Pravin Arlekar: पुढील विधानसभा आर्लेकरांना जड? स्थानिकांत असंतोष; साडेतीन वर्षांत पेडण्याचा विकास खुंटला

Pernem politics: पेडण्यात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याविरोधात स्थानिकांत वाढता असंतोष आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवणे त्यांना कठीण होईल, असे चित्र आहे.
Pravin Arlekar
Pravin ArlekarDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडण्यात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याविरोधात स्थानिकांत वाढता असंतोष आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवणे त्यांना कठीण होईल, असे चित्र आहे.

पेडण्यात अनेक प्रकल्प आले, पण त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. गेल्या साडेतीन वर्षांत विकासाच्या बाबतीत नवे काहीच आमदार आर्लेकर करू शकले नाहीत. मतदारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मतदारांना टाळण्याचे प्रयत्न आमदार करतात.

या साऱ्यामुळे एक नकारात्मक वातावरण आर्लेकर यांच्या विरोधात तयार झाले असून त्यांना त्याचा फटका येत्या निवडणुकीत बसेल असे सांगण्यात येत आहे. धारगळ येथील क्रिकेट स्टेडियमच्या विषयावरील त्यांचे मौन तसेच पेडणे मतदारसंघात अनेक समस्या असताना त्या विधानसभेत मांडू न शकल्याने मतदारांत त्यांच्याबद्दल रोष आहे.

सध्या व्हॉटसॲपच्या माध्यमातून तो रोष व्यक्त होत असला तरी विधानसभा निवडणुकीत आर्लेकर नको असे मत तयार होताना दिसत आहे. पेडणे मतदारसंघातील अनेक पंचायती त्यांच्या हातातून निसटल्या आहेत. फक्त काही पंचायती नाममात्र त्यांच्याकडे आहेत.

काही नाममात्र निष्ठावंत भाजप कार्यकर्ते वगळता बहुतांश ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर राहिलेले आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाला लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने हा दीपोत्सव पूर्णपणे अपयशी ठरला व तो एक चेष्टेचा विषय बनला.

‘माझे घर’ योजनेविषयीचा कार्यक्रम मोठ्या सभागृहात ठेवल्यास लोक येतील की नाही याची शाश्वती नसल्याने त्यांनी हा कार्यक्रम नगरपालिकेच्या छोट्या सभागृहात ठेवला. त्यांचे अनेक कार्यक्रम ठरवूनही रद्द होतात. त्याशिवाय कार्यक्रमास जेव्हा अन्य मंत्री, खासदार, पक्षाचे वरिष्ठ नेते येतात, तेव्हा सर्वात शेवटी आर्लेकर पोहोचतात.

आर्लेकरांच्या कार्यकर्त्यांत नाराजी

जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी चालवलेल्या त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना मतदारसंघ खुला करून देण्यातही त्यांना यश आले नाही. हे मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याने व ते खुले ठेवण्यात आर्लेकर यांना यश न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये बराच असंतोष खदखदत आहे.

त्यातच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थक असलेले अनेक उमेदवार निवडणुकीत उतरणार असून ज्या उमेदवारास आर्लेकर समर्थन देतील, त्याला पाडण्यासाठी दुसऱ्या भाजप उमेदवाराबरोबर समेट घडवण्याचे प्रयत्न एका ज्येष्ठ नेत्याने चालवले आहेत.

Pravin Arlekar
Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

कोरगावकरांच्या कार्यालयात लोकांची गर्दी

याउलट मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या कार्यालयात रोज लोकांची मोठी गर्दी असते. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे पेडणे मतदारसंघात कुठेही आल्यावर त्यांच्या भोवताली लगेच मोठी गर्दी जमते, तर काँग्रेसचे ॲड. जितेंद्र गावकर यांच्या कार्यालयातही चांगल्यापैकी गर्दी असते.

Pravin Arlekar
Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप'ने कंबर कसली! 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्तरेत 6, दक्षिणेत 8 जण निश्‍चित

तरुणांचाही रोष...

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अशा मोठ्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात जमिनी देऊनही स्थानिक युवकांना रोजगार देणे विद्यमान आमदार आर्लेकर यांना शक्य झालेले नाही.

टॅक्सीचा स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्यांनाही ते न्याय देऊ शकले नसल्याने तसेच स्थानिक तरुणांची तर अनेक बाबतीत बोळवण केल्याने ते तरुणाईच्या रोषासही कारण ठरलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com