Ponda Municipal Council Election 2023: तरीसुद्धा भाजपचे यश निर्भेळ नाहीच! गरज आत्‍मपरीक्षणाची

‘त्‍या’ सात प्रभागांवर जास्‍त लक्ष केंद्रित करण्‍याची आवश्‍‍यकता
Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा नगरपालिका निवडणुकीत 15 पैकी 10 जागा प्राप्त करून बाजी मारल्यामुळे सध्या भाजप गोटात उत्‍साहाचे वातावरण आहे. पण तरीही विश्लेषण केल्यास हे यश निर्भेळ म्हणता येणार नाही. जिंकलेल्या १० पैकी २ जागांवर भाजप काठावर पास झाला आहे.

प्रभाग तीनमध्ये ३ मतांनी तर प्रभाग दहामध्ये केवळ एका मताने भाजपने विजय मिळविला आहे. गमावलेले पाच व काठावर पास झालेले दोन अशा सात प्रभागांत भाजपला आता लक्ष घालावे लागणार असल्‍याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काही प्रभागांची पुनर्रचना भाजपच्या पथ्यावर पडल. प्रभाग नऊचा चेहरामोहरा पूर्णत: बदलल्यामुळे तेथे दोनवेळा स्‍वत: व एकदा पत्नीला निवडून आणलेले ‘रायझिंग फोंडा’चे व्‍हिन्सेंट फर्नांडिस यांना ११० मतांनी हार पत्करावी लागली.

‘रायझिंग फोंडा’ पॅनलने ४ जागा मिळविल्या. दोन ठिकाणी त्‍यांना निसटता पराभव पत्‍करावा लागला. प्रभाग एकमध्ये रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांच्‍यासारखा तगडा प्रतिस्पर्धी असूनही ‘रायझिंग फोंडा’चे नंदकुमार डांगी यांना फक्त ३२ मतांनी हार पत्करावी लागली.

Ponda Municipal Council Election 2023
Mumbai Goa Highway Accident: वाहतूक कोंडी अन् महाड येथे कोळशाचा ट्रक आणि एसटी बसचा अपघात; सातजण जखमी

आतापासूनच चर्चा विधानसभा निवडणुकीची

रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रॉय व रितेश यांचा विजय झाल्यामुळे अजून पावणेचार वर्षे दूर असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा फोंड्यातील उमेदवार कोण, याबाबत आताच चर्चा सुरू झाली आहे.

पण या दोघांचा विचार करत असताना यावेळी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचे काय, हा प्रश्नही चर्चिला जातोय. दळवी हे सलग तीन वेळा निवडून आल्यामुळे तसेच मूळ भाजपवासी असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आघाडीचे दावेदार ठरू शकतात.

वास्तविक गेल्या खेपेलाच दळवींचा फोंड्याच्या उमेदवारीवर दावा होता, पण ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवी नाईक यांना ही उमेदवारी मिळाल्‍यामुळे त्यांचा पत्ता कट झाला.

आता रवींचे दोन्‍ही पुत्र भाजपमध्ये सक्रिय झाल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय असलेले दळवी यांचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दळवींचे राजकारण नगरपालिकेपुरतेच मर्यादित राहत नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे. अर्थात याचे उत्तर भविष्यातच मिळणार आहे.

पालिका-विधानसभा निकाल परस्‍परविरोधी

२००१ साली झालेल्या फोंडा पालिका निवडणुकीत भाजपला दहापैकी आठ जागा मिळाल्या होत्या. पण २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवी नाईक हे फोंड्यातून विजयी झाले होते. २००८ साली झालेल्या पालिका निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांच्या काँग्रेसप्रणीत पॅनलने तेरापैकी आठ जागा प्राप्त करून निर्विवाद यश मिळवले होते.

असे असूनसुद्धा २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांचा दारुण पराभव झाला होता. २०१३ साली झालेल्या पालिका निवडणुकीत रवी नाईक यांच्या काँग्रेसप्रणीत फोंडा विकास समितीला फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भाजप-मगो आघाडीच्या पॅनलला चौदापैकी अकरा जागा प्राप्त झाल्या होत्या.

तरीसुद्धा २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवी नाईक यांनी फोंड्यातून तीन हजार पन्नास मतांनी मोठा विजय मिळविला होता. २०१८ साली झालेल्या पालिका निवडणुकीत मगोप्रणीत ‘रायझिंग फोंडा’ला सर्वाधिक सात जागा मिळाल्या होत्या. भाजपला पाच तर काँग्रेसला तीन जागा प्राप्‍त झाल्‍या होत्या.

