पेडणे, तोरसे ग्रामपंचायत क्षेत्रात पत्रादेवी ते तोरसे या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी साचणारे पावसाचे पाणी व तेथे तयार झालेला चिखल हटविण्याची मागणी वारंवार करण्यात आली.
परंतु या महामार्गाचे काम करणारी एमव्हीआर कंपनी व महामार्ग बांधकाम खात्याकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे तोरसे ग्रामपंचायत मंडळ व माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी आज रविवारी स्वखर्चाने जेसीबी यंत्र आणून ही समस्या सोडविली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग तयार करताना तोरसे येथे रस्त्याची पातळी समान न राहिल्याने पत्रादेवी ते तोरसे ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूने केबल नेताना खोदकाम केल्याने उंचवटा तयार झाल्याने बऱ्याच अंतरापर्यंत हे पावसाचे पाणी साचते. रस्ता करून एक वर्षही पूर्ण न झाले तर रस्त्यावर डबकी तयार झाली.
महामार्गावरील या डबक्यांमध्ये चिखलमिश्रीत पाणी व दलदल झाली होती. तेथून चारचाकी वाहने जाताना या साचलेल्या पाण्यातील चिखल दुचाकीस्वारांच्या कपड्यावर उडत होता. त्यामुळे त्यांचे कपडे खराब होत असत.
तसेच या पाण्यातून तसेच चिखलातून वाट काढताना दुचाकीस्वारांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर समस्येची दखल घेऊन माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरसकर, उपसरपंच रमेश बुटे, पंचायत सदस्य आत्माराम तोरसकर, पूजा साटेलकर, उत्तम वीर, माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रार्थना मोटे, छाया शेट्ये यांनी समस्येवर तोडगा काढला.
तोरसे-पत्रादेवी महामार्गावर तयार झालेल्या डबक्यांवर उपाययोजना करण्याबाबत आमदार प्रवीण आर्लेकर तसेच तोरसे ग्रामपंचायतीद्वारे अनेकदा महामार्ग बांधकाम खाते तसेच एमव्हीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. अखेर आम्हालाच पाऊल उचलावे लागले.
- सूर्यकांत तोरसकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.