Ponda Smart City: देशातील शहरे आता स्मार्ट होऊ लागली आहेत. गोव्यात पणजी आणि फोंड्याला स्मार्ट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून फोंडा पालिकेने तर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा चंग बांधला आहे. अर्थातच आता येत्या एप्रिलमध्ये पालिका निवडणूक होणार असल्याने या स्मार्ट सिटीचे प्रत्यक्षातील काम पुढील पालिका मंडळाकडून होणार आहे.
पण विद्यमान पालिका मंडळाचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी या स्मार्ट सिटीच्या बुनियादी कामाला आतापासूनच सुरवात केली आहे, त्यामुळे पुढील काळात कदाचित फोंडा शहर आगळेवेगळे असेल.
फोंडा पालिकाक्षेत्रांतर्गत शहर येते. फोंड्याला लागूनच कुर्टी - खांडेपार पंचायत असून कुर्टी भाग सध्या उपनगरी ठरला आहे. त्यामुळे फोंड्याचा विकास करतानाच कुर्टीही विकसीत करण्याची खरी गरज आहे, त्यामुळे फोंडा आणि कुर्टीचा विकास हा साहजिकच राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.
रवी नाईक यांनी फोंडा शहर आणि मतदारसंघात आवश्यक विकासकामे राबवली आहेत. फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळ, राजीव गांधी कलामंदिर, सरकारी संकूल, क्रीडा संकूल, जलतरण तलाव आणि जोडीला बगल रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने फोंड्याच्या विकासाला हातभारच लागला आहे.
तरीही वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची डोकेदुखी या सर्वांना जमेस धरून आता नव्याने फोंड्याला स्मार्ट करण्याचा निश्चय रवी नाईक यांनी बांधला असून पालिकेच्या माध्यमातून फोंड्याचा मास्टरप्लॅन साकारण्यात येणार आहे.
साधारण 315 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने फोंड्याला स्मार्ट सिटी करण्याच्या उद्देशाने खर्च केले जाणार आहेत. या विकासकामांत फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील दुकाने व गाळ्यांचे नूतनीकरण, उड्डाण पुलाखालील जागा विकसीत करणे, पार्किंगची व्यवस्था, झरेश्वर देवस्थान ते ढवळी चौपदरी मार्गापर्यंत नवीन रस्ता, विरंगुळ्याचे ठिकाण तयार करताना अद्ययावत वाचनालयाची सोय आणि जोडीला आवश्यक सुविधा असे अनेक उपक्रम या मास्टरप्लॅनमध्ये साकारण्यात येणार आहे. त्यामुळे फोंड्याचा नियोजनबद्ध विकास करण्याकडे पालिकेने कटाक्ष ठेवला आहे.
...चांगले ते देणार!
फोंडा शहराला चांगले ते देण्याचा माझा संकल्प आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांच्या गर्दीत फोंडा शहर हरवत चालले असून शहराचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी कार्यवाही होत आहे. आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा मास्टरप्लॅन साकारत असून फोंडावासीयांनी त्याला सहकार्य करावे. - रितेश नाईक, नगराध्यक्ष, फोंडा पालिका
तालुका सांस्कृतिक नगरी
राज्याची राजधानी जरी पणजी असली तरी फोंडा ही सांस्कृतिक राजधानी आहे. कुठे नव्हे एवढे कार्यक्रम आणि उपक्रम फोंडा तालुक्यात होतात, आणि तालुक्यात प्रवेश करायचा झाला तर मध्यवर्ती ठिकाणी फोंडा शहर असल्याने फोंड्याचा विकास अनिवार्य आहे, आणि त्यातूनच तर मास्टरप्लॅनची संकल्पना मांडण्यात आली आहे.
या मास्टरप्लॅनमुळे भविष्यात फोंड्यात आमुलाग्र बदल होताना आवश्यक सुविधा फोंडावासीयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र ही कामे रखडता कामा नये. सद्यस्थितीत पणजीला स्मार्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू केली, पण निधीअभावी अनेक कामे रखडली आहेत.
त्यामुळेच पणजीप्रमाणे फोंड्याची स्थिती होऊ नये. निधीचा स्त्रोत योग्यप्रकारे उपलब्ध झाला तर फोंडा स्मार्ट नक्कीच बनेल. केंद्र सरकारच्या माध्यमातून फोंड्याला स्मार्ट सिटी करण्यासाठी विद्यमान आमदार रवी नाईक यांनी चालना द्यावी, असेच पालिका मंडळाचे मत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.