
वाळपई: शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, शेती आणि पर्यावरणाविषयीची आवड निर्माण व्हावी, यासाठी पिसुर्ले येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात ग्रीन वॉरिअर इको क्लबच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी ३०० चौरस मीटर जागेत २०० झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. आता या झाडांना सुंदर फुले फुलू लागली आहेत.
या उपक्रमासाठी लागणारे बियाणे वाळपई कृषी कार्यालयातून आणण्यात आले. वाळपईचे क्षेत्रिय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रीन वॉरिअर इको क्लबचे अध्यक्ष नंदा माजिक, शिक्षक शंकर माईणकर, साईश म्हाऊसकर, दीपक वेरेकर, उदय माजिक यांनी विद्यार्थ्यांसोबत मेहनत घेतली. पालक-शिक्षक संघाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले.
शिक्षक नंदा माजिक म्हणाले, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना रोपट्यांपासून फुलांपर्यंतची जर्मिनेशन प्रक्रिया समजावी, निसर्गाशी त्यांची जवळीक वाढावी आणि शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात ग्रीन वॉरिअर इको क्लबचे विद्यार्थी सदस्य ओम परब, चेतन राणे, गीतेश नाटेकर, सागर राय, आकाश कुमार, वेदांत गावकर, देवराज परब, मयंक मोरया, लक्ष्मण पर्येकर, मुकुंद देविदास, कार्तिक देसाई, ऋतुकेश च्यारी आणि रोहन पर्येकर यांनी सहभाग घेतला.
माजी मुख्याध्यापक डॉ. उल्हास गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब तसेच पालक-शिक्षक संघाने सर्वांचे कौतुक केले.
फुलांच्या विक्रीतून समाजोपयोगी उपक्रम
जुलै महिन्यात सुरू झालेल्या या प्रकल्पातील फुले दिवाळीपर्यंत पूर्ण फुलतील. फुलांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून इको क्लबतर्फे विविध पर्यावरण पूरक उपक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सध्या चांगल्या प्रकारे फुल धारणा होऊ लागली असुन पिवळी व भगवी रंगाची फुलांनी झेंडू फुलांच्या बागेत वेगळेच चित्र दिसत आहे.
इतर उपक्रमांतही बक्षिसे प्राप्त
या शाळेत इको क्लबच्या माध्यमातून यापूर्वीही वर्मी कंपोस्ट, भूजल संवर्धन प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, औषधी वनस्पती, किचन गार्डन, घनकचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले असून त्यासाठी त्यांना विविध बक्षिसेही प्राप्त झाली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.