Ponda News : फोंडा मतदारसंघातील खांडेपार भागातील वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी खांडेपार येथे खात्याचे नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी केली होती. त्यानुसार वीज खात्याने हे कार्यालय सुरू केले असून या कार्यालयाच्या पूर्ततेसाठी रवी नाईक यांनी पाठपुरावा केला, आपल्याकडे फोनद्वारे संपर्क करून त्यासंंबंधी बोलणी झाली, आणि आता हे कार्यालय सुरू होत असून या कार्यालयासाठी पंचायतीने आपल्या इमारतीत मोफत खोली उपलब्ध करून दिली, त्यामुळे हे कार्यालय लवकर सुरू होणे शक्य झाले, त्याचा लाभ खांडेपारवासीयांना होणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
खांडेपार येथे (सोमवारी) वीज खात्याच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, पंचसदस्य नीळकंठ नाईक, बाबू च्यारी तसेच इतर व वीज खात्याचे अभियंते भरतन आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वीज कार्यालयात एक कनिष्ठ अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित असतील. फ्यूज कॉल तसेच इतर तक्रारींसाठी हे कार्यालय उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून वीज चोरी तसेच आपत्कालीन स्थितीत होणारी पडझड रोखली जाईल, असेही ढवळीकर म्हणाले.
सरपंचांसह सत्ताधारी गटाचा बहिष्कार?
या उद्घाटन समारंभाला विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप गटाच्या सरपंच, उपसरपंच आणि अन्य चार पंचायत सदस्यांनी बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे विरोधातील अन्य तीन पंचही अनुपस्थित होते, त्यामुळे उपस्थितांत चर्चा होताना दिसली. हे कार्यालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करून पाठपुरावा करणारे फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईकही कार्यक्रमात दिसले नाहीत, त्यामुळेच ही चर्चा होताना प्रकर्षाने जाणवली.
काँग्रेसजनांनी म्हादईचा कर्नाटककडे पाठपुरावा करावा!
राज्यात म्हादईसंबंधी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी सध्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाल्यामुळे म्हादईचा विषय कर्नाटक सरकारकडे न्यावा आणि म्हादईसंंबंधीचा अट्टाहास सोडण्याची विनंती काँग्रेस सरकारला करावी, अशी सूचना सुदिन ढवळीकर यांनी केली.
कर्नाटकने म्हादईचा डीपीआर रद्द करावा तसेच म्हादईचे पाणी वळवण्यासाठी मागच्या सरकारने अंदाजपत्रकात तरतूद केलेला निधी म्हादईच्या संवर्धनासाठी आणि सुपा धरणाच्या वाढीसाठी वापरावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. कर्नाटकात सुपा धरणाचा विस्तार केला आणि जलक्षमता वाढवली तर त्याचा उपयोग कर्नाटकाला आणि लगतच्या राज्यांनाही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी आपल्यावर अर्धवट माहितीद्वारे आरोप करू नये, अशी सूचनाही ढवळीकर यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.