Ponda Politics: फोंड्यात राजकीय वातावरण 'तापू' लागले! भाजपच्या उमेदवारीवर अनेकांचा डोळा; काँग्रेसचीही मोर्चेबांधणी सुरू

Ponda Assembly Election: विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे फोंडा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Ponda Assembly Election
Ponda PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे फोंडा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यासह विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. गेल्या अकरा महिन्यांपासून या मतदारसंघाला आमदार नसल्याने नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

१९९४ पर्यंत मगोचा बालेकिल्ला असलेल्या फोंड्यात १९९९ ते २०१७ या काळात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. २०१२ मध्ये मगो-भाजप युतीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. तरीसुद्धा भाजपला स्वतंत्रपणे येथे अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे २०२२ मध्ये काँग्रेसचे रवी नाईक यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली. २०१७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर ३,०५० मतांची आघाडी घेणाऱ्या रवी नाईक यांना २०२२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर केवळ ७७ मतांची आघाडी मिळाली.

Ponda Assembly Election
Goa Politics: पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस! 2 माजी नगरसेवक मैदानात; मिनीन डिक्रुझ आणि सुरेंद्र फुर्तादो यांचा तिकिटासाठी दावा

आता भाजपकडून रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि नगरसेवक विश्वनाथ दळवी हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रद्द झालेल्या पोटनिवडणुकीतील उमेदवारी आणि रवी नाईक यांचे पुत्र असणे ही रितेश यांची जमेची बाजू, तर भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता ही दळवी यांची जमेची बाजू मानली जाते. यापैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसऱ्याची भूमिका काय असेल, यावर भाजपचे निवडणूक गणित अवलंबून राहणार आहे.

भाजपचा मित्रपक्ष मगोनेही फोंड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू डॉ. कौतुक भाटीकर विविध उपक्रम राबवत आहेत. काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार राजेश वेरेकर यांनी ‘घर घर प्रचार’ अभियान सुरू केला आहे. मागील दोन निवडणुकांतील पराभव ही त्यांची कमकुवत बाजू असली, तरी यावेळी ते नव्या जोमाने तयारी करत आहेत.

Ponda Assembly Election
Goa Politics: गोव्यात राजकीय बदलासाठी नवी समीकरणं! सरदेसाईंची घोषणा; 'गोवा फर्स्ट' तिसरी नव्हे, पहिल्या क्रमांकाची आघाडी

भाजप-मगो युतीत मतभेदाची शक्‍यता

एका सर्वेक्षणाचा हवाला देत फोंड्यात मगो आघाडीवर असल्याचा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे, हे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावरच समोर येईल. मात्र, फोंड्याच्या उमेदवारीवरून भाजप-मगो युतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता या दाव्यामुळे चर्चेत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com