
Ponda SOPO tax controversy: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ‘माटोळी’ विक्रेत्यांकडून ‘सोपो’ (बाजार शुल्क) वसूल केला जाणार नाही, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच गोवा विधानसभेत दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट आश्वासनानंतरही फोंडा येथील काही बाजारपेठांमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सोपो वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सोपो वसुली करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सावंत यांच्या निर्णयावर नाव न घेता टीका केली, त्यानंतर डॉ. सावंत यांनी देखील संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
शासकीय आदेशाची प्रतीक्षा की दुर्लक्ष?
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनंतर स्थानिक प्रशासनाकडून लेखी आदेश येणे अपेक्षित होते. मात्र, फोंडा येथील नगरपालिकेच्या सोपो वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणताही शासकीय आदेश किंवा परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे सांगत वसुली सुरूच ठेवली. “ दारूच्या नशेत विधानसभेत कुणीही काहीही आश्वासन देऊ शकतं, पण जोपर्यंत आमच्या हातात लेखी आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही वसुली थांबवू शकत नाही,” असे धक्कादायक विधान एका वसुली कर्मचाऱ्याने केले.
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले स्पष्टीकरण
हा वाद समोर आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. “गणेश चतुर्थीच्या काळात माटोळी विक्रेत्यांकडून सोपो गोळा केला जाणार नाही, याबाबतचे आदेश आधीच जारी करण्यात आले आहेत. कुणीही या आदेशाचे उल्लंघन करू नये,” असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले असून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांमुळे काहीसा विलंब झाला, मात्र आज सर्वांना आदेश मिळतील आणि कोणीही गोमंतकीय माटोळी विक्रेत्यांकडून सोपोचा कर वसूल करू नये असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
सोपोच्या नावे आर्थिक भुर्दंड
काही दिवसांपूर्वी म्हापसा येथील माटोळी बाजारात बसण्यासाठी विक्रेते म्हापसा नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर टोकन घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. हे विक्रेते केवळ जागेसाठी नाही, तर सोपो भरण्यासाठीही रांगेत होते. पालिका प्रशासनाकडून चार दिवसांच्या माटोळी बाजारासाठी प्रत्येक विक्रेत्याकडून २८० रुपये शुल्क आकारले जात असल्याचे चित्र समोर आले. तसेच डिचोली बाजारातून देखील सोपोच्या नावे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची व्यथा विक्रेत्यांनी मांडली होती.
७ ऑगस्ट २०२५ रोजी विधानसभेच्या अधिवेशनात गोव्यातील माटोळी विक्रेत्यांसाठी बाजारात करमुक्त, विशेष जागा देण्याची मागणी केली. पंचायत आणि नगरपालिका प्रशासन संचालकांना हे निर्देश जारी केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले, तरीही, फोंड्यातील पारंपारिक विक्रेत्यांकडून अजूनही सोपो कर वासून केला जातोय. सोपो वसूल करण्याची ही पद्धत आणि दादागिरी यावरून सरकारला भीती वाटत नाही हे स्पष्ट होते आणि सामान्य माणसांप्रती शासन आणि प्रशासन किती असंवेदनशील आहे हे देखील दिसून येते अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.