

पणजी : देशभरातील कारागिरांना प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेला गोव्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील १८,५७५ नागरिकांनी नोंदणी केली आहे.
यातील ११,८७८ जणांनी प्रशिक्षण घेतले असून ११७५ जणांना कर्ज मंजूर झालेले आहे. तर, ५७०६ जणांना ‘टुलकिट’चे वितरणही करण्यात आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू मध्यम राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
सुतार, बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, मेस्त्री, मच्छीमार, टूल-किट निर्माते, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली-चटई-झाडू बनवणारे, बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक, न्हावी, हार बनवणारे, धोबी आणि शिंपी अशा प्रकारात मोडणाऱ्या कारागिरांना ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घेता येतो.
त्यासाठी श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो, असे मंत्री करंदलाजे यांनी उत्तरात म्हटले आहे.
‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना १८ व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचा भत्ता देण्यात येतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘टुल-किट’ खरेदी करण्यासाठी त्यांना २० हजार रुपये, तर स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत १ ते ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय देण्यात येते. गोव्यातील ११,८७८ जणांनी आत्तापर्यंत प्रशिक्षण घेतले असून, त्यातील ११७५ जणांना कर्ज मंजूर झालेले आहे. ५,७०६ जणांना टुल-किटचे वितरण करण्यात आल्याचे मंत्री शोभा करंदलाजे यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.