Goa Politics: खरी कुजबुज; मोदी रिबेलोंना भेट देणार?

Goa Latest Political News: ‘चूड दाखोवन म्हारु घरांत हाडप’ अशी कोकणीत एक म्हण आहे. आपल्या छोट्याशा गोव्याला तिसऱ्या जिल्ह्याची खरोखरच गरज आहे का?
Goa Latest Political News
Goa Latest Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मोदी रिबेलोंना भेट देणार?

गोव्‍याला वाचवण्‍यासाठी आता निवृत्त न्‍यायाधीश फर्दीन रिबेलो मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी पणजीत घेतलेल्‍या सभेनंतर आता त्‍यांना मडगाव, म्‍हापसा येथेही सभांचे आयोजन केलेले आहे. शिवाय याबाबत काही दिवसांपूर्वी त्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत आपल्‍या दहा कलमी मागण्‍याही त्‍यांना सादर केलेल्‍या आहेत. राज्‍य सरकारच्‍या चुकीच्‍या निर्णयांचा गोवा आणि गोमंतकीयांना कशापद्धतीने फटका बसत आहे, हे त्‍यांनी आतापर्यंत जनतेसमोर मांडलेले आहे. याच विषयावर चर्चा करण्‍यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी त्‍यांनी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडेही केली आहे. आता गोव्‍याबाबत आपल्‍या मनात नेहमीच प्रेम असते असे वारंवार सांगणारे मोदी या विषयासंदर्भात रिबेलो यांना भेट देणार का? याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे.∙∙∙

कुशावती एक मात्र वाद अनेक !

‘चूड दाखोवन म्हारु घरांत हाडप’ अशी कोकणीत एक म्हण आहे. आपल्या छोट्याशा गोव्याला तिसऱ्या जिल्ह्याची खरोखरच गरज आहे का? हा चर्चेचा व वादाचा विषय आहे.राज्य सरकारला म्हणे तिसरा जिल्हा केला तर केंद्राकडून भरभरून पाचशे कोटींची आर्थिक मदत मिळणार आहे. गोवा सरकारने कुशावती, हा तिसरा जिल्हा करण्याचे ठरविले आहे. काणकोण, केपे, सांगे व धाराबांदोडा हे चार तालुके दक्षिण गोव्या पासून वेगळे करून कुशावती हा तिसरा जिल्हा बनणार आहे. हा तिसरा जिल्हा आपल्यासाठी राजकीय फायदा ठरेल, असे कदाचित भाजपा सरकारला वाटले असावे. मात्र, आता सरकारचा हा निर्णय भाजपसाठी जड जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मठग्रामात वास्तव करणाऱ्या काणकोणकरांना तिसरा जिल्हा नको आहे. कुडचडेतील नागरिकांना केपे जिल्हा मुख्यालय म्हणून नको आहे. केपेकर मुख्यालय केवळ आणि केवळ केपे म्हणून अडून आहेत. सांगे व धारबांदोडा तालुक्यांना तिसरा जिल्हा बनो वा न बनो त्याचा काही फरक नाही. सरकार मात्र कुशावतीबाबत ठाम आहे.आता पाहूया ‘कुशावती’ कुठून वाहायला लागते.∙∙∙

वेन्झींचा चान्‍स गेला

आम आदमी पक्षाचे नवीन प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून वाल्‍मिकी नाईक़ यांनी काल ताबा घेतला. नाईक यांची प्रतिमा प्रामाणिक अशा स्‍वरुपाची असली तरी ते राजकीय ‘छक्‍के पंजे’ करणाऱ्यांमधले नाहीत. त्‍यामुळे अध्‍यक्षपदाची धुरा ते केवढ्या क्षमतेने सांभाळतील हे येणारा काळच स्‍पष्‍ट करेल. मात्र असे म्‍हणतात, बाणावलीचे आमदार वेन्झी व्‍हिएगस यांनी प्रदेशाध्‍यक्ष होण्‍यासाठी आपली इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. आपली इच्‍छा अव्‍हेरली जाणार नाही, असाही त्‍यांचा होरा होता असे सांगण्‍यात येते. मात्र वेन्झी यांच्‍याकडे अध्‍यक्षपद नको, अशी भूमिका पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्‍याने त्‍यांची ही संधी हुकली. यापूर्वी वेन्झी व्‍हिएगस यांनी बाणावलीतील एका कार्यक्रमात गोव्‍याचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांची तुलना थेट भाऊसाहेब बांदोडकर यांच्‍याशी केल्‍याने आम आदमी पक्षाला टीकेचे धनी व्‍हावे लागले होते. जर ‍वेन्झीच्‍या हाती प्रदेशाध्‍यक्ष दिले आणि त्‍यांनी पुन्‍हा जर मुख्‍यमंत्र्यांचे गुणगाण गायले तर ते पक्षाला परवडेल का? असा आक्षेप काहीजणांनी घेतला. आणि त्‍यामुळेच अध्‍यक्षपदाची माळ वाल्‍मिकीच्‍या गळ्‍यात पडली. ∙∙∙

