
Ponda Municipal Council Meeting
फोंडा: फोंडा पालिकेच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले. त्यात पालिकेच्या क्षेत्रात सीसीटीव्ही बसवणे, पालिकेची शांतीनगर येथील जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे पालिकेच्या नगरसेवकांची इंदोर वारी यावेळी चर्चेचा विषय ठरली.
नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. फोंडा पालिका क्षेत्रातील कचराफेकू व्यक्तींना आणि गैर कृत्यांना आळा बसावा, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरामुळे पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवता येणार असल्याने हे कॅमेरे बसवण्याचे ठरले.
शांतीनगर - फोंडा येथील पालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सोळा निवासी खोल्या आहेत, त्या जीर्ण झाल्या असून याजागी नवीन इमारत पालिकेने बांधावी की ‘पीपीपी’ तत्वावर बांधावी यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी पालिका संचालनालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका संचालनालयाकडून होकार आल्यानंतर मग निर्णय घेण्यात येणार आहे.
फोंडा पालिकेत गवत कापण्यासाठी नवीन यंत्रे खरेदी करणे तसेच शांतीनगर - फोंडा येथील उद्यानात बाकड्यांसह मुलांना खेळण्यासाठी नवीन उपकरणे बसवणे व इतर अनेक विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव घेण्यात आले.
फोंडा पालिकेत पालिका अभियंता तसेच सहायक पालिका निरीक्षकांची पदे भरण्याबरोबरच कंत्राटी तत्वावर सिव्हील अभियंता पदे भरण्यासंबंधीही यावेळी चर्चा झाली. पालिकेला अवजड वाहन चालवणाऱ्या चालकांची गरज असल्याने ही पदेही भरली जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.