फोंडा: राज्यातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास हा अक्षम्य असाच असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे स्पष्ट मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.
ढवळी येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील श्रीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी गणराया सर्वांना चांगली सुबुद्धी आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना केली. ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कपिल ढवळीकर यांनी वीजमंत्र्यांचे स्वागत केले. कवळेचे माजी सरपंच राजेश कवळेकर, विद्यमान सरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य सोनाली तेंडुलकर, माजी सरपंच सुखानंद कुर्पासकर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ढवळीकर म्हणाले, खराब रस्त्याला कारणीभूत कंत्राटदारांवर कारवाई व्हायलाच हवी. जनतेला चांगल्या सुविधा देणे हे सरकारचे काम आहे आणि ते व्यवस्थितरीत्या चालले असताना रस्त्याच्या प्रकरणावरून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे आपण स्वागत करीत असून संबंधित अभियंत्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
नोकर भरतीत पैशांचा व्यवहार झाल्याच्या प्रकरणावर बोलताना ढवळीकर म्हणाले, तसे काही असेल तर पुराव्यांसह पुढे यायला हवे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना आपण चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि पैशांचा व्यवहार होणेच शक्य नाही, तसा जर आरोप असेल तर पुराव्यांसह पुढे यायला हवे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.