Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Porvorim Elevated Corridor: पर्वरी उन्नत मार्ग सुरू होऊनही म्हापसा, कळंगुट आणि पर्वरीहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळालेला नाही.
Porvorim elevated road traffic
Porvorim traffic congestionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पर्वरी उन्नत मार्ग सुरू होऊनही म्हापसा, कळंगुट आणि पर्वरीहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळालेला नाही. उन्नत मार्गाला जोडणाऱ्या मार्गिका अद्याप पूर्णपणे उपलब्ध नसल्याने या मार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक जुन्या रस्त्यावरच येत आहे.

त्यामुळे विशेषतः सायंकाळच्या वेळी पणजीतून जाणाऱ्या आणि पणजीत येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होत असून, उन्नत मार्ग सुरू करण्यामागील वाहतूक सुरळीत करण्याचा उद्देशच काही प्रमाणात अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे.

पणजीहून म्हापसाच्या दिशेने अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्वरी उन्नत मार्ग सुरू होण्यापूर्वीच हॉटेल निओ मॅजेस्टिकजवळ सेवा रस्त्यावर उतरण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पणजीच्या दिशेने जाणारी किंवा म्हापशाच्या दिशेने पुढे जाणारी वाहने आवश्यकतेनुसार या मार्गाचा वापर करू शकतात.

याचप्रमाणे म्हापसाहून पणजीच्या दिशेने पर्वरी उन्नत मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना पर्वरी येथे सेवा रस्त्यावर उतरण्याची सोय उपलब्ध नसल्याने मार्गाच्या वापराबाबत अडचणी निर्माण होत आहेत. पर्वरीतील वाहनांना अटल सेतूवर जाण्यासाठीही स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झालेली नाही. परिणामी, उन्नत मार्ग आणि अटल सेतू यांच्यातील वाहतूक जोडणी अद्याप पूर्णपणे कार्यक्षम झालेली नाही.

Porvorim elevated road traffic
Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

या अपुऱ्या जोडव्यवस्थेचा थेट परिणाम सायंकाळच्या वाहतुकीवर होत आहे. म्हापसा, कळंगुट आणि पर्वरीहून पणजीकडे येणारी वाहने मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या रस्त्याचा वापर करत असल्याने सायंकाळी ५ ते साडेसहा या वेळेत पणजी बसस्थानक, मेरशी चौक आणि दिवजा चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

या काळात दोन्ही पुलांवरून पणजीत प्रवेश करण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत असून, कोणत्या मार्गाने पुढे जावे यासाठी वाहनचालकांची अक्षरशः स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसते. उन्नत मार्गाचा वापर करून वाहतूक विभागली जाण्याऐवजी जोडमार्गांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणातील वाहने पुन्हा जुन्या मार्गावर येत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या गर्दीच्या वेळी पणजीत प्रवेश करणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो आणि कोंडीचा परिणाम मागील चौकांपर्यंत जाणवतो.

जोडमार्ग पूर्ण करण्याची गरज

पर्वरी उन्नत मार्गाचा अपेक्षित वाहतूक लाभ मिळवण्यासाठी केवळ मुख्य उन्नत मार्ग उपलब्ध करून चालणार नाही, तर त्याला अटल सेतू, पर्वरी आणि सेवा रस्त्यांशी जोडणाऱ्या सर्व मार्गिका कार्यक्षम करणे आवश्यक आहे.

पर्वरीहून उन्नत मार्गावर जाणे, उन्नत मार्गावरून पर्वरीत उतरणे तसेच पर्वरीतील वाहनांना अटल सेतूकडे जाण्यासाठी स्वतंत्र जोडणी उपलब्ध झाल्यास वाहतुकीचे विभाजन होण्यास मदत होऊ शकते. तोपर्यंत उन्नत मार्ग असूनही म्हापसा-कळंगुट-पर्वरी ते पणजी या महत्त्वाच्या मार्गावरील सायंकाळची कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

Porvorim elevated road traffic
Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com