Ponda Muncipality Budget: फोंडा पालिकेच्या बैठकीत यावर्षीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या २०२३ - २४ वर्षासाठी एकूण ७८ कोटी ६४ लाख दहा हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक पालिका बैठकीत ठेवण्यात आले व ते मंजूर करण्यात आले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रितेश नाईक होते. बैठकीला उपनगराध्यक्ष अर्चना डांगी तसेच इतर नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी सोहन उसकईकर उपस्थित होते.
या बैठकीत अंदाजपत्रख सादर करण्याबरोबरच पालिकेने दरवाढ सुचवलेला व्यावसायिक कर तसेच घरपट्टी कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच हा कर स्वीकारण्यात येईल, असा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
यंदाच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अंदाजपत्रकात विकासकामांबरोबरच कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर बाबींचा समावेश आहे. यंदाचे शिलकी अंदाजपत्रक आणि पालिका तिजोरीतील गंगाजळी भरण्याबाबतही चर्चा होऊन सर्वानुमते या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली.
फोंडा पालिकेच्या सोपो कराचा लिलाव करण्यात आला होता, पण कुणीही कंत्राटदार लिलाव स्वीकारायला पुढे आला नाही. लिलावाची रक्कम जास्त असल्याने कंत्राटदारांनी पाठ फिरवली.
त्यामुळे या लिलाव रकमेत कपात करून ती आता ५३ लाख ९२ हजार रुपये निर्धारित केली आहे. सोपो करावर पालिकेच्या आर्थिक स्त्रोताची भिस्त असल्याने सांगोपांग विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका मंडळाने स्पष्ट केले.
फोंडा पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व विकासकामे करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व प्रभागांत गटार स्वच्छता तसेच इतर मान्सूनपूर्व कामासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज असल्याने या कामासाठी वीस लाख रुपयांची तरतूद सरकारने करावी, अशा आशयाचे एक पत्र फोंडा पालिकेतर्फे पाठवले आहे.
पालिका प्रशासनाकडून कामाला मंजुरी मिळाली तर पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.
फोंड्यातील झरेश्वर नाला बांधकामाबाबत जलस्त्रोत खात्याशी कागदोपत्री सोपस्कार करण्यात आले होते, मात्र हे काम पालिकेनेच करावे, अशी सूचना या खात्याच्या अभियंत्यांनी केल्यानंतर सध्या तरी फोंडा पालिकेकडे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी आहे.
तो सर्व प्रभागातील विकासकामांसाठी वापरण्यात येत असल्याने झरेश्वर नाला बांधकाम जलस्त्रोत खात्यानेच करावे, असे सांगितल्याचे रितेश नाईक म्हणाले. बैठकीत कचरा समस्या तसेच नवीन कंत्राटदार व अन्य विषयांवर सांगोपांग चर्चा झाली.
पूर्वीप्रमाणेच वसुली
फोंडा पालिका क्षेत्रातील नवीन व्यावसायिक करात व घरपट्टीत वाढ करण्याबाबतचा निर्णय फोंडा पालिकेने घेतला होता.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधीचा निर्णय घेऊन फोंडावासीयांच्या सूचना तसेच हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार फोंड्यातील बिझनेस फोरम तसेच अन्य व्यावसायिक व घरमालकांनी हरकती नोंदवल्या.
त्यानुसार यंदा या दोन्ही करात वाढ करण्यात येणार नाही. आहे तोच कर स्वीकारण्यात येईल. मात्र, फोंडा पालिकेने मागची देणी असलेली वसूल करण्यावर भर दिला आहे, त्यामुळे आर्थिक तूट भरून येण्यास मदतच होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.