Panjim Smart City Development Scam
पणजी: राजधानी पणजीतील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांत झालेल्या घोटाळ्यासंदर्भातली माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली होती व त्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती, त्याची दखल घेतली आहे. नगरविकास सचिवांना याप्रकरणी कृती करण्याची सूचना करण्यात आली आहे. याप्रकरणाला स्थानिक आमदारही तेवढेच जबाबदार आहेत. यासंदर्भात गोवा फॉरवर्डकडून त्याचा पाठपुरावा करून त्याचा सोक्षमोक्ष लावला जाईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रायबंदर ते सांतिनेझ तसेच मळा या भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे व त्याचा त्रास त्या परिसरातील लोकांना तसेच वाहन चालकांना होत आहे. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या प्रकल्पांचे काम निजोजनबद्ध करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्याचा बट्टाबोळ झाला आहे. याप्रकरणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी वेळोवेळी विधानसभेत उपस्थित करून सरकारकडून त्याचे उत्तर मागितले होते. सरकारकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने १२ जून रोजी पंतप्रधान कार्यालयाला ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) अंतर्गत झालेल्या कामांची तसेच गैरव्यवस्थापनाची माहिती दिली होती. त्याला या कार्यालयातून उत्तर आले आहे. त्याची एक प्रत पक्षाला पाठवण्यात आली आहे, असे कामत म्हणाले.
पणजीत २५० कोटींच्या सीसीटीव्ही कॅमेरे प्रकरण, वारंवार केबल्स टाकण्यासाठी होणारे खोदकाम याची माहिती दिली होती. पणजीत झालेल्या कामांमुळे पावसाळ्यात पाणी साचणार आहे, असे भाकीत आमदार सरदेसाईंनी केले होते व तेच झाले,असेही ते म्हणाले.
पणजीत सुरू असलेल्या कामांवर स्थानिक आमदारांनी देखरेख तसेच कामे वेळोवेळी वेळेवर होताहेत की नाही, त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित आमदारांनी त्या कामांकडेच दुर्लक्ष केले आहे. स्मार्ट सिटी बरोबरच पणजी महापालिका तसेच स्थानिक आमदारांची एकत्रित जबाबदारी आहे. मात्र ज्या पद्धतीने काम रेंगाळले आहे ते पाहता तो आणखी रखडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने (Prime Minister's Office) येथील नगरविकास सचिवांना या प्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.