म्हापसा: हणजूण येथे सात वर्षीय मुलाचा चावा घेऊन जीव घेतलेल्या पीटबुल कुत्र्याचा शिवोलीमधील श्वानांची काळजी घेणाऱ्या एका खासगी स्वयंसेवी संस्थेमध्ये मृत्यू झाला. शवचिकित्सेनंतर या कुत्र्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दुसरीकडे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या या कुत्र्याच्या मालकाला मंगळवारी जामीन मिळाला. परंतु, या जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कारागृहातून त्याची सुटका झाली नव्हती.
२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रभास प्रेमानंद कळंगुटकर या मुलावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला चढवत, त्याच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली होती. या हल्ल्यात प्रभास गंभीर जखमी झाला होता. त्याला गोमेकॉत हलविले असता, तिथे उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. दोन वर्षीय पीटबुल कुत्र्याला देखभालीसाठी ताब्यात घेण्याची विनंती पशुसंवर्धन खात्याकडे केली होती.
त्यानंतर शिवोली येथील वेल्फेअर ऑफ अॅनिमल्स इन गोवा या प्राणी कल्याण संस्थेमध्ये या कुत्र्याला ठेवले होते. ३१ ऑगस्ट रोजी पशुसंर्वधन आणि पशुवैद्यकिय खात्याने जिल्हा प्राणी कल्याण समितीच्या सल्ल्यानुसार या खासगी प्राणी कल्याण संस्थेकडे या पीटबुल कुत्र्याची रवानगी केली होती.
नंतर हणजूण पोलिसांनी याप्रकरणी पीटबुल कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. म्हापसा न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे तो कोलवाळ कारागृहात होता. मंगळवारी त्याच्या जामिनावर सुनावणी झाल्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
मंगळवार, ३ रोजी दुपारी या कुत्र्याचा अचानक मृत्यू झाला. पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या अहवालातून कृत्र्याच्या मृत्युमागचे कारण स्पष्ट होईल. मालकाला अटक केल्यानंतर पीटबुलच्या जेवण खाण्याच्या वेळापत्रकात बदल झाला होता. हे कारण त्याच्या मृत्यूमागे असण्याची शक्यता वर्तविली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.