...तरी सरपंच-सचिव अदृश्यच

‘बर्च’ दुर्घटनेनंतर सरपंच आणि सचिव यांनी असा काही अज्ञातवास पत्करला आहे की, पोलिसांचे नकाशे, सीसीटीव्ही आणि गुप्त खबरे सगळेच थकून गेलेत. दोघे कुठे आहेत, कसे आहेत, की ‘नेटवर्कच्या बाहेर’ गेलेत याचा ठावठिकाणा अजून कुणालाच लागत नाही. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, हे मात्र सगळ्यांना माहीत! चर्चा अशी की, जामीन मिळेपर्यंत दर्शन नाही, हा नवा नियम त्यांनी स्वतःच लागू केला आहे. जामीन बाजूने आला तरच बाहेर, नाही तर आतूनच रणनीती असा काहीसा खेळ सुरू आहे म्हणे. पोलिसांना काहीच ‘हाताशी’ लागणार नाही, अशीही चर्चा रंगतेय. लोक म्हणतात, विरोधकांनी जर थोडा आवाज वाढवला, तर हे दोघे समोर येतील! नाहीतर अधिवेशनात भाषणं होतील, ठराव होतील, पण सरपंच-सचिव मात्र अदृश्यच राहतील. तोवर चर्चा मात्र रोज नवा रंग घेतच आहे! ∙∙∙

काय? ५ वर्षात काणकोण स्वावलंबी होणार?

मोठी स्वप्ने पहा व ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम घ्या, असे भारताचे दिवंगत राष्ट्रपती व मिसाईल मॅन अब्दुल कलाम नेहमीच सांगायचे. आता काणकोणचे आमदार व मंत्री रमेश तवडकर या पुढे जाऊन सांगायला लागलेत, की मुख्यमंत्र्यांनी जर आदर्श युवा संघ व बलराम संस्थेला सढळ हस्ते मदत केली. तर येणाऱ्या ५ ते १० वर्षांत काणकोण पूर्णपणे स्वावलंबी बनेल. असे झाले तर काणकोणचा एकही माणूस मुख्यमंत्र्याकडे किंवा सरकारकडे रोजीरोटी व नोकरीसाठी उपकार मागायला येणार नाही, याची आपण गॅरंटी देत आहोत,असे जाहीर वक्तव्य मंत्री तवडकर यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लोकोत्सवात केले होते. या वक्तव्यावर आता काणकोण भागात सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. तवडकर यांचे ‘श्रमधाम’ आता स्वावलंबी काणकोणच्या दिशेने जाऊ लागले आहे, हे योग्य झाले. मात्र काणकोणकरांना स्वावलंबी करण्याचा कोणता फॉर्म्युला आदर्श युवा संघ व बलराम संस्थेकडे आहे त्याचा उलगडा व्हावा, अशी स्थानिकांची इच्छा आहे. आता पाहू तवडकर काय जादू करतात. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; कॉंग्रेस आमदारांचे ‘पोस्ट लंच'' उपोषण

इच्छुक लागले कामाला !

‘प्रयत्नाते वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हे बोध वाक्य आपण ऐकले असणार. राजकारणात ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करीत राहिल्याने एके काळी दोन खासदार असलेला भाजप आज देशात व अनेक राज्यांत सत्तास्थानी आहे. आणखी थोड्याच महिन्यांनी पालिका निवडणूक होणार आहे. कुंकळ्ळी पालिकेच्या निवडणुकीत उतरण्यास सज्ज असलेल्या अनेक इच्छुकांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. युरी आलेमाव यांच्याबरोबर वावरणाऱ्या दोन युवा महिला आतापासूनच कामाला लागल्या आहेत.युरी यांच्यामार्फत या महिला आपल्या प्रभागात काम करीत आहेत. काही तथाकथित सामाजिक कार्यकर्तेही युरींच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेत आहेत. युरी समर्थक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात आणखी इच्छुक असल्याने युरी समर्थक इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळते. भाजपच्या गोटात मात्र सामसुम आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

मायकलची मागणी मुख्‍यमंत्री मान्‍य करतील?

गेल्‍या ६ डिसेंबर रोजी हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला आग लागून त्‍यात कामगार आणि पर्यटक मिळून २५ जणांचा मृत्‍यू झाला. या घटनेमुळे पर्यटनाचा स्‍वर्ग असलेल्‍या गोव्‍याची जगभर बदनामी झाली. या घटनेच्‍या अभ्‍यासासाठी सरकारने उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी अंकित यादव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ज्‍या समितीची स्‍थापना केलेली होती, त्‍या समितीने आपला अहवालही सरकारला सादर केला आहे. परंतु, सरकारने हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. या पार्श्वभूमीवर, सोमवारी पत्रकारांशी बोलताना कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी अहवालात नावे असलेल्‍या सर्वांवर कारवाई मागणी केली. शिवाय सरकारने हा अहवाल अजून सार्वजनिक केला नसल्‍याने त्‍याबाबत आपण अधिवेशनात आवाज उठवणार असल्‍याचेही स्‍पष्‍ट केले. हीच मागणी विरोधी आमदार गेले काही दिवस करीत आहेत. परंतु, सरकारने ती मान्‍य केलेली नव्‍हती. पण, आता सत्ताधारी आमदारानेच सभागृहात तशी मागणी केल्‍यास मुख्‍यमंत्री ती मान्‍य करतील का? की यामागे सरकारचा आणखी काही हेतू आहे? असा प्रश्‍‍न विचारला जातोय! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com