

डिचोली: सारमानस-पिळगाव मार्गावरील धूळ आणि चिखलाच्या गंभीर समस्येवरून आमदार प्रेमेंद्र शेट आज आक्रमक झाले. रस्त्याची पाहणी करताना परिस्थिती जैसे थे असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी चक्क आपली कार रस्त्यावर आडवी लावून ‘वेदांता’ची खनिज वाहतूक रोखून धरली. समस्या सुटेपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याची कडक ताकीद त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.
आमदार शेट यांनी पिळगाव येथे पंचायत मंडळासमवेत सारमानस रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाची दलदल निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने संतप्त झालेल्या आमदारांनी तातडीने खनिज वाहतूक थांबवली.
यावेळी पिळगावचे प्रभारी सरपंच उमाकांत प्रभूगावकर, गौतमी गावस, सुनील वरगावकर, स्वप्नील फडते यांच्यासह पंचसदस्य उपस्थित होते. खनिज वाहतूक रोखण्यात आल्याचे समजताच ‘वेदांता’चे उपकार्यकारी अधिकारी धीरजकुमार जगदीश यांच्यासह कंपनीचे अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदारांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरील चिखल आणि दलदलीबाबत कडक शब्दांत जाब विचारला.
‘रस्ता धूळ आणि चिखलमुक्त होईपर्यंत वाहतूक बंद ठेवा,’ अशी स्पष्ट सूचना आमदार शेट यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे सारमानस मार्गावरील ‘वेदांता’ची खनिज वाहतूक आज ठप्प झाली. कंपनी व्यवस्थापनाने कर्मचारी तसेच खाणपट्ट्यातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक कामेही करण्यात आली आहेत. सारमानस-पिळगाव भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कंपनी सदैव तत्पर असल्याचेही व्यवस्थापनाने म्हटले आहे.
खनिज वाहतुकीमुळे सारमानस रस्त्यावर निर्माण होणारी धूळ आणि पावसाळ्यात होणारी चिखलाची दलदल हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सारमानस-पिळगाव परिसरात धुमसत आहे. अलीकडे झालेल्या तसेच त्यापूर्वीच्या पिळगाव पंचायतीच्या ग्रामसभेतही या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली होती. यापूर्वीही संतप्त नागरिकांनी खनिज वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी ग्रामसभेतून करण्यात आली होती.
चिखलमय रस्तामुळे ग्रामस्थांना या मार्गाने ये-जा करणे कठीण होत आहे. त्यामुळे या परिसरातील खनिज वाहतुकीबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद आजच्या रास्ता रोखोतून उमटले.
‘वेदांता’ची धावपळ!
या पार्श्वभूमीवर खनिज वाहतूक सुरू असताना सारमानस रस्ता धूळ आणि चिखलमुक्त ठेवण्याचे लेखी आदेश आमदार शेट यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी ‘वेदांता’ कंपनीला दिले होते. मात्र, आजच्या पाहणीत परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे आढळून आल्याने आमदारांनी थेट रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ‘वेदांता’ कंपनीची आता धावपळ सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.