Pollution Control Board: आस्थापनांनी सांडपाण्यासाठी योग्य व्यवस्था केली नसल्याचे दिसून आल्याने सासष्टी मामलतदार, तलाठी (सासष्टी), सर्कल इन्सपेक्टर १, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात मडगावातील १९ दुकाने व हॉटेल्सना टाळे ठोकले. शहरातील प्रदूषण नियंत्रणाखाली आणण्यासाठी वरील सरकारी अधिकाऱ्यांनी ही दुकाने व हॉटल्सवर कारवाई केली.
दुकाने व हॉटेल (Hotel) सील करण्याचा आदेश मामलेदार भिकू गावस यांनी आदेश क्रमांक एमएएम/एसएएल एमएजी-१ जीएसपीसीबी/२०२४/१५८४ दिनांक १५ मे २०२४ व पाणी प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४च्या कलम३३ (ए) आरडबल्यू कलम २५, २६ तसेच हवा प्रतिबंध व प्रदूषण कायद्याच्या कलम ३१ ए अंतर्गत दिला होता.
दरम्यान, जी आस्थापने बंद करण्यात आली त्यात फुर्तादो बार ॲण्ड रेस्टॉरंट (रेल्वे गेट जवळ), मडगाव काफे (सिने लता जवळ), बॉम्बे काफे (स्टेशन रोड), शगून हॉटेल (स्टेशन रोड), स्टार हॉटेल (गांधी मार्केट), गोवा गेस्ट हाऊस, टोनी कोल्ड ड्रींक, आमचे दुकान (मालभाट), दुकान क्रं, बी २ शेख बेपारी बीट शॉप (गांधी मार्केट), हिमालया आईसक्रीम पार्लर (कालकोंडा), स्टार चिकन सेंटर (गांधी मार्केट), कास्मिरो बार (मालभाट), लक्ष्मी हॉटेल (मालभाट), ए-१ फास्ट फूड (फ्लाय ओव्हर जवळ), ब्रिझा हॉटेल (स्टेशन रोड), गोवन बार (कालकोंडा), भारत काफे (सिने लता जवळ), तंदूर रेस्टॉरंट (रेल्वे गेट जवळ), बीफ सेंटर (गांधी मार्केट) यांचा समावेश आहे.
तलाठीच्या म्हणण्यानुसार या सर्व आस्थापनांना या संदर्भात नोटीस दिली होती व त्यांना योग्य उपाययोजना करण्यास सांगितले होते. मडगाव (Margao) नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यानी काही दिवसांपूर्वी मडगावमधील प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना सांडपाणी जोडणी घेण्याचे आवाहन केले होते.
सदर आस्थापनांच्या मालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईवर आपली नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानी सांगितले की सांडपाणी वाहिनीच्या जोडणीसाठी आम्ही अर्ज केला आहे. मात्र, सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम अद्याप झालेले नाही, अशी बाजू हॉटेल मालकांनी मांडली. सरकारी खात्यांतील समन्वयाच्या अभावाचा फटका दुकानदारांना बसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. या संदर्भात हॉटेल व दुकानमालक जिल्हाधिकारी अश्र्विन चंद्रू यांची भेट घेणार असल्याचे कळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.