तरीसुद्धा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे रवी नाईक यांनी ७७ मतांनी का होईना पण मगोच्या डॉ. केतन भाटीकर यांच्‍यावर विजय प्राप्त केला होता. यातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पालिका निवडणुकांचे निकाल कसे फसवे असतात हे दिसून येते.

Ponda Municipal Council Election 2023
Goa Forest Fire: वणव्याबाबत अज्ञातांविरुद्ध 34 तक्रारी; वन खात्याची माहिती

भाजपमध्‍ये उत्‍साह, काँग्रेसमध्‍ये निरुत्‍साह

गेल्या चार पालिका निवडणुकांच्‍या निकालांचा अभ्यास केल्यास विधानसभेतील निकाल हा या निकालांच्या अगदी उलट लागलेला दिसून येतो. २००१ ते २०१८ पर्यंत फोंड्यात चार पालिका निवडणुका झाल्या. त्‍यांचा निकाल पाहिल्‍यास हा प्रत्‍यय येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे पालिका निवडणुका या व्यक्तिगत पातळीवर लढविल्या जातात.

तरीसुद्धा पालिका निवडणुकांचा निकाल हा तात्पुरता का होईना पण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा ठरतो यात शंकाच नाही. त्यामुळे फोंड्यातील भाजप कार्यकर्ते सध्‍या खूष असून काँग्रेसच्या छावणीत मात्र सामसूम दिसतेय.

... तर ते चुकीचे ठरेल

पालिका निवडणूक व विधानसभा निवडणूक यात बराच फरक असतो असे मत फोंडा विकास समितीचे अध्यक्ष राम कुंकळकर यांनी व्यक्त केले. त्‍यामुळे पालिका निवडणुकीच्या निकालांत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे यश पाहणे चुकीचे ठरू शकते. या दोन निवडणुकांतील समीकरणे वेगळ्या प्रकारची असतात असे ते म्हणाले.

भाजपची संघटित कामगिरी

फोंडा पालिका निवडणुकीत भाजपने एक युनिट म्हणून काम केले. यशाचे श्रेय फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांना देण्यात येत असले तरी त्‍यामागे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचाही सिंहाचा वाटा आहे.

तानावडे तर खास फोंड्यात येऊन प्रचारात काय त्रुटी राहिल्या आहेत हे बघताना दिसत होते. तेंडुलकर यांनीही कोपरा बैठका घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फोंड्याचे भाजप गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी प्रभागांत फिरून जनमत भाजप उमेदवाराच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे पक्षाचे संघटित यश असेच म्हणावे लागेल .

सुदिन ढवळीकरांमुळे पडला असता फरक

यंदाच्या पालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांची तटस्थ भूमिका. शेवटपर्यंत ते रणांगणात उतरलेच नाही. ते प्रचारात उतरले असते तर निकालात बराच फरक पडला असता असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

गेल्या वेळी ढवळीकर यांनी फोंडा पालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण यावेळी त्यांनी आयुधे म्यान केल्यामुळे ‘रायझिंग फोंडा’चे उमेदवार एकाकी पडले. तरीसुद्धा त्यांनी बलाढ्य नेत्यांशी स्पृहणीय झुंज दिली यात शंकाच नाही.

काँग्रेस नेत्‍यांनी संघटित होेणे गरजेचे

मुख्य म्हणजे यावेळी प्रथमच काँग्रेसने सर्व जागा लढविल्या नव्हत्या. दोन-तीन जागांवरच लक्ष केंद्रित करण्याचे धोरण त्यांच्या अंगलट आले. त्यात परत प्रभाग सहामध्ये फोंडा काँग्रेसचे गटाध्यक्ष विलियम्‍स आगियार यांच्या पत्नी लिविया यांचे दारुण अपयश काँग्रेसला धक्कादायक ठरले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेश वेरेकर यांना ६८६० मते मिळाली होती. पण त्याचे पडसाद या पालिका निवडणुकीत कोणत्याही प्रभागात उमटलेले दिसले नाहीत. यामुळे काँग्रेसला आता चाचपणीची गरज आहे. एकंदरीत पालिका निवडणूक निकालांचा विचार केल्यास भाजप, मगो व काँग्रेस या तिन्‍ही प्रमुख पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज दिसतेय, हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com