Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

Khari Kujbuj Political Satire: सरकारने बेकायदा घरे नियमित करण्यासाठी माझे घर या संकल्पनेअंतर्गत अनेक योजना आणल्या, कायदा दुरुस्ती केली. यामुळे आता कोणी बेकायदा बांधकाम करणार नाही.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंड्यात धक्कादायक उमेदवारी!

कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अकाली निधनामुळे फोंड्यात पोटनिवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. रवी नाईक यांच्या पश्चात भाजप येथे कोणाला उमेदवारी देणार हा विषय नियमिततेचा ‘चर्वितचर्वण’ बनला आहे, असे वाटू लागले आहे. शिवाय काही इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक पक्षीय पातळीवर दुरंगी की तिरंगी होणार हेही स्पष्ट होत नाही. भाजपला उमेदवार देणे हे ओघाने आलेच, पण काँग्रेसनेही या ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ, असे सांगितले आहे. गत निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारास ते उमेदवारी देतील की नाही, हेही काँग्रेसकडून स्पष्ट नाही. त्याशिवाय आपने अजून आपला पत्ताही खुला केला नाही. असे असतानाच जे पक्षाच्या उमेदवारीवर इच्छुक आहेत, त्यांनी वेळप्रसंगी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु पडद्याच्या आड बऱ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत आणि त्या ठिकाणी धक्कादायकरित्या उमेदवार ठरतील, अशी दाट शक्यता आहे. ∙∙∙

माझे घर असेही

सरकारने बेकायदा घरे नियमित करण्यासाठी माझे घर या संकल्पनेअंतर्गत अनेक योजना आणल्या, कायदा दुरुस्ती केली. यामुळे आता कोणी बेकायदा बांधकाम करणार नाही, असा जर कोणाचा समज असेल तर तो फोल आहे. डिचोली म्हापसा मार्गावर मये पैरा परिसरात पांडव घुमटी ते सिद्धिविनायक मंदिर या दरम्यान अशी अनेक बांधकामे उभी राहत आहेत. विशेष म्हणजे यात स्थानिक नाहीत. कोणीतरी कोणाकडून तरी जमिनी विकत घेतल्या आणि २०१४ पर्यंतची घरे नियमित झाली की त्यापुढील घरे नियमित करणारे सरकार कधीतरी सत्तेवर येईल, या आशेने बांधकामे सुरू केली आहेत. मयेतील जमिनींची मालकी अद्याप मिळता मिळेना.या उपद्‍व्यापांची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. स्थानिकांचे बेकायदा बांधकाम चटकन नजरेत भरणाऱ्यांना ही बांधकामे कशी दिसत नाहीत, अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙

नारळाचा भाव; सरकारची शांतता!

दिवाळी-चतुर्थी आली की सरकार लगेच ‘जनतेसाठी’ जागे होते. बाजारात नारळ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा होते, प्रचारही रंगतो. पण सण संपले की तोच नारळ अचानक सोन्याच्या भावात विकला जाऊ लागतो. राज्यात सध्या कोणताही मोठा सण नसतानाही छोटासा नारळही चाळीस रुपयांना मिळत असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘सरकार जर खरंच लोकांसाठी असेल, तर स्वस्त दर फक्त सणापुरता का?’ असा थेट प्रश्न आता गावागावांत विचारला जाऊ लागला आहे. ∙∙∙

पर्रीकर यांची अशीही आठवण

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. मात्र नामकरण केवळ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे केल्याने आता नामविस्तार करावा, अशी मागणी पुढे आली आहे. हे कोणी पर्रीकरप्रेमी किंवा भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडून नव्हे तर एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ही मागणी केली आहे. सोमवारी त्यांनी पर्वरी येथे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या कार्यालयात तसे निवेदन सादर केले आहे. पर्रीकर यांच्या विषयी शिवसेनेला असलेला कळवळा दाखवण्यामागे शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची कोणती चाल असावी, याकडे आता लक्ष लागले आहे. प्रदेश सचिव काशिनाथ मयेकर, उत्तर व दक्षिण जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेजकर, गणबा देसाई यांच्या मदतीने गावकर यांनी हळूहळू हालचालींना वेग दिल्याचे दिसते. ∙∙∙

झेडपीसाठी आदर्श इच्छुक!

फोंडा मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगून युवा सामाजिक कार्यकर्ते आदर्श तोरस्कर यांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. आदर्शचे सामाजिक स्तरावर कार्य सुरूच असून रवी नाईक यांचे कार्य आपल्याला भावले, त्यामुळे सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि आपण अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम घेतले, असे आदर्श सांगतो. आपल्याला लोकसेवा करायची आहे, त्यामुळे भाजपने उमेदवारी नाही दिली तरी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करू, असेही आदर्शने सांगितले आहे. सध्या तरी अन्य इच्छुकांची जंत्री नसली तरी निवडणूक जाहीर होताच, इतर उमेदवार डोके वर काढतील, त्या भाऊगर्दीत आदर्शला भाजप पुरस्कृत उमेदवारी मिळते काय, हे बघावे लागेल. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

पोलिसांची अब्रू...

मडगावात पोलिस उपनिरीक्षकांकडून एकाला कोठडीत मारहाण झाल्‍याची घटना उघडकीस आलेली असतानाच उगवे-पेडणे येथे बेकायदा वाळू व्‍यवसायातून झालेल्‍या गोळीबार प्रकरणात दोन पोलिसांचा हात असल्‍याचे उघड झाल्‍यानंतर गोव्‍यातील खाकी वर्दी आणि तिच्‍यावरील काळे डाग हा विषय पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यंत यावर्षी एकंदर १६ पोलिस या ना त्‍या कारणाने निलंबित झाले आहेत. त्‍यामुळे गोव्‍यातील पोलिसांची एकप्रकारे अब्रू वेशीवर टांगली असे म्‍हटले, तर त्‍यात अतिशयोक्‍ती काही असेल का? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: "गोंयात सरकारी व्यवस्था असा कितें?",पोलीसच गुंड बनलेत, कायदा-सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

लोकांना हायसे!

फोंड्याचे दिवंगत आमदार रवी नाईक यांचे संपर्क कार्यालय खुले करण्यात आले आणि नागरिकांनी गर्दी केली. गेले काही दिवस हे संपर्क कार्यालय बंद होते, त्यामुळे फोंडावासीयांत चर्वितचर्वण सुरू झाली होती. पण रितेश आणि रॉय या दोघांनी संपर्क कार्यालयात येऊन फोंड्यातील नागरिकांशी संपर्क साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अजूनही काहीजण गेल्याचे मान्य करायला तयार नाहीत, कारण रवी आणि फोंडा यांचे एवढे घट्ट नाते होते की रवीशिवाय फोंड्याची कल्पना या लोकांकडून होऊच शकत नाही. तरीपण रवी पुत्रांनी कार्यालयाचा ताबा घेतल्यामुळे बऱ्याच जणांना हायसे वाटले. कारण यापूर्वी पात्रांव रवींना भेटण्यासाठी हे कार्यकर्ते येत होते, आता त्यांच्या पुत्रांना भेटण्यासाठी कार्यालयात हजर झाले.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com