
फोंडा: फोंडा भागातील या भटक्या कुत्र्यांना कुणी तरी आवरा हो... अशी आर्त हाक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या मुलांच्या पालकांकडून मारली जात आहे. फोंड्यात ४८ तासांच्या आत तीन मुलांचे भटक्या कुत्र्यांनी जबरी चावे घेतल्याने त्यांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले.
गेल्या मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास अंत्रुजनगर रहिवासी संकुलात एका १४ वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यांनी चावे घेऊन गंभीर जखमी करण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एका १० वर्षीय मुलाचे शांतीनगर भागात कुत्र्यांनी चावे घेतले, तर आज गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एका पाच वर्षीय मुलीवर हवेली भागात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
ही मुलगी अंगणवाडीबाहेर खेळत असताना या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. कुणीतरी पाहिल्यावर भटक्या कुत्र्यांना हुसकावून लावण्यात आले, अन्यथा दुर्गाभाट येथील एका मुलीचा बळी गेला होता तशी परिस्थिती उद्भवली असती. या जखमी मुलीला लगेच जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी व बाबू च्यारी यांनी पालकांसमवेत फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.
फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात महिन्याला किमान शंभर जणांना भटक्या कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकरणांची नोंद होत असून खासगी दवाखान्यातील नोंदींचा त्यात समावेश नाही. या भटक्या कुत्र्यांना आवरण्याची वेळ आली असून चार महिन्यांपूर्वी दुर्गाभाट - फोंडा भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या एका चिमुरडीसारखा प्रसंग पुन्हा उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या भटक्या कुत्र्यांप्रती भूतदया दाखवणाऱ्या श्वानप्रेमींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सरकार काही करीत नाही, तर जागोजागी चिकन मिश्रीत जेवण घातले जात असून काही लोक तर या भटक्या कुत्र्यांना अन्न वाढत आहेत. लोकवस्तीजवळ हे जेवण घालण्यास संबंधितांना अटकाव करा अशी जोरदार मागणी लोकांकडून केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव फोंडा तालुक्यात प्रचंड वाढला असून सरकारी यंत्रणा या कुत्र्यांना आळा घालण्यात अपयशी ठरली आहे. पशुसंवर्धन खाते म्हणते आम्ही लसीकरण करू, पण कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे मुलांना एकटे दुकटे सोडणे मुश्किलीचे ठरले आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार होत असून अनेक अपघातही झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.