
पणजी: उत्तर गोवा पोलिसांनी अत्यंत कसोशीने केलेल्या तपासानंतर एकाच रात्रीत जुने गोवे व पेडणे येथे घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत कुख्यात पारधी टोळीचे सदस्य जेरबंद केले आहेत. टोळीचा म्होरक्या वास्को येथे वास्तव्यास होता, तर त्याचे इतर साथीदार महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून आले होते. यातील तीन संशयित गोवा पोलिसांच्या ताब्यात, तर महाराष्ट्रात पकडलेल्या इतर दोनजणांना ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणण्यात येणार आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी पहाटे ३ वा. चिंबल येथील लक्ष्मीकांत चोपडेकर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून चोरट्यांनी चांदीचे करंडे व दोन जोडी अंगठ्या असा अंदाजे १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्तचर माहिती आणि तांत्रिक साधनांच्या साहाय्याने संशयितांची ओळख पटवली.
हे आरोपी हुबळी व बंगळुरू भागात फिरत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. ११ जुलै रोजी धुळापी नाकाबंदीवरून गोवा पोलिसांनी बालेनो कार (जीए ०८, आर ६७१६) सह प्रेम बड्डी (२८, हुबळी) व वसीम हुसेनसाब ताजअहमद (३२, वास्को, मूळ गाव : हुबळी) यांना अटक केली. त्यांनी चिंचवाडा, चिंबल येथील चोरीची कबुली दिली आहे. दोघांना १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
न्हयबाग येथे ९ जुलै रोजी रात्री सहा अज्ञात व्यक्तींनी संजीवन वेंगुर्लेकर (६५, व्यवसाय - चालक) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची इर्टिगा टॅक्सी (जीए ०३, डब्ल्यू ४१८०) चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या बस तिकिटावरून एका संशयिताचा मोबाईल नंबर मिळाला.
तपासात असेही समोर आले की या टोळीने त्या रात्री दोन दुचाकी - बुलेट व पल्सर न्हयबाग परिसरातून चोरी केल्या होत्या.
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास पलिसांनी महाराष्ट्रातून अटक करून त्याच्याकडून पल्सर मोटरसायकल (जीए ०३, एफ ७४७६) जप्त करण्यात आली. त्याने इतर पाच साथीदारांची नावे उघड केली. ज्यात प्रेम बड्डी व वसीम हेही होते.
पेडणे पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, कणकवली एलसीबीने बंगळुरूमध्ये राहणाऱ्या हड्या उर्फ शंकर मधुकर पवार (२५) व गुड्या उर्फ राजू पवार (२४) यांना अटक केली असून, त्यांना लवकरच ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणले जाणार आहे. या संपूर्ण कारवाईसाठी पोलिसांनी तांत्रिक व गुप्तचर माहितीचा प्रभावी वापर केला.
तपासादरम्यान दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले. टोळीचा मुख्य सूत्रधार वसीम ताजअहमद हा वास्को येथे वास्तव्यास होता. त्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील सहा साथीदारांना गोव्यात बोलावून काही दिवसांपासून कळंगुट व मडगाव परिसरातील हॉटेलांत थांबवले होते. तेथूनच ते गुन्ह्यांची आखणी करत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.