
Khapreshwar Temple Banyan Tree Porvorim Updates
पणजी: पर्वरी उड्डाण पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या श्री देव खाप्रेश्वर देवस्थानजवळच्या पुरातन वटवृक्षाचे स्थलांतर करण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणा व कंत्राटदाराला काही अटी-शर्ती घालून आदेश दिले होते. मात्र, त्यामध्ये देवस्थानचा उल्लेखच नव्हता.
आज सकाळी कडक बंदोबस्तात या वटवृक्षाच्या फांद्यांची छाटणी सुरू असताना देवस्थानातील राखणदाराची मूर्ती हटवण्यात येणार असल्याचे कळताच वातावरण तंग झाले.
आज रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर ते स्थगित ठेवून ते उद्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. खाप्रेश्वर देवाची मूर्ती स्थलांतरित करणार, हे समजल्यावर काही भाविक हवालदिल तसेच भावनिक झाले. जमलेल्या भाविकांनी या कृतीवर संताप व्यक्त करत सरकारवर बेछूट आरोप केले. मात्र, पर्वरीतील वटवृक्ष जेथे स्थलांतरित केला जाईल, तेथेच श्रीदेव खाप्रेश्वर मंदिराची सरकारतर्फे नव्याने उभारणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संध्याकाळी दिले.
पर्वरी येथील श्रीदेव खाप्रेश्वराची मूर्ती हटविण्यास लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे पोलिसांनी रात्री मूर्ती हटविण्याचे काम तेथे उपस्थित असलेल्या मामलेदारांच्या आदेशानुसार तूर्त स्थगित ठेवले. मात्र, रात्री किंवा दुसऱ्या दिवशी मूर्ती हटविली जाईल, या धास्तीने लोकांनी रात्री उशिरापर्यंत देवस्थानाजवळच तळ ठोकला होता.
पर्वरीत उड्डाण पुलाचे काम जोरात सुरू आहे. या वटवृक्षामुळे तेथील काम कित्येक दिवसांपासून अडले होते. हा वटवृक्ष न हटविण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले होते. मात्र, न्यायालयानेच त्यावर तोडगा काढून कामातील अडथळ्यांचा मार्ग मोकळा केला होता.
न्यायालयात फक्त खाप्रेश्वर देवस्थानच्या वटवृक्षाचा प्रश्न होता. मंदिर हा एक वेगळा विषय आहे आणि त्याच्या स्थलांतराबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. तसा उल्लेखही उच्च न्यायालयाच्या आदेशात नव्हता. मात्र, आज सकाळी कंत्राटदाराने देवस्थानच्या भागाला देखील हात घातला आणि तेथे गोंधळ निर्माण झाला.
यावेळी धुमाकूळ घालून लोकांना चेतविणाऱ्या तसेच सरकारवर आरोप करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारने श्री देव खाप्रेश्वर देवस्थानच्या मंदिरातील राखणदाराची मूर्ती न हटवता तेथेच ठेवावी. वटवृक्ष हटवून इतर ठिकाणी स्थलांतर करण्यास आक्षेप नाही.
ही मागणी करणाऱ्या ज्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकावर नेले, त्याला त्वरित मुक्त करावे अशी मागणी मोठ्या संख्येने जमलेले भाविक करत होते. पोलिसांनी रात्री मूर्ती हटविण्याचे काम तेथे उपस्थित असलेल्या मामलेदारांच्या आदेशानुसार तूर्त स्थगित ठेवले.
यावेळी भाविकांनी रात्री ८ च्या सुमारास त्या ठिकाणी राखणदाराच्या हातात जशी मशाल असते, तशी मशाल घेऊन आरती झाली. सुमारे २५० हून अधिक भाविक तेथे उपस्थित होते. ही मूर्ती ठेवण्यासाठी तूर्त कंटेनरची सोय करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भाविकांकडून ही मूर्ती हटवण्यास होत असलेल्या विरोधामुळे तसेच वातावरण तंग होऊ नये म्हणून हे काम रात्री ८ वाजता बंद करण्यात आले. कोलवाळ, म्हापसा व पर्वरी येथील पोलिस फौजफाटा आणून तेथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरती झाल्यानंतर पोलिसांनी लोकांना पांगवण्यास सुरुवात केली.
