फोंडा : फोंड्यातील कदंब बसस्थानक आच्छादित करण्याबरोबरच ज्या काही गोष्टी प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, ते सुरू झाले असून पुढील डिसेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बसस्थानके अद्ययावत सुविधांनी युक्त करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येईल, त्यात फोंडा कदंब बसस्थानकाचा समावेश असेल, अशी ग्वाही मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
फोंड्यातील कदंब बसस्थानकावर आज सुदिन ढवळीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते तसेच बांदोडा पंचायतीच्या पंच सदस्यांसोबत भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. बारा दिवसांत फोंडा बसस्थानक आच्छादित करण्यात आला असून इतर सुविधाही उपलब्ध करण्यात येत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
फोंड्यातील कदंब बसस्थानक आणि बसस्थानकावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती, ती दूर करण्यात आली असून या बसस्थानकाची पाहणी गेल्या आठवड्यात केल्यानंतर लगेच संबंधितांची एक तातडीची बैठक बोलावून पावसापूर्वी बसस्थानक आच्छादित करावा तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चा झाली.
त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण झाल्याने आता प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना या बसस्थानकावर थांबण्यास सोयीस्कर होणार आहे. फोंडा बसस्थानकाजवळ ९२ हजार चौरस मीटर जमीन सरकारने यापूर्वीच घेतली असून या जमिनीत लोकोपयोगी उपक्रम साकारण्यात येतील, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
बैठकीनंतर तातडीने काम घेतले हाती :
फोंड्यातील कदंब बसस्थानकाचे रखडलेले काम पाहिल्यानंतर संबंधित कंत्राटदार तसेच कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व इतर संबंधितांची एक तातडीची बैठक बोलावून त्यात या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पावसापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आणि त्यानंतर या कामाला वेग आला. विशेष म्हणजे या बसस्थानकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ताकीद देण्यात आली, त्यामुळे काम लवकर होण्यास मदतच झाली.
बसस्थानकात कार्यालये...
फोंडा कदंब बसस्थानकात कार्यालये थाटण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या बसस्थानकाच्या वरती छतापर्यंतची जागा त्यासाठी उपयोगात आणण्यात येईल. ही कार्यालये थाटण्यासाठी बसस्थानकाची उंची वाढविण्यात आली आहे, असे सांगून प्रवाशांसाठीची बाकडे बदलणे, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.