Ponda Traffic :‘राव रे, वच रे’मुळे वाहतुकीवर ताण

फोंडा पोलिसांचे दुर्लक्ष : शहरातून जाणाऱ्या बसेसमुळे वाहतूक कोंडी
Ponda Traffic
Ponda TrafficGomantak Digital Team
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

Ponda Traffic : फोंडा शहर हे गोव्यातील मध्यवर्ती शहर असल्यामुळे ते आता झपाट्याने वाढत चालले आहे, असे असले तरी या शहरात असलेला नियोजनाचा अभाव मात्र ठायी ठायी प्रतीत होताना दिसत आहे. शहरातून जाणारी बस वाहतूक हे याचे एक ज्वलंत उदाहरण. पणजी, मडगाव सारख्या शहरातून बाहेरून जाणाऱ्या बसेस फोंडा शहरातून जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यात परत ‘राव रे, वच रे’ या तालावर, या बसेस धावत असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर अधिकच ताण पडत आहे. याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.

नियोजित थांब्याशिवाय कितीतरी अनधिकृत थांबे या बसेस घेत असल्यामुळे त्या नेमक्या कुठे थांबतील, हे सांगणे कठीण होत आहे. कदंब बस स्थानकावरून सुटणाऱ्या या बसेस जुन्या बस स्थानकापर्यंत कमीत कमी चार ते पाच थांबे घेताना दिसतात. जुन्या बस स्थानकावर पाच ते दहा मिनिटे थांबल्यावर नंतर हळूहळू त्या आपल्या ठरलेल्या स्थानाकडे कूच करताना दिसतात.

Ponda Traffic
Ponda News : विठ्ठल भक्तांचा अनोखा उपक्रम!

त्यामुळे बऱ्याच वेळी या बस स्टँडवर वाहतुकीची कोंडी होताना दिसते. नंतर त्या आपल्या नियोजित स्थानकाकडे जाताना दिसतात. यामुळे उजगावच्या दिशेने जाणाऱ्या बसेस वरच्या बाजाराकडे पोहोचायला कमीत कमी पंधरा मिनिटे लागतात. या दिशेने जाणाऱ्या बससाठी वरचा बाजार येथे फक्त एकच अधिकृत थांबा आहे. पण या बसेस किती थांबे घेतात, याची मोजदाद करणे खरोखर कठीण काम बनले आहे.

Ponda Traffic
Ponda Crime: धक्कादायक! छातीवर चाकूने वार करत मित्राचा केला खून, समोर आले 'हे' क्षुल्लक कारण

मडगाव, वास्को, सावर्डे इथे जाणाऱ्या बसेसकरता तिस्क फोंडा येथे एकच अधिकृत थांबा आहे. पण दिसला प्रवासी की थांबवा गाडी, असे या बसवाल्यांचे धोरण असल्यामुळे ते कुठेही थांबताना दिसतात. त्यामुळे या अधिकृत थांब्यांना काहीच अर्थ राहिलेला दिसत नाही.

सर्वात मोठा कहर म्हणजे वाहतूक पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष. खाजगी वाहन चालकांना ‘तालांव’ देण्यात व्यस्त असलेले वाहतूक पोलीस या बसवाल्यांच्या मनमानी कारभाराकडे मात्र हेतू पुरस्सर दुर्लक्ष करतात. यामुळे या पोलिसांचे आणि बसवाल्यांचे काही ‘साटेलोटे’ तर नाही ना? या शंकेला वाव मिळायला लागला आहे. वास्तविक फोंड्यातही बगल रस्ते असल्यामुळे बस वाहतूक खरे तर या बगल रस्त्यावरून व्हायला हवी होती.

Ponda Traffic
Ponda Roof Collapse: फोंडा विभागीय कृषी कार्यालयाचे छत कोसळले

2003 साली तसा प्रस्ताव विचारधीन होता. पण बसमालक लॉबीच्या दबावामुळे हा प्रस्ताव अमलात येऊ शकला नाही. आता फक्त आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या बसेस तेवढ्या बगल मार्गावरून जाताना दिसतात. स्थानिक मार्गावरच्या बसेस मात्र तोच आपला जुना ताल आळवीत शहरातून मार्ग क्रमण करताना दिसतात. यामुळे शहरातील वाहतुकीवर सध्या प्रचंड ताण पडताना दिसत आहे.

Ponda Traffic
Ponda News : फोंडा जुन्या बसस्थानकावर तुंबले दुर्गंधीयुक्त पाणी; विक्रेत्‍यांना त्रास

‘सिटी बसेस’ केव्हा?

बाहेर जाणाऱ्या बसेस बगलमार्गावरून जाव्यात. शहरात सिटी बसेसची व्यवस्था करावी, अशी फोंड्यात बगल रस्ते कार्यान्वित झाले तेव्हा योजना आखण्यात आली होती. पण ही योजना अजूनही अंमलात आलेली नाही. आता फोंडा शहराचा भरपूर विस्तार झाला असल्यामुळे ‘सिटी बस’ ची आवश्यकता अधोरेखित होत आहे. पण फोंड्यासारख्या मोठ्या शहरात सिटी बसेस नसल्यामुळे हे शहर अजूनही नियोजनाबाबत बरेच मागे असल्याचे दिसत आहे. म्हणूनच आता तरी सिटी बसेसचा विचार करावा, अशी शहरवासीयांची मागणी आहे.

सध्या आपली बस वाहतूक म्हणजे गोंधळात गोंधळाचा प्रकार झाला आहे. सकाळी व संध्याकाळी फोंड्याच्या जुन्या बसस्थानकावर फेरफटका मारला, की याचा प्रत्यय येतो. या बस स्टॅन्डवरून हळूहळू सुटणाऱ्या बसेसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, तिथे तैनात केलेल्या वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष हे चित्र आम्ही गेली कित्येक वर्षे पाहत आहोत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही, हे विशेष. जेव्हा याबाबतीत शासनाला जाग येईल, तोच खरा सुदिन.

- राम कुकळकर, अध्यक्ष, फोंडा विकास समिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com