप्टनला कोण सांगणार. कारण बाकीचे याप्रश्नी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत असे तेथील मध्यममार्गी लोक म्हणतात. ∙∙∙

गोमेकॉसमोर पुन्हा अतिक्रमण...

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाच्या प्रवेशद्वारासमोर अनेक खाद्यपदार्थ गाडेवाले तसेच भाजी - फळविक्रेते अतिक्रमण करून बसलेले आहेत. यापूर्वी तेथे असलेल्या अतिक्रमणकर्त्यांना तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तेथून हटवून तेथूनच काही अंतरावर कायमस्वरूपी गाळे दिले आहेत. या प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी व दिवसेंदिवस इस्पितळात वाहने घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या ही कारणे देण्यात आली होती. आता या घटनेला दोन वर्षे उलटून गेली आहेत व पुन्हा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पूर्वीचीच समस्या निर्माण झाली आहे. काही विक्रेते हे स्थानिक असल्याने स्थानिक पंचायत वाईटपण घेण्यास तयार नाही. तेथील भुयारी मार्गातही बेकायदा वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. या इस्पितळ व्यवस्थापनाचे अधिकारी तसेच पोलिस अनेकदा या ठिकाणाहून ये - जा करतात. मात्र, कोणालाही अतिक्रमण केलेले विक्रेते दिसत नाही हे नवल. कोणालाच या प्रवेशद्वारावर होणारी वाहतुकीची कोंडी दिसत नाही असे म्हणण्यापेक्षा तेथे अधिकाऱ्यांना कधी जाऊन पाहणी करावीशीही वाटत नाही. ∙∙∙

ध्वनिप्रदूषणाला जबाबदार कोण?

राज्यात ध्वनी प्रदूषणासंदर्भात अनेकदा किनारपट्टी परिसरातील नागरिक कंटाळून उच्च न्यायालयात गेल्याच्या अनेक घटना आहेत. न्यायालयाकडून निर्देश दिले जातात. मात्र, पालनाकडे जसे काटेकोरपणे पाहण्याची गरज आहे तसे अधिकाऱ्यांकडून होत नाही. हे अधिकारीच व्यावसायिकांना सामील असतात. राज्यात दरवर्षी सनबर्न महोत्सव होतो. शेवटपर्यंत सरकारकडून सर्व परवाने दिले जात नाहीत. महोत्सव सुरू होण्यास काही तासांचा अवधी असताना सरकार परवानगी देते. त्यामुळे त्याविरोधात एखाद्याला न्यायालयात जायचे असल्यास वेळही मिळत नाही. याआधी महोत्सव सुरू होण्याच्या दिवशी खंडपीठाने निर्देश देऊनही ध्वनिप्रदूषण झाले होते. या प्रकरणात पोलिस व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जबाबदार होते. आयोजकांकडून परवान्याचे उल्लंघन होऊनही कारवाई झाली नव्हती. खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत चौकशीचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नव्हते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना भय रहिलेले नाही. कारण या व्यवसायात काही राजकारणी आहेत, त्यामुळे कारवाई करताना अधिकाऱ्यांवरही दडपण येते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा वाढदिवस मतदारसंघातील लोकांसाठी एक अनुभूती असते
खरी कुजबुज: डोंगर पोखरून!

रोमीवाल्‍यांचाही कोकणी राष्‍ट्रमान्‍यता दिवस

सध्‍या रोमीलाही राजभाषेचा दर्जा द्या अशी मागणी घेऊन एक चळवळ सुरू झाली आहे. त्‍यामुळे गोव्‍यातच कोकणीमध्‍ये दोन गट पडण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. अशा स्‍थितीत आज म्‍हणजेच २० ऑगस्‍ट रोजी कोकणीला राज्‍यघटनेची मान्‍यता मिळाल्‍याने हा दिवस कोकणी राष्‍ट्रमान्‍यता दिवस म्‍हणून साजरा केला जातो. वास्‍तविक या दिवसाशी कुठल्‍याही लिपीचा कसलाही संबंध नसतानाही रोमीवाल्‍यांनीही आजचा हा दिवस साजरा करण्‍याचे ठरविले आहे. यानिमित्त ते सायंकाळी ६ वा. आगशी येथील कोकणी राजभाषा आंदोलन चळवळीतील हुतात्‍म्‍याच्‍या स्‍मारकाकडे जाऊन वेगवेगळ्‍या मागण्‍या करणार आहेत. वास्‍तविक देवनागरी लिपीमुळे कोकणीला राष्‍ट्रमान्‍यता मिळाली. हा दिवस आता रोमीवालेही साजरा करू लागले आहेत. हा देवनागरीचा विजय म्‍हणायचा का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा वाढदिवस मतदारसंघातील लोकांसाठी एक अनुभूती असते
खरी कुजबुज: मॅडम, तुम्हाला ध्वनिप्रदूषणाचा त्रास नाही का?

शौचालयांची दुरवस्था

स्मार्ट पणजीतील सार्वजनिक शौचालयांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार मायकल लोबो यांनी मांडला होता. कदंब बसस्थानकातील शौचालये असोत की शहरातील शौचालये असोत, त्यांची दुरवस्थेचा मुद्दा लोबो यांनी सभागृहात मांडून लक्ष वेधले होते. परंतु त्याकडे जास्त गांभीर्याने कोणी पाहिले नाही. त्यामुळेच महापौर आणि उपमहापौरांना त्याची पाहणी करावी लागली म्हणे. पणजीत सार्वजनिक शौचालयांची स्थिती बेकार आहे, काही मोजकीच शौचालये सुस्थितीत आहेत. ज्यांच्याकडे शौचालयांची जबाबदारी आहे, ती कंपनीही फारशी गांभीर्याने त्याची देखभाल करत असावी का असा सवाल उपस्थित होतो. आता महानगरपालिका अशा शौचालयांना नोटीस बजावत असली तरी वर्षानुवर्षे निविदा आल्यानंतर एकाच कंपनीला शौचालयांचा ठेका का दिला जातो, हा एक कळीचा मुद्दा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com