मात्र, कोणीही जाण्यास तयार नव्हते. ज्या गाडीतून मूर्ती न्यायची आहे, ती गाडी फुलांनी सजवून तयार ठेवली होती. त्यामुळे ही मूर्ती रात्रीच्यावेळी हटविण्याचा पोलिसांचा डाव असल्याचा संशय लोकांना आला होता. त्यामुळे लोकांनी रात्रभर तेथेच ठाण मांडून बसण्याची तयारी केली होती. पर्वरीचे आमदार तथा मंत्री रोहन खंवटे याठिकाणी फिरकले नसल्याने भाविकांमध्ये खदखद होती, ती काहींनी व्यक्त केली.
पर्वरीच्या राखणदारालाच येथून सांगोल्डा येथे स्थलांतरित केल्यास येथील राखण कोण करणार? हा राखणदार अनेकांना संकटकाळात पावला आहे. त्यामुळे त्याचे स्थलांतर योग्य नाही, अशी मते भावनाविवश झालेले भाविक व्यक्त करत होते. हे मंदिर हटविताना काहींच्या डोळ्यांत अश्रू आले. मात्र, पोलिस बंदोबस्तात वटवृक्षाच्या फांद्या कापण्याचे तसेच राखणदाराची मूर्ती हटविण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरूच होते.
१. येथील २०० वर्षे जुना वटवृक्ष कायम राहावा, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा वटवृक्ष शाबूत राहिल्यास श्री खाप्रेश्वर देवस्थानची घुमटी कायम राहील, असा कयास होता.
२. खंडपीठात काही सुनावण्या झाल्यानंतर विहित नियमांचे पालन करून वटवृक्षाचे स्थानांतर करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार कारवाई सुरू झाली.
३.प्रत्यक्षात देवस्थान वाचविण्यासाठी कोणीही कोर्टात गेले नव्हते. परिणामी अखेरच्या क्षणी घुमटी वाचविण्यासाठी स्थानिकांची धावाधाव सुरू झाली. तथापि, त्याला कायद्याचा कोणताही आधार नाही.
पोलिस बंदोबस्तात तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे वटवृक्ष स्थलांतराचे काम यंत्रांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. या कामाभोवती पोलिसांचे संरक्षक कडे उभारले होते. यावेळी काही भाविक जमा झाले. फांद्या छाटणीचे काम सुरू असतानाच त्या पडून मंदिराचे नुकसान होत असल्याचे पाहून भाविक चिडले. त्यांनी मंदिर पाडण्याचा आदेश दाखवण्याची मागणी केली.
रविवारी दुपारपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते तेथे पोचले. त्यामुळे वातावरण अधिकच तंग झाले. यावेळी पोलिस बंदोबस्तात राखणदाराची मूर्ती हटवण्यासाठी पुरोहितांमार्फत विधी करण्यास सुरुवात झाल्यावर त्याला आक्षेप घेऊन भाविक पुन्हा संतप्त बनले. मात्र, पोलिस बंदोबस्तासमोर त्यांचे काहीच चालले नाही.
या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी भाविकांना पाठिंबा दर्शवत सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठविली. हिंदुत्ववादी संघटनांच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न उपस्थित करून मंदिर हटविण्याची कृती कायदेशीर आहे का? मंदिरातील श्री देव खाप्रेश्वर मूर्ती कोठे स्थलांतरित करणार असाही प्रश्न अमित पाटकर यांनी उपस्थित केला.
पर्वरी येथील पुरातन वटवृक्ष जेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे, तेथेच नव्याने श्री देव खाप्रेश्वर देवस्थान मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येईल. राज्य सरकार मंदिर उभारणीसाठी कटिबद्ध आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
वटवृक्षाबरोबर राखणदाराची मूर्ती हटवून संकट ओढवून घेतले आहे. या मूर्तीची स्थापना मी केली आणि आतापर्यंत सेवा करत आलो आहे. मूर्ती हटविण्यापूर्वी २-३ दिवसांची मुदत मागितली, ती सरकारने दिली नाही. या घटनेमध्ये स्थानिक आमदारांचा हात असून त्यांचा याला विरोध होता.
कार्तिक पेडणेकर, अध्यक्ष, श्री देव खाप्रेश्वर देवस्थान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.