Ponda: 'फोंड्यात लढाई बहुजनांच्या अस्तित्वाची', निवडणुकीसंदर्भात मान्‍यवरांचा सूर; रवींचा वारसा टिकणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन

Ponda Election: ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात युगांक नाईक बोलत होते. या चर्चेत ॲड. कुतिन्हो, विवेक नाईक व संजीव नाईक यांनी सहभाग घेतला होता.
Ponda Election
Ponda ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अलीकडच्‍या काळात ‘एसटी’ आणि ‘ओबीसी’ समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसतात. आज पर्यावरण आणि त्यांच्या जमिनीवर घाला घातला जातोय. त्याचे प्रतिबिंब फोंड्याच्या निवडणुकीवर दिसणे स्वाभाविक आहे. भंडारी जात म्हणून नव्हे तर एक वर्ग म्हणूनही त्यांचे स्वतःचे राजकारण आहे. त्यामुळे सर्वार्थाने फोंड्यातील निवडणूक ही बहुजनांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे मत प्रा. युगांक नाईक यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात युगांक नाईक बोलत होते. या चर्चेत ॲड. क्लियोफात कुतिन्हो, विवेक नाईक व संजीव नाईक यांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, रवी नाईक हे भंडारी समाजाचे आणि गोव्याचे एक मोठे नेते होते. त्यांचा वारसा अबाधित राखण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमताने बिनविरोध फोंड्यातील आमदार निवडून आणायला हवा होता. रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांचा विजय होणे हा भाजपच्या अनुषंगाने नव्हे तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा वारसा टिकविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी संजीव नाईक यांनी व्यक्त केले.

नवी पिढी अधिक सजग

अनेक वर्षे ज्यांना शिक्षण नव्हते, त्या बहुजनांना नेतृत्व करण्याचा, सुटाबुटात ऑफिसात बसून काम करण्याचा आत्मविश्‍वास हा रवी नाईक यांनीच दिला. फोंड्यात ख्रिश्‍चन आणि मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे; पंरतु या सर्वांचे नेते तेच होते. ज्यावेळी रवी नाईक मुख्यमंत्री होते, त्यावेळी नवशिक्षित भंडारी समाज त्यांच्या पाठीशी कणखरपणे उभा राहायला हवा होता, तेव्हा तो राहिला नाही. आताची नवी पिढी अधिक सजग आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब येत्या काळात दिसून येईल, अशी आशा युगांक नाईक यांनी व्यक्त केली.

जमीन, पर्यावरण मुद्दे महत्त्वाचे

भारतात कोणतीच व्यक्ती ही धर्माच्या किंवा जातीच्या नावावर मत मागू शकत नाही; परंतु भारतीय राजकारणात धर्माला महत्त्व आहे. उत्तरप्रदेशपेक्षाही अधिक गोव्यात जातीय राजकारण चालते, असा अहवाल आहे. सध्या जमीन आणि पर्यावरण हे विषय महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे निश्‍चितपणे येत्या काळात हे राजकारणासाठी महत्त्वाचे मुद्दे ठरणार असल्याचे मत ॲड. क्लियोफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

Ponda Election
Ponda By Election: फोंड्यात पोटनिवडणूक होणार की स्थगिती येणार? 30 मार्चला ठरणार निर्णय; आयोगाने उत्तरासाठी मागितला वेळ

बहुजनांनी गोवा सांभाळला

बहुजन समाजाने हा गोवा घडविला आहे, सांभाळला आहे. आज जो निसर्ग अबाधित आहे तो केवळ बहुजनांनी काष्टी मारून घाम गाळला त्यामुळे. या बहुजनांमध्ये भंडारी व इतर ओबीसी, एसटी समाज आणि अल्पसंख्याक येतात. या सर्वांचा मिळून एक जाहीरनामा विधानसभा निवडणुकीपूर्वी जारी होईल, तो ज्याला मान्य असेल त्याच्या बाजूने येणाऱ्या काळात मतदान होईल. बहुजनांकडे दुर्लक्ष आता खपवून घेतला जाणार नसल्याचे संजीव नाईक यांनी सांगितले.

Ponda Election
Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

भाटीकरांना आव्‍हान सोपे नाही

आजपर्यंत गोव्यात केवळ एका समाजाची मते घेऊन कोणी विजयी होत नाही. समाज आणि ज्ञातीचे राजकारण त्यांच्यापुरते मर्यादित असते; परंतु केतन भाटीकरांना ही निवडणूक सोपी जाणार असे मला वाटत नाही. आज भंडारी समाजाच्या नवतरुणाईला स्वतःचे मत आहे. भंडारी समाज म्हणजे काय हे आपल्याला फोंड्यातील पोटनिवडणुकीतील निकालादिवशी कळून येईल, असे मत विवेक नाईक